होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी
◆ वारीचा दिवस, भक्तीचा प्रवास ◆ ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे ◆मो.9405344642 आम्ही – निलेश कुहिरे महाराज, कैलास गवळी महाराज, गणेश सारूक सर आणि मी – चौघांनी मिळून यंदाच्या पंढरपूर वारीचं बेत ठरवलं. मनात विठ्ठलाच्या भेटीची ओढ, अंगात भक्तीचा आवेश, आणि ओठावर सतत हरिनाम. शनिवारी सकाळी जायचं ठरलं आणि त्याप्रमाणं आम्ही सकाळी सात वाजता बीडहून निघालो. गाडीत बसल्यापासूनच वातावरण एकदम भक्तिमय झालं. कोणीतरी अभंग म्हणायला सुरुवात केली, मग दुसऱ्यानं सूर धरला, आणि पुढची वाटचाल झाली ती विठ्ठलनामातच. गाडी सुसाट धावत होती, पण मनात मात्र शांत भक्तीची गती होती. वाटेत धार्मिक चर्चा, संतांच्या गोष्टी, कीर्तनातले अनुभव यावर रंगल्या गप्पा. कुणीतरी म्हणालं, "म्हणावं वाटतंय, आपलं आयुष्यही अशीच एखादी वारी व्हावी!" सर्वांच्या माना हलल्या... खरंच भावनिक क्षण होता तो. ◆ तुळजाभवानी मातेच्या चरणी : साधारण ११ च्या दरम्यान आम्ही तुळजापूरला पोचलो. तिथं कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. भजन थांबलं, पण मनात अखंड जप सुरुच होता. मंदिरात पाऊल ठेवताक्षणी डोळ्यांत पाणी आलं. काय सांगू... त्य...