कुत्र्याच्या तावडीतून निलगाईच्या पिल्लाला वाचवले

■🦌 "नीलूचं सुटणं" 🦌■

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◆मो.9405344642
आज दुपारची वेळ होती. आम्ही गुरुजी मंडळी जेवायला बसलो होतो. एवढ्यात आमचं एका चिमुकल्याने आमच्याकडं धाव घेतली.

"सर, सर... गेटजवळ कुत्रं हरणाच्या पिल्लाला चावतंय!"

हे ऐकताच मी एकदम उभं ठाकलो. मी ताबडतोब तिकडं पळत गेलो. तिकडं पोचलो तर काय, एक छोटंसं पिल्लू धसकटून बसलं होतं, तोंडाला थोडंफार रक्त लागलेलं. त्याच्या मागे एक कुत्री लागलेली, पण काही धाडसी मुलांनी धडपडत त्या कुत्रीला हुसकावून लावलं होतं.

"सर, हरण दिसतंय हं हे!" – एका मुलाचं म्हणणं.

मी नीट पाहिलं, तर ते हरण नव्हतं, तर ते होतं नीलगायचं पिल्लू! अगदी छोटूशं, लाजरं, घाबरलेलं.

मी मुलांना शांत बसायला सांगितलं. "गोंधळ नाय करायचा. हे बिचारं थरथर कापतंय." मी त्याच्या अंगावरून हात फिरवला. मुलांनीही मायेने त्याला हात लावला. त्याच्या तोंडातून थोडंफार रक्त दिसत होतं. दोन-तीन ठिकाणी चावलेलं होतं. एक मुलगा पाण्याची बाटली घेऊन आला. मी हळूच त्याला पाणी पाजलं. पिल्लू थोडंसं विश्वासाने बघू लागलं.
त्यानंतर सर्व मुलांना मैदानामध्ये बसवलं.नीलगाई विषयी मला माहित असलेली माहिती मुलांना सांगितली. मुलांनी ती माहिती कुतूहलाने ऐकली.

मुलं म्हणतात, "सर, या मागं नीलगायी नदीपलीकडं बघीतल्यात!"

"बरं, चला मग… आपण त्याला तिकडं घेऊन जाऊ," मी म्हणालो.
गाडीवर पिल्लू मुलाच्या मांडीवर नीट बसवलं. त्याचं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं होतं. वाटंभर ते कधी डोळे बंद करत होतं, कधी उघडून चोहीकडं बघत होतं. नदी पार करून आम्ही एका मोकळ्या कुरणात गेलो. इथंच नीलगायी पळताना दिसायच्या, असं मुलं सांगत होती. पिल्लूला खाली सोडलं. त्यानं जरा इकडं-तिकडं बघितलं, मग एका झाडाकडं पाहून मोठ्यानं ओरडलं. आमचं काळीज हललं. वाटलं — आईला हाक मारतोय की काय? पण दुसऱ्या क्षणाला तो वाऱ्याच्या वेगानं धावत निघून गेला... झुडपांआड... मोकळ्या रानात. मी मनातल्या मनात प्रार्थना केली –
"देवा, त्याची आई मिळावी... हे पिल्लू सुखरूप राहावं...!"
🟢 बालकांना शिकवण:

प्रत्येक जीवाची किंमत असते. धाडस, करुणा आणि संवेदनशीलता ही माणूसपणाची खरी ओळख आहे.

लेखन: 
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◆मो.9405344642

#नीलगायपिल्लू #NilgaiRescue #नीलूचंसुटणं #बालकथा #RealLifeStory #AnimalRescue
#जिवदया #प्राणीमित्र #SchoolHeroes
#NatureLove #वन्यजीवसंवर्धन #SaveWildlife #माझीशाळा
#ZPSchoolPatharwalaBk #AmbadTaluka #JalnaDistrict
#TeacherWithHeart #छोट्यांचेमोठंधाडस
#InnocentLifeSaved #मराठवाडाकथा

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'