पंढरीची आषाढी वारी २०२५- एक आत्मानुभूती
◆पंढरीची आषाढी वारी – एक आत्मानुभूती◆ ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642 आषाढी एकादशी... भक्तांच्या जीवनातील सर्वोच्च पर्व. आमच्यासाठी ती केवळ एक धार्मिक घटना नव्हती, तर आत्म्याच्या पंढरीकडे झालेली यात्रा होती. शनिवार रात्री दोन वाजता झोप लागली आणि आश्चर्य म्हणजे रविवारी पहाटे पाचलाच जाग आली. एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. मी वारकरी सेवा केंद्रात जाऊन फ्रेश झालो, थंड पाण्याच्या टँकरखाली अंघोळ केली. तुकाराम महाराज घाडगे यांची दिंडी होती तिथेच आमची गाडी लावली. सकाळच्या शांततेत चहा, भाजलेल्या शेंगा आणि थोडीशी साबुदाणा खिचडी खाल्ल्यावर वाखरीहून पंढरीकडे चालण्याचा निर्धार केला. मार्गक्रमण सुरू झालं… ओठांवर अभंग, हाती टाळ, मनात विठ्ठल. जे अभंग पाठ नव्हते, ते मोबाईलमधून पाहून म्हणत होतो. "विठ्ठल" नाव जिथे जिथे आले, तो प्रत्येक अभंग आम्ही तोंडून घेतला. वाटेतील प्रत्येक पायरी ही जणू विठ्ठलाकडे नेणारी होती. प्रत्येक वळणावर विविध दिंड्या, ढोल, मृदंग, झांज, टाळकरी, विणेकरी, बुवा, माऊल्या, लहान थोर नाचत, गात विठ्ठलनामात रंगलेले दिसत होते. पोलिस, होमगार...