जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेली हनुमान स्तुती

◾जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेली हनुमान स्तुती ◾
              हनुमान हे रामायणातील एक प्रमुख नाव असून ते रामाचे महान भक्त मानले जातात. त्यांच्या जन्मबाबत अनेक मतांतरे आहेत. महाराष्ट्रात त्यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाल्याचे मानले जाते. त्या दिवशी हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यांचा जन्म अंजनी नावाच्या वानरीच्या पोटी अंजनेरी जिल्हा नाशिक येथे झाल्याचे मानतात. त्यांच्या वडिलांचे नाव केसरी होते.  हनुमान खूप ताकदवान महाबली होते. त्यांना भूक लागली, फळ समजून सूर्याला खायला निघाले. इंद्राने वज्र फेकून मारले ते हनुवटीला लागले. त्यावरून त्यांचे नाव हनुमान पडले. राम वनवासात असताना त्यांची व हनुमंताची भेट झाली. रावणाने पळवून नेलेल्या सीतामातेचा शोध त्यांनी लावला, रावणची लंका जाळली. लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर द्रोणगिरी पर्वतच उचलून आणला. सात चिरंजीवांपैकी एक चिरंजीव म्हणून हनुमंतरायाचा उल्लेख केला जातो. त्यांना मारुती, हनुमान, पवनसुत, अंजनेय, बजरंगबली, वायुपुत्र,केसरीनंदन असे विविध नाव आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी विविध अभंगांमध्ये हनुमंतरायांचे वर्णन केलेले आहे.

हनुमान स्तुतीपर अभंग :

तुकोबारायाच्या अभंग गाथेमध्ये महान भक्त हनुमंताच्या स्तुतीवर काही अभंग आढळून येतात. तुकाराम तात्या पडवळ यांनी संपादित केलेल्या गाथेमध्ये काही अधिकचे अभंग आहेत ते आज या ठिकाणी देत आहे. या अभंगांमध्ये हनुमंताची भक्ती त्यांनी केलेला सीता मातेचा शोध, लक्ष्मणाला वाचवण्यासाठी केलेली मदत, त्यांनी केलेले विविध पराक्रम तसेच त्याच्या मनामध्ये असणारी पवित्रता याविषयी वर्णन आढळून येते.

१.
शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥
शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥
तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥३॥ 
(७०५९)

हनुमंता, तुम्ही प्रभु रामाचे दूत आहात. मी तुम्हाला शरण आलो आहे. हे श्रेष्ट वीरा भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत, त्या मला दाखवा. तुम्ही शुरवीर आणि धैर्यवान आहात. स्वामीचे कुठलेही काम तुम्ही तत्परतेने करता. संत तुकाराम महाराज म्हणतात, हे रुद्रा तुम्ही अंजनिमातेचे सुपुत्र आहात.

२.
केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ॥१॥
ऐसा प्रतापी गहन । सकळ भक्तांचें भूषण ॥ध्रु.॥
जाऊनि पाताळा । केली देवीची अवकळा ॥२॥
राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥३॥
जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥४॥
तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥५॥
(७०६०)

मूळ रामायाणाच्या प्रारंभी मारुती रायाने सितेचा शोध केला. असा हा हनुमंत महान पराक्रमी असून भक्तांचे भूषण आहे. पातळात् जावून त्याने देवीची फजीती केली. अहिरावण-महिरावण या राक्षसांनी राम लक्ष्मणाला चोरून नेले होते; त्या दृष्टांचा वध करुन मारुतीरायाने राम-लक्ष्मण यांना सोडवून आणले. तो हनुमंत रामासमोर हात जोडून उभा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, या वायुसुताचा जप केला तर पाप नाहीशी होतात.

३.

काम घातला बांधोडी । काळ केला देशोधडी ॥१॥
तया माझे दंडवत । कपिकुळीं हनुमंत ॥२॥
शरीर वज्राऐसे । कवळी ब्रह्मांड जो पुच्छे ॥३॥
रामाच्या सेवका । शरण आलो म्हणे तुका ॥४॥
(७०६१)

ज्याने कामाला (वासनेला) बंदिस्त बनवले असून काळावर ज्याची सत्ता आहे. अशा त्या वानरकुळातील हनुमंताला माझा दंडवत आहे. हनुमंताचे शरीर हे वज्राप्रमाणे असून तो नुसत्या शेपटीनेच अख्ख्या ब्रह्मांडाला कवळी घालतो. संत तुकाराम महाराज  म्हणतात, रामाचा सेवक असलेल्या हनुमंताला मी शरण आलो आहे.

४.
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
करोनी उड्डाण । केलें लंकेचें शोधन ॥२॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥
(७०६२)

महाबळी, महापराक्रमी अशा हनुमंताने रावणाची दाढी जाळली होती. त्यांना मी वारंवार, निरंतर नमस्कार करतो. महान समुद्रावर उड्डाण करुन त्याने लंकेचे निरिक्षण केले. संत तुकाराम महाराज म्हणतात, रावणाची लंका ज्याने जाळली, त्या मारुतीरायाचा पराक्रम धन्य होय.

५.
हनुमंत जानकीकिंकर । चालोनी गेला लंकेवर ॥१॥
गेला अशोक वनाला । तेथें देखिली सीतला ॥२॥
फळांचे मिंशे । केला बागेचा विध्वंस ॥३॥
तुका म्हणे जंबुमाळी । रगडिला महातळी ॥४॥
(८४०९)

सीतेचा सेवक असलेला हनुमंत लंकेकडे चालून निघाला आणि तेथे पोहोचला.  तो अशोकवाटिकेत गेला आणि तेथे त्याला माता सीता दिसली.  तेथे त्याला भूक लागली. त्याने फळे खात खात त्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली. संत तुकाराम महाराज म्हणतात, हनुमंताने जंबुमाळी (रावणाचा एक पराक्रमी योद्धा) याला रगडून जोरदार पराभूत करून जमिनीवर आदळले.

६.
अहो अंजनीच्यापुता । नावं तया हनुमंता ॥१॥
जेणें सीताशोधी केली । रामसीता भेटविली ॥२॥
आणोनियां द्रोणगिरी । सौमित्र वांचविला निर्धारी ॥३॥
ऐसा परोपकारी सखा । तया शरणागत तुका ॥४॥
(८४१०)

 अंजनीचा पुत्र म्हणजे हनुमंत असे त्याचे नाव आहे. ज्याने माता सीतेचा शोध लावला आणि श्रीराम व सीतेची पुन्हा भेट घडवून आणली. ज्याने द्रोणागिरी पर्वत आणून लक्ष्मण (सौमित्र) यांचे प्राण वाचवले. असा परोपकारी, मदतीला धावून येणारा सखा (मित्र) हनुमंत त्याला संत तुकाराम महाराज शरण गेले आहेत.

इतर अभंगातील वर्णने :

इतर काही अभंगांमध्ये उदाहरण म्हणून तुकोबारायांनी हनुमंतरायाचा उल्लेख केलेला आहे. त्यातील काही अभंग आपण पाहूया - 

१.
धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता । तैं पाचारिलें होउनि ये वो सीता ।
लाजिन्नली रूप न ये पालटितां । झाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥
 
एकदा या श्रीकृष्णाने गरुडाला आठवून हनुमंताला आपल्या सभेत बोलावून घेतले हनुमंत हा एकनिष्ठ रामभक्त होता त्यामुळे या श्रीकृष्णाने श्रीरामप्रभूचे रुप धारण केले व सत्यभामेला सांगितले की तू सीतेचे रुप घेऊन तेथे यावे. परंतू सत्यभामेला रुप काही पालटता येईना ती स्वत:शीच लज्जित झाली मग त्यावेळी रुक्मिणीने सीतेचे रुप धारण केले व आपण स्वत: राम झाला.   

२.
हनुमंता भेटी गर्व हरीला दोहींचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेच्या ॥

हनुमंत भगवंताला भेटण्यासाठी व्दारकेत आले त्यावेळी गरुडाचा आणि सत्यभामेचा दोघांचाही अभिमान नाहीसा करण्यासाठी देवाने एक युक्ती केली हनुमंताला आणण्यासाठी देवाने गरुडाला पाठविले त्यावेळी गरुड हनुमंताला आपली शक्ती दाखवू लागला तेव्हा हनुमंताने गरुडाला एक तडाखा लावला आणि त्यावेळी गरुडाचा आपल्या बळाविषयीचा अभिमान नाहीसा झाला व नंतर स्वत: श्रीकृष्ण भगवान प्रभू रामचंद्राचे रुप घेऊन हनुमंतास भेटण्यास चालले होते त्यावेळी श्रीकृष्णाने सत्यभामेला सीतेचे रुप घेऊन येण्यास सांगितले परंतु सत्यभामेला सीतेचे रुप धारण करता येईना त्यावेळी सत्यभामेचा आपला रुपाविषयी असलेला अभिमान नाहीसा झाला अशा प्रकारे देवाने सत्यभामा आणि गरुड या दोघांचाही गर्वाचा नाश केला.  देवाने सत्यभामस सांगितले की, तू हनुमंताला प्रसन्न करुन घे आणि हनुमंताला सांगितले की, तू युध्दप्रसंगी रथाच्या ध्वजावर स्थापित व्हावे अशा प्रकारे देवाने दोघांच्याही गर्वाचा नाश केला. 

३.
द्रोणागिरी कपिहातीं । आणविला सीतापती ।
थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥
 
ज्यावेळी लक्ष्मणाला शक्तीबाण लागला त्यावेळी हनुमंताच्या हाती द्रोणागिरी पर्वत आणविला.  

४.
'याती गुणे रूपे काय ते वानर |  तयाच्या विचारे वर्ते राम ||
ब्रह्म हत्याराशी पातकी अनेक |  तो वंद्य वाल्मीक तिही लोकी ||
तुका म्हणे नव्हे चोरीचा व्यापार | म्हणा रघुवीर वेळोवेळा ||' 

आपण प्रभू रामचंद्राचा वापर करून विविध जाती, विविध धर्माशी लढतो, विद्वेष पसरवतो. तुकोबाराय सांगतात बाबांनो....! त्या वानरांची कोणती जात होती ? त्यांच्यामध्ये कोणता असा खास गुण होता ? त्यांचं रूप तरी चांगलं होतं का ? परंतु माझा प्रभुराम ते सांगतील तसे वागायचा. त्यांच्या विचारानुसार वर्तणूक करायचा.

याप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी मारुतीराया म्हणजेच हनुमंताचे वर्णन आपल्या अभंगातून केलेले आहे. हनुमंतराया म्हणजे भक्तीचे शुद्ध सात्विक रूप आहे. त्यांच्या जीवन चरित्रातून आपण काही गोष्टी नक्की शिकू शकतो. आपण निवडलेल्या मार्गावर किती ठाम असलं पाहिजे, आपल्या वाट्याला आलेलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे, कितीही कठीण मार्ग असला तरी आपला पक्का विश्वास असेल तर आपण आपल्या कामांमध्ये नक्की यशस्वी होऊ शकतो. मोठ्यात मोठं कठीण कामसुद्धा आपण सहज करू शकतो. ते करत असताना आपली जात,आपला धर्म किंवा आपलं बाह्य स्वरूप आपल्याला अडव येत नाही. महान बनण्यासाठी मोठ होण्यासाठी आपल्याला कशाची गरज नाही फक्त आपण आपल्या कामावर विश्वास ठेवायचा आणि जे काही करायचं ते पवित्र करायचं. हे जर केलं तर नक्कीच हनुमंतरायाची खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली असं होईल. सीता मातेचा शोध घेण्यासाठी स्वतः हनुमंतराया उड्डाण मारून ते लंकेमध्ये गेले, कुठला जादूटोणा किंवा बुवाबाजी केली नाही. लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागली, बाण लागला त्यावेळेसही कुठल्या बुवाच्या मंत्रातंत्रणे, जादूटोण्याने ते नीट केलं नाही तर त्यासाठी संजीवनी नावाची वनस्पती म्हणजे औषधी आणून लक्ष्मणाला नीट केलं. म्हणजे आपलं कल्याण कुठला बुवा, बाबा करू शकत नाही हे लक्षात ठेवा. आपलं काही दुखायला लागलं तर आपल्याला दवाखाना, औषधोपचार हे कामाला येतात हे यावरून सिद्ध होतं. आपली भक्ती एकनिष्ठ भक्ती असावी. राम सोडून इतर कुठल्याही देवाची त्यांनी भक्ती केली नाही. त्याप्रमाणे आपणही एकनिष्ठ भाव आणि भक्ती करावी असा तुकोबारायाच्या या अभंगातील एकंदरीत भाव आहे. याचा नक्की आपण विचार केला पाहिजे. सर्वांना हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा....!

राम कृष्ण हरी जय जगद्गुरु ❤️

◾ श्रीकृष्ण महाराज उबाळे 
◾ मो. 9405344642

#हनुमानजयंती #हनुमंतस्तुती #तुकाराममहाराज #अभंगगाथा #रामभक्तहनुमान #मारुतीराया #भक्तीमार्ग

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी