होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी

◆ वारीचा दिवस, भक्तीचा प्रवास ◆

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642
आम्ही – निलेश कुहिरे महाराज, कैलास गवळी महाराज, गणेश सारूक सर आणि मी – चौघांनी मिळून यंदाच्या पंढरपूर वारीचं बेत ठरवलं. मनात विठ्ठलाच्या भेटीची ओढ, अंगात भक्तीचा आवेश, आणि ओठावर सतत हरिनाम. शनिवारी सकाळी जायचं ठरलं आणि त्याप्रमाणं आम्ही सकाळी सात वाजता बीडहून निघालो. गाडीत बसल्यापासूनच वातावरण एकदम भक्तिमय झालं. कोणीतरी अभंग म्हणायला सुरुवात केली, मग दुसऱ्यानं सूर धरला, आणि पुढची वाटचाल झाली ती विठ्ठलनामातच. गाडी सुसाट धावत होती, पण मनात मात्र शांत भक्तीची गती होती. वाटेत धार्मिक चर्चा, संतांच्या गोष्टी, कीर्तनातले अनुभव यावर रंगल्या गप्पा. कुणीतरी म्हणालं, "म्हणावं वाटतंय, आपलं आयुष्यही अशीच एखादी वारी व्हावी!" सर्वांच्या माना हलल्या... खरंच भावनिक क्षण होता तो.

◆ तुळजाभवानी मातेच्या चरणी :
साधारण ११ च्या दरम्यान आम्ही तुळजापूरला पोचलो. तिथं कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. भजन थांबलं, पण मनात अखंड जप सुरुच होता. मंदिरात पाऊल ठेवताक्षणी डोळ्यांत पाणी आलं. काय सांगू... त्या मातेला पाहून अंगभर काटा आला. सगळ्यांनी शांतपणे दर्शन घेतलं, काही फोटो काढले आणि पुढच्या वाटेवर लागलो.

◆ शेतातली जेवणावळ :
दुपार जवळ आली होती, ११ ते  साडेअकरा वाजले असतील. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले. वाटेच्या कडेला एक हिरवंगार शेत दिसलं. गाडी बाजूला लावून आम्ही तिथंच विसावलो. प्रत्येकानं डबे उघडले – कुणाकडे भाकरी, कुणाकडे पिठलं, कुणाकडे गोड भात. त्या मोकळ्या आकाशाखाली, वारकऱ्यांच्या साथीने जेवणाची जी चव होती ती शब्दात सांगणं कठीण आहे. जेवण झाल्यावर थोडा वेळ हरिपाठ, मग पुन्हा गाडीत बसलो. गाडी सुरू झाली आणि पुन्हा अभंग सुरू झाले. एकनिष्ठ आवाज, ताल, आणि मनाला भिडणाऱ्या ओव्या – सगळं इतकं भक्तिभावानं भरलेलं होतं की वाटेचा थकवा जाणवतच नव्हता.

◆ सोलापूर ओलांडून वाखरीत पदार्पण: 

दुपारी आम्ही सोलापूर ओलांडून आम्ही वाखरीला पोहोचलो. तिथं वारकऱ्यांची दिंडी आणि पालखी सोहळ्याचं विसाव्याचं ठिकाण होतं. आम्ही गाडी एका बाजूला लावली आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी, अश्व आणि बैल यांचं दर्शन घेतलं. काय तेज होतं त्यांच्या डोळ्यांत! वारकऱ्यांनी त्यांना हार घातले होते,  बैल शांतपणे उभे होते – जणू काही देवच अवतरले होते.

◆ वारीची नांदी – भावभक्तीचा संग :
पुढे आम्ही वरकऱ्यांच्या दिंडीत मिसळून पंढरपूरकडे पायी चालायला सुरुवात केली. वाटेत संत तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ यांच्या पालख्यांचं दर्शन झालं. प्रत्येक ठिकाणी नृत्य, भजन, टाळ- मृदुंगाचा गजर, जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल माझाचा घोष – भक्तीच्या सागरात बुडून गेलो होतो. कुणी डोक्यावर पताका घेतलेली, कुणी टाळ वाजवत होता, कुणी आपल्या छोट्या लेकरासोबत चालत होता, कुणी तुळशी वृंदावन घेऊन चालत होतं, कुणी फुगड्या खेळत होत. त्या वातावरणात कोणाची जात, धर्म, लिंग, पद, पैसा काहीही महत्त्वाचं नव्हतं – फक्त एक ओळख होती, ती म्हणजे "मी वारकरी!" आपण किती छोटे आहोत..अहंकारी आहोत याची प्रचिती तो भक्तीसागर बघितल्यावर येते. डोळ्यात पाणी येत, अंगावर रोमांच उभे राहतात, मती गुंग होते. संत चोखोबाराया म्हणतात-

"टाळी वाजवावी गुढी उभारावी l
वाट ती चालावी पंढरीची ll
खटनट यावे शुद्ध होऊनी जावे l
दवंडी पिटी भावे चोखामेळा ll"

◆ दुधपंढरी – मित्रमिलन आणि हरिपाठ व प्रवचन: 

दुधपंढरी येथे आमचे मित्र, मार्गदर्शक तुकाराम घाडगे महाराज यांची दिंडी होती. आम्ही त्यांना भेटलो. ते खूप प्रेमानं बोलले. त्यांनी विचारपूस केली, आम्हाला क्षेमकुशल जाणून घेतलं. मग हरिपाठ सुरू झाला. मी आणि कैलास महाराज – आम्ही दोघांनीही प्रवचन केलं. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. 'एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर मी माझे विचार मांडले. आमचं महाराजांनी भरभरून कौतुक केलं. घाडगे महाराजांची संपूर्ण गाथा पाठ आहे. ते गाथामूर्ती आहेत. "ह्या विठोबाच्या वारीत जे पावलं चालतात, ती पावलं नुसती चालत नाहीत – ती परमार्थाकडे वाटचाल करतात," असं मी म्हटलं आणि उपस्थित वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्यानंतर तिथंच भोजन झालं. साधं पण तृप्त करणारं. नंतर गाडीपर्यंत परत रिक्षाने आलोत.  वारकरी सुविधा केंद्रात विश्रांती घेतली. सगळे दमलेले होते, झोपायला गेले. पण मला झोप काही येईना. नवी जागा, तिथं सुरु असणारे फोकस आणि उद्याची आषाढी एकादशी आणि विठुरायाच्या भेटीची ओढ – या साऱ्यानं मन भरून आलं. मध्यरात्र होऊन गेली, दोन वाजले तरी मी छताकडं पाहत पडून होतो. मनात एकच विचार – उद्या विठोबाच्या भेटीचा दिवस! पंढरपूर केवळ ५-६ किलोमीटर दूर आहे. उद्या हजारो भाविकांमध्ये आपणही विठ्ठलाचं नाम घेणार – त्याचं दर्शन घेणार – ह्या कल्पनेनंच डोळे ओलावले.

"नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥
माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरीजन ॥
न धरिती लाज । नाहीं जनासवें काज ॥
तुका म्हणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥"

◆वारी म्हणजे काय रे बाबा?:


वारी म्हणजे नुसती चाल नाही – ती चाल म्हणजे चालती समाधी असते. शरीर थकतं, पाय दुखतात, पण मन मात्र हलकं होतं. दर पावलागणिक जन्मोन्मुख आनंद मिळतो. विठोबा दिसतो, वाटेवर संत भेटतात, आणि भक्तीचे झरे अंतःकरणात उगम पावतात. यंदाची वारीही तशीच झाली – जिवंत, मनात कोरली गेलेली, आणि एक अनमोल आठवण म्हणून जपावी अशी. विठोबा अजून दर्शन द्यायचा बाकी आहे, पण त्याचं प्रेम, त्याची वाट, आणि त्याची भक्तमंडळी यांचा अनुभव हीच खरी भेट वाटते. "पंढरीची वाट ही प्रेमाची वाट आहे, या वाटेवर पावलं नव्हे, हृदय चालतं." शेवटी एकच गोष्ट सांगावी वाटते-

"होयें होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥
काय करावीं साधनें । फळ अवघेंचि येणें ॥
अभिमान नुरे ।  कोड अवघेंचि पुरे ॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥"

जय विठ्ठल जय जगद्गुरू....!!

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642

#वारी2025 #पंढरपूरवारी
#विठुरायाचा_भक्त #आषाढीएकादशी
#ज्ञानोबा_तुकाराम #हरिनामाचा_गजर
#टाळ_मृदंग_भक्ती #संतपरंपरा
#पंढरपूरचीवाट #चोखामेळा #माऊलीमाउली #वारीचीशान #वारकऱ्यांचीदिंडी #भक्तीचीवाट
#विठोबा_माऊली #तुकाराम_महाराज
#ज्ञानेश्वरीवारी #संतांचीपदस्पर्श
#Wari2025 #PandharpurWari #VithobaBhakt #AshadhiEkadashi
#HarinaamSankirtan #SantTukaram
#SantDnyaneshwar #WarkariTradition
#BhaktiMovement #VarkariSampraday
#PadayatraToPandharpur #SpiritualWalk #FaithAndDevotion #SantParampara #marathiCulture

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'