सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत.....!!
सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत.....!! सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात तसेच प्रत्येक जिल्ह्यात, आपल्या बीडमधील आजूबाजूच्या तालुक्यांत आणि गावोगावी एकच चर्चा चालू आहे की बिबट्यांची दहशत वाढली, बिबट्या गावात शिरला, शेतात दिसतोय, माणसांवर हल्ले होतातायत. हे ऐकल्यावर भीती वाटणं साहजिक आहे, पण थोडं शांतपणे विचार केला तर कळतं की खरंतर दहशत बिबट्यांची नाही, दहशत आपल्या गैरसमजांची आहे. बिबट्या हा काही आज कालच जंगलातून बाहेर पडलेला प्राणी नाही, तो इथेच होता, आपल्या आजोबांच्या काळातही होता, फरक एवढाच आहे की तेव्हा जंगलं, झुडपं, डोंगररांगा होत्या, आज तिथं रस्ते झाले, कारखाने झाले, वसाहती वाढल्या, उसाची शेती सगळीकडं पसरली आणि बिबट्याचा आसरा कमी झाला. जिथं लपायला उस आहे, पाणी आहे, मोकाट कुत्रे आहेत, डुक्कर आहेत, शेळ्या, मेंढ्या आहेत, तिथं बिबट्या येणारच, त्याला गावात यायची हौस नसते, त्याला फक्त पोटाची आणि जगायची गरज असते. लोक म्हणतात बिबट्यांची संख्या फार वाढली, पण खरं सांगायचं तर बिबट्यांपेक्षा माणसांची संख्या आणि आपला निसर्गातला हस...