म्हातारी माणसं ओझं ठरत आहेत की कटकट

●◆म्हातारी माणसं ओझं ठरत आहेत की कटकट◆●

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◆9405344642

बीड शहराच्या एका रस्त्यावर नारायण भोंडवे बाबा भेटले. त्यांच्या म्हणण्यानुसार ते पाटोदा तालुक्यातील आहेत. साधे मळालेले कपडे, धोतर, डोक्यावर टोपी, हातात काठी, कपाळावर गंध, गळ्यात भगवा गमजा आणि चेहऱ्यावर थोडा थकवा, असमाधान.....! ते रस्त्यावरुन जाताना वाटेत थांबतात, कुणालातरी काही पैसे मागतात. जेवणासाठी थोडीशी मदत करा दादा असं म्हणतात...! आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांना मदतीचा हात दिला, आणि थोड्या संवादातून त्यांच्या जगण्याचा एक गहिरा पैलू समोर आला. ते सांगतात – "पाच मुलं आहेत, दोन मुली आहेत. शेती आहे, वाडी आहे. पण... काहीतरी बिनसलं." हे “काहीतरी” म्हणजेच सामाजिक भीषणतेचा मुळ प्रश्न आहे.

◆ म्हातारी माणसं शहरांमध्ये का येतात?:

आपल्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये, अनेक जुनी माणसं आज शहरांमध्ये फिरताना दिसतात – झेंडं, फोटो, कधी रुद्राक्षमाळा घेऊन, कधी एखादी विठ्ठलाची गाथा म्हणत, आणि बहुतेक वेळा "दहा रुपये द्या हो" म्हणत. हे चित्र पाहताना डोळ्यांत पाणी येतं, पण नंतर विचार करताना प्रश्न निर्माण होतो – हे असं व्हावं का? बऱ्याच वेळा या व्यक्तींची आर्थिक स्थिती फार वाईट नसते. त्यांच्याकडे शेती असते, मुलं असतात, वाडा असतो. पण मनातून तुटलेपण, एकटेपण आणि घरातल्या माणसांशी असलेली कटुता हेच त्यांना रस्त्यावर आणतं.

◆ मुलं चुकतात की पालक हट्टी होतात? :

सामाजिक चर्चेत नेहमी म्हणतात – "मुलांनी आईबापाला मुलांनी न सांभाळणं, त्यांची दैना करणं....!" होय, अनेकदा ते खरंही असतं. पण त्याचबरोबर हेही वास्तव आहे की, काही म्हातारी माणसं हट्ट करतात, कटकटी करतात. जुना जमाना परत येईल अशी अपेक्षा ठेवतात. सतत टोचणं, मुलांचं जगणं न समजून घेणं, पिढीतला अंतर न समजणं – या सगळ्यामुळे घरात वाद वाढतो. म्हणून जेव्हा आम्ही भोंडवे बाबांशी बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं –"सगळं आहे घरात, पण कोण ऐकत नाही." यातून एक गोष्ट स्पष्ट होते – संवादाचा अभाव म्हणजेच सामाजिक विघटनाची सुरुवात....!

🏙️ शहरात यायचं का? :

शहर म्हणजे गर्दी, गर्दीतून येणारा अलिप्तपणा. हे वृद्ध लोक शहरात येतात, देवाचं नाव घेऊन पैसे मागतात. यामुळे असहायता, दैन्य, आणि हिंदू धर्माचं देखील विकृतीकरण होतं. झेंडं किंवा फोटो घेऊन पैसे मागणं म्हणजे अध्यात्म नव्हे; ते आहे जगण्याचा एक प्रकारचा अट्टाहास. हे दृश्य पाहणाऱ्या युवकांवर त्याचा परिणाम काय होतो? देवाचे नाव घेऊन पैसे मागणारे लोक पाहिले की, त्यांचा धर्मावरचा, भक्तीवरचा विश्वास डळमळीत होतो. समाजाच्या मूळ मूल्यांना तडा जातो.

◆ समाजाची जबाबदारी :

समाज म्हणून आपण कोणत्याही एका बाजूला पूर्ण दोष देऊ शकत नाही. म्हातारे लोक हट्टी असू शकतात, आणि मुलं संवेदनशून्य असू शकतात. पण या दोघांमधला संवाद तुटतो तेव्हा समाजातील भीषणता जन्म घेते. आपण जर आपल्या घरात संवाद ठेवला, समजून घेतलं, थोडं मागे-पुढे जाऊन एकमेकांना आधार दिला, तर आज नारायण भोंडवे बाबांसारख्या व्यक्ती रस्त्यावर दिसणार नाहीत. या परिस्थितीला बदलायचं असेल, तर केवळ आर्थिक मदत पुरेशी नाही – मानसिक मदत, सामाजिक समज, संवाद, आणि एकमेकांना माफ करणं, हे सर्व आवश्यक आहे. या बाबांचा मी लवकरच व्हिडिओ टाकणार आहे. त्यातून एक माणूस म्हणून त्यांचं हसू, दुःख, आणि आपली जबाबदारी – सगळं स्पष्ट होईल. जर आपण या गोष्टींकडे डोळसपणे पाहिलं, तर आपण समाजाला अधिक माणूसकीने पाहायला शिकू. कारण म्हातारी माणसं देवाच्या नावाखाली रस्त्यावर भीक मागताना दिसणं हे त्यांचं नाही, तर आपल्या सगळ्यांचं अपयश आहे. त्यांच्या मुलांपर्यंत हा मेसेज पोहोचला तर माझी त्यांना विनंती आहे, कृपया आपल्या वडिलांना घेऊन जा. तुमच्या अपमान व्हावा म्हणून ही पोस्ट टाकलेली नाही तर हे बाबा त्यांच्या घरी पोहोचावेत या उद्देशाने हे लिहिले आहे. अहो महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची जी संस्थापना झाली ती फक्त आणि फक्त आई-वडिलांच्या सेवेच्या जोरावर झालेली आहे- जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात-

"माय बापे केवळ काशी l तेने न वजावे तीर्थाशी ll
पुंडलिके काय केले lपरब्रम्ह उभे ठेले ll
पैसा होई सावधान l हृदयी धरी नारायण ll
तुका म्हणे मायबापे l अवघी देवाची स्वरूपे ll

याची थोडी तरी आपण जाणीव ठेवूया....!!

जय जगद्गुरू....!

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◆9405344642

#सामाजिकभीषणता #म्हातारीमाणसं #BabaOnStreet #BheedCityReality #ElderlyCare #समाजचंभान #NarayanaBhondweBaba

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'