पंढरीची आषाढी वारी २०२५- एक आत्मानुभूती
◆पंढरीची आषाढी वारी – एक आत्मानुभूती◆
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642
आषाढी एकादशी... भक्तांच्या जीवनातील सर्वोच्च पर्व. आमच्यासाठी ती केवळ एक धार्मिक घटना नव्हती, तर आत्म्याच्या पंढरीकडे झालेली यात्रा होती. शनिवार रात्री दोन वाजता झोप लागली आणि आश्चर्य म्हणजे रविवारी पहाटे पाचलाच जाग आली. एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. मी वारकरी सेवा केंद्रात जाऊन फ्रेश झालो, थंड पाण्याच्या टँकरखाली अंघोळ केली. तुकाराम महाराज घाडगे यांची दिंडी होती तिथेच आमची गाडी लावली. सकाळच्या शांततेत चहा, भाजलेल्या शेंगा आणि थोडीशी साबुदाणा खिचडी खाल्ल्यावर वाखरीहून पंढरीकडे चालण्याचा निर्धार केला. मार्गक्रमण सुरू झालं… ओठांवर अभंग, हाती टाळ, मनात विठ्ठल. जे अभंग पाठ नव्हते, ते मोबाईलमधून पाहून म्हणत होतो. "विठ्ठल" नाव जिथे जिथे आले, तो प्रत्येक अभंग आम्ही तोंडून घेतला. वाटेतील प्रत्येक पायरी ही जणू विठ्ठलाकडे नेणारी होती. प्रत्येक वळणावर विविध दिंड्या, ढोल, मृदंग, झांज, टाळकरी, विणेकरी, बुवा, माऊल्या, लहान थोर नाचत, गात विठ्ठलनामात रंगलेले दिसत होते. पोलिस, होमगार्ड, डॉक्टर आणि सेवा करणारे नागरिकही उत्साहाने कार्यरत होते. प्रत्येक पावलागणिक "विठ्ठल-विठ्ठल","माऊली-माऊली"च्या घोषात आम्ही हरवून गेलो. आम्ही दगडी पुलावर पोहोचलो. पुलाच्या अलीकडे बाबा महाराज सातारकर यांच्या कन्येचं कीर्तन चालू होतं. त्यांच्या स्वरांतून आणि शब्दांतून विठ्ठलाचं दर्शन झालं. पुलावरून पाहिलं तर, चंद्रभागेच्या पाण्यात लाखो भाविक स्नान करत होते. त्या जलप्रवाहात देहभान विसरून आत्मा विठ्ठलात रंगला होता. वाद्यांच्या गजरात, विठ्ठलनामाच्या गजरात प्रत्येक जण दंग होता. टाळ, मृदंग, हलगी, झांज आणि खंजिरीचा निनाद आणि ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’चा घोष आसमंत भारून टाकत होता. तिथे वासुदेव, जोशी, पिंगळा, कुर्मुड्या, कीर्तनकार, गायक, विणेकरी, तृतीयपंथी, लहान थोर सारेच एकरूप झाले होते. इथे जात, धर्म, लिंग, वय, भाषा काहीही न राहता एकच ओळख – ‘मी वारकरी’ हीच होती.
"सकळांशी येथे आहे अधिकार l"
"या रे या रे लहान थोर l याती भलत्या नारी नर ll"
"भेदाभेद भ्रम अमंगळ l''
"अवघी एकाचीच वीण l तेथे कैची भिनाभिन्न ll"
याची प्रचिती आली.
वाळवंटातील त्या अद्भुत वातावरणात स्नानानंतर आम्ही पुंडलिक मंदिराजवळ गेलो. दर्शन घेतले. मुनी पुंडलिकाचे वर्णन करणारे अभंगांचे गायन केले. तिथे थोडीशी विश्रांती घेतली आणि मग पांडुरंगाच्या मंदिराकडे वाटचाल केली. मंदिरासमोर बारीत उभं राहण्यास वेळ लागला असता कारण आम्हाला सोमवारी कामावर हजर व्हायचे होते. म्हणून आम्ही कळस दर्शन घेतलं. मंदिराचं फुलांनी सजलेलं रूप पाहून डोळ्यांना समाधान लाभलं. देवळाचं शिखर, ध्वज, नटवलेली मूर्ती आणि भक्तांचा जल्लोष – सगळं काही अवर्णनीय होतं. नंतर एका कर्नाटक मठात गेलोत. तिथे कीर्तन चालू होते. अभंग मराठीत, पण विश्लेषण कन्नडमध्ये होतं. काही समजलं नाही, पण भावना मात्र थेट हृदयाला भिडली. "भाग्यवंत मानू तया शरण गेले पंढरीराया" ऐकताना अंगावर शहारे आले. त्यानंतर मंदिराची प्रदक्षिणा केली आणि नगर प्रदक्षिणेमार्गावर आलो. लाखो भाविक विठ्ठलनामात रंगले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती, आनंद आणि समाधान दिसत होते. वाटेतील गर्दी, थकवा आणि गरमी काहीच जाणवत नव्हती. नगर प्रदिक्षणा झाल्यावर आम्ही गजानन महाराज मठात गेलो, तिथे दर्शन घेतलं, थोडं फराळ केलं. मठाचे नियोजन, स्वच्छता आणि शिस्त पाहून मन भरून आलं. इतक्या मोठ्या गर्दीतही अचूक प्रशासन पाहिलं आणि खरंच त्यांना सलाम केला. सात-आठ तास चालल्यानंतर आम्ही श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या मठात गेलो. माझी आई नारायणगडच्या दिंडीत सहभागी होती, पण भेट झाली नाही. थोडासा आराम घेतला. त्यानंतर निलेश कुहिरे सरांना गावाकडे निघायचं होतं, म्हणून आम्ही पंढरीला निरोप देण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी सहा वाजत आले होते. गर्दी वाढत होती. आम्हाला पंढरी सोडताना खिन्नता जाणवत होती. एक रिक्षा पकडून आम्ही गाडीजवळ आलोत. थोडी खरेदी केली आणि रात्री एकच्या सुमारास बीडमध्ये परत पोहोचलो.
◆पंढरीचं महात्म्य – आत्मशुद्धीची भूमी:
पंढरपूर ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आत्मशुद्धीची, भावविश्वातील पवित्र भूमी आहे. इथे आल्यावर अहंकार गळून पडतो, मन निर्मळ होतं. संतांनी जेव्हा ‘विठ्ठल हा माझा जीव आहे’ असं म्हटलं, तेव्हा त्यामागे असा अनुभव होता. चंद्रभागेच्या पाण्यात स्नान म्हणजे देहाच्या बंधनांतून मुक्त होणं आणि देवाच्या चरणाशी आपली समर्पण भावना व्यक्त करणं. ‘विठ्ठल विस्तारला जनी', 'जनी जनार्दन’, हे वाक्य इथे साक्षात अनुभवायला मिळतं. ही वारी म्हणजे चालत चालत देवाकडे जाणं, भक्तीने आपली मर्यादा ओलांडणं आणि आत्म्याशी एकरूप होणं. ती ‘वारी’ नव्हे – ती ‘वारीची अनुभूती’ आहे.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल !
श्री ज्ञानदेव तुकाराम !
पंढरीनाथ भगवान की जय !
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642
#आषाढीवारी2025 #पंढरपूरवारी #विठ्ठलनामाचागजर #माझीवारी
#तुकाराममाऊली #ज्ञानोबामाऊली
#चंद्रभागेस्नान #पुंडलिकवरदाहरीविठ्ठल
#वारीचीअनुभूती #भक्तिरसातनितळले
Comments
Post a Comment