आगळी वेगळी 'गुरुदक्षिणा'
◆आगळी वेगळी 'गुरुदक्षिणा'◆
पाथरवाला बु. शाळेत रुजू झाल्यापासून अनेक गोष्टी अनुभवास येत होत्या, पण आजचा दिवस काहीसा वेगळा होता...! एक प्रेमळ, गोड अनुभव देणारा. शाळेत रोज जसे रोजचे कामकाज, अभ्यास, मुलांचा गोंधळ, शिक्षकांची लगबग सुरूच असते. पण आज गुरुपौर्णिमा... आणि त्या निमित्ताने आलेला ‘गुरुप्रेमाचा’ असा एक अनोखा क्षण- जो मनात खोलवर रुतून बसला आहे. मगर आजी - आमच्या शाळेची खिचडी शिजवणारी स्त्री - वयाने वाकलेली पण मनाने तेजस्वी. अत्यंत सुस्वभावी, शांत, स्वच्छताप्रिय. त्या स्वयंपाकघरात खिचडी शिजवत असतात, पण त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न. त्या अन्न फक्त शिजवत नाहीत, ते प्रेमाने, भक्तीने भरलेले अन्न असते. मी शाळेत नुकताच रुजू झालो होतो. काही दिवसांतच त्यांना समजलं की मी कीर्तन, भजन, प्रवचन करतो. वारीचे अनुभव सांगतो. अभंग गातो. ही बातमी त्यांच्या पर्यंत पोहोचली आणि मग एक दिवस त्या स्वतःहून माझ्याजवळ आल्या. फारसा गोड संवाद नव्हता, पण डोळ्यांत भक्ती होती. त्यांनी एक मागणी केली -"मास्तर, तुम्ही पांडुरंगाची माळ घालता ना? मला पण घाला माळ, तुमच्याहातूनच." माझ्यासाठी तो क्षण अनपेक्षित होता. मी क्षणभर स्तब्ध झालो. ही एक साधी खिचडी शिजवणारी आजी, मला ‘गुरू’ समजून माळ मागते आहे? पण त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, भक्ती होती. मी शांतपणे त्यांच्या डोक्यावर माळ घातली. त्या क्षणी मला वाटलं- ‘आज नातवाच्या वयाची एक शिष्या, आजी झाली’.
गुरुपौर्णिमा आली. माझं नेहमीचं धोरण - "मी पाया पडू देत नाही" हे त्यांना ठाऊक होतं. पण आज त्यांनी प्रेमाने, ओंजळीत एक गोड पेरू माझ्यासमोर ठेवला. "गुरुपौर्णिमेचं गुरुदक्षिणा आहे मास्तर," त्यांनी हसत म्हटलं. माझे डोळे पाणावले. हे काही केवळ पेरू नव्हता - हा त्यांच्या मनाचा तुकडा होता. त्यांनी माझा पाया पडायचा हट्ट केला नाही, पण आपली भक्ती त्यांनी गोडीने व्यक्त केली. त्या दिवशी मी वर्गात मुलांना गुरुपौर्णिमेचं महत्त्व, मराठी महिन्यांची ओळख, शुद्ध मराठी तारखा, दोन पक्ष इत्यादी शिकवत होतो. आणि ती आजी हळूहळू वर्गात आल्या, गालातल्या गालात हसत. त्यांनी मुलांकडे पाहिलं आणि माझ्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकून पेरू माझ्या हाती दिला. माझ्या मनात शब्दच उरले नाहीत. मी तो पेरू नतमस्तक होऊन स्वीकारला. आजच्या दिवशी ‘गुरु’ या शब्दाचा अर्थ मला त्या आजीकडून समजला. तो माळ घालणारा क्षण, तो पेरू देणारा प्रसंग, आणि तो त्यांच्या डोळ्यातला भक्तीचा झरा - हे सर्व मला एक वेगळं ज्ञान देऊन गेले.
गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारा शिक्षक नाही. आणि शिष्य म्हणजे फक्त पुस्तकं वाचणारा विद्यार्थी नाही. गुरु-शिष्य हे नातं भावाचं असतं, समर्पणाचं असतं. आजी जरी वयाने मोठ्या होत्या, तरी त्या मला गुरू मानत होत्या. आणि मी — त्यांच्या समोर एकदम लहान भासलो. मी तर फक्त अध्यापन करत होतो, पण त्या माझ्याकडून आंतरिक शांती, भक्ती अनुभवत होत्या. त्या पेरूसोबत त्यांनी जे प्रेम दिलं, ते शब्दात मावणं कठीण आहे. आयुष्यात लाखो वस्तू भेटी म्हणून मिळतात, पण त्या पेरूला गुरुदक्षिणेचं नाव देणारी ही आजी — त्यांनी माझा आजचा दिवस अविस्मरणीय केला. त्या खिचडी शिजवणाऱ्या माऊलीने मला पांडुरंग दाखवला. आज पांडुरंग माळेत नव्हता, पेरूत होता... त्या डोळ्यांत होता. त्या भक्तीत होता. आणि त्या गंधात होता जो त्यांच्या हातातून माझ्यापर्यंत पोहोचला. मी तो पेरू घेतला, डोळे मिटले आणि मनात म्हटलं-"माऊली, आज खरं गुरुत्व तुझ्यात पाहिलं... माझं ‘शिक्षक’पण तुझ्या चरणी अर्पण...!”
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642
#गुरुपौर्णिमा #शाळेतीलआजी #गुरुदक्षिणा
#प्रेमाचंनातं #माझीशाळा #शिक्षकदिन
#गुरूशिष्यबंध #पाथरवाला_बु #माळआणिपेरू
#खिचडीचीमाऊली #ग्रामीणशाळा #हृदयस्पर्शीक्षण
#विठोबाचेमाऊली #मराठीशाळा #शिक्षकमनातीलकथा
Comments
Post a Comment