वैचारिक दहशतवाद : लोकशाहीला गळा दाबणारी नवी यंत्रणा
वैचारिक दहशतवाद : लोकशाहीला गळा दाबणारी नवी यंत्रणा
आपण २१व्या शतकात आहोत, जग झपाट्याने पुढे जात आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैचारिक प्रगल्भता यामध्ये मानवी इतिहासात आजवर कधीच नव्हता इतका विकास झाला आहे. पण दुर्दैवाने, भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये आज "विचार मांडणं" हे गुन्हा ठरत आहे. व्यक्ती स्वातंत्र्याची ग्वाही देणाऱ्या संविधानाच्या या भूमीत जर कोणी सत्य मांडत असेल, विद्रूपतेवर बोट ठेवत असेल, इतिहासाची चिकित्सा करत असेल – तर त्याला चूप करण्यासाठी सरळ हत्या केली जाते. हे लोकशाहीचे लक्षण नव्हे, तर ही वैचारिक दहशतवादाची टोकाची विकृती आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी यांचं काय चुकलं होतं? त्यांनी कोणाला मारलं? त्यांनी कोणाचा धर्म पायदळी तुडवला? त्यांनी फक्त प्रश्न विचारले. अंधश्रद्धा, जात, धर्म या ढोंगांमागचं सत्य लोकांसमोर मांडलं. पण याच विचारांमुळे त्यांचा काटा काढण्यात आला. समाजाने जिथं अशा विचारवंतांचा सत्कार व्हायला हवा होता, तिथं त्यांना बुलेट मिळाली. आजही या हत्याकांडांचे मास्टरमाइंड कोठं आहेत, याचं उत्तर कोण देणार?
आज प्रवीण गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. कारण काय? त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा शोध घेण्याचा, त्यांचा ऐतिहासिक संदर्भ मांडण्याचा प्रयत्न केला. आज शिवरायांवर प्रेमाचा, अभिमानाचा ठेका घेतलेल्यांची एक मॉरल पोलिसिंग गँग तयार झाली आहे. हे लोक कोणतंही ऐतिहासिक भाष्य, अभ्यास, तर्क, संशोधन सहन करत नाहीत. त्यांना हवं तेच खरे. बाकी सगळं देशद्रोह! ते शिवरायांच्या नावाने शिवीगाळ करतात, धमक्या देतात, हल्ले करतात, पण स्वतःला 'शिवप्रेमी' म्हणवतात – याहून मोठं पाखंड दुसरं काय असेल?
राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, कोषारी तात्या, छिंदम यांच्यावर हल्ला होत नाही. कारण ते सत्ताधाऱ्यांच्या डाव्या बाजूला उभे आहेत. म्हणजेच या वैचारिक दहशतवादाला सरळसरळ राजकीय पाठबळ आहे. सोशल मीडियावर कोणावर टीका केली की पोलीस दारात उभे राहतात, पण कुणीतरी कोणाला मारण्याची धमकी देतो, प्रत्यक्ष हल्ला करतो – तेव्हा सिस्टीम गप्प. कारण ही सिस्टीम एकीकडे लोकशाहीचे मुखवटे घालून, दुसरीकडे हुकूमशाहीची लाठी घेऊन विचारवंतांचा गळा आवळते. विरोध हा विचारांचा असावा, व्यक्तींचा नव्हे. पण येथे आधी विचाराला विरोध, मग त्याला बदनाम करणं, त्याच्यावर टीका नव्हे तर दहशतीची मोहीम, नंतर हल्ला – मग त्याच्या मृत्यूचा गौरव आणि शेवटी त्याच्या नावावरच खोटा प्रचार! ही पद्धत केवळ दहशतवादीच वापरतात. आज गरज आहे ती लोकशाहीचे खरे पालन करणाऱ्या नागरिकांची. जे विरोध करतील, पण विरोधकाला ऐकतील. विचाराला उत्तर देतील, पण विचारवंताला संपवणार नाहीत. अन्यथा उरलेली लोकशाहीही फक्त निवडणुका आणि जाहिरातींपुरती मर्यादित राहील. प्रत्येकवेळी विचारवंतांचा खून झाला, तरी विचार कधीच मरत नाही. त्याचं बीज पुन्हा कुठंतरी फुटतंच! आणि पुन्हा पेटतं. त्यावेळी कोण कुठं लपून बसलेलं असतं, हे इतिहास बरोबर नोंद ठेवतो.
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642
#विचारस्वातंत्र्य #वैचारिकदहशतवाद #लोकशाहीचीहत्या #दाभोळकरपानसरे
#प्रवीणगायकवाड #मुक्याविचारांचीअर्जव
#विचारांना_गोळ्या_नको #विचार_अमर_आहेत
#शिवरायांचा_खरा_इतिहास #मतमांडण्याचा_अधिकार
#भीतीमुक्तभारत #संविधान_वाचवा
#स्वतंत्रविचार #हक्कासाठीलढा
#पत्रकारिता_धोक्यात #भविष्यासाठीविचार
#विचारांवरहल्ला #बोला_मुक्तपणे
#सत्याचीजिंक #भीतीच्या_पलीकडे
Comments
Post a Comment