ज्ञानऋषींच्या दर्शनाने समृद्ध झालेला दिवस
◆◆ज्ञानऋषींच्या दर्शनाने समृद्ध झालेला दिवस◆◆ (डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या भेटीचा अविस्मरणीय अनुभव) कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात की त्या क्षणांचं स्मरण मनाला पुन्हा पुन्हा उभारी देतं, आत्मा प्रफुल्लित करतो आणि विचारांच्या नव्या वाटा दाखवतो. असा एक क्षण माझ्या आणि नितीन महाराज पिसाळ यांच्या आयुष्यात आला- जेव्हा आम्हाला आजच्या काळातील ज्ञानऋषी, मानवतावादी चिंतक आणि लोकशिक्षक डॉ. आ. ह. साळुंखे सर यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा आणि संवादाचा योग आला. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरमध्ये डॉ. जयसिंगराव पवार सरांचा निरोप घेऊन साताऱ्याकडे निघालो होतो. प्रवास जरी लांब होता, तरी मनात उत्साह ओसंडून वाहत होता. कारण आज आपण त्या व्यक्तिमत्त्वाला भेटणार होतो ज्यांनी महाराष्ट्रात विवेक, विज्ञाननिष्ठा, मानवता आणि तुकारामांच्या विचारांची आधुनिक व्याख्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवली आहे. सुमारे सायंकाळी पाचच्या सुमारास आम्ही साताऱ्याच्या बसस्थानकावर पोहोचलो. तिथून रिक्षा करून आम्ही गेंडामाळ येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. राकेश दादा- म्हणजेच साळुंखे सरांचे सुपुत...