गजानन महाराज संस्थान – नियोजन, शिस्त आणि स्वच्छतेचा एक आदर्श परिपाठ
●◆गजानन महाराज संस्थान – नियोजन, शिस्त आणि स्वच्छतेचा एक आदर्श परिपाठ◆●
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642
पंढरपूर, तीर्थक्षेत्राचं हृदय. इथे दरवर्षी लाखो भाविकांची वारी भरते. वारी ही केवळ भक्ती नाही, ती एक अध्यात्मिक यात्रा आहे, ती संयम, सहनशीलता आणि समर्पण यांचा प्रवास आहे. या सर्व भाविकांसाठी सेवा करणारी अनेक संस्थानं आहेत, परंतु त्यामध्ये विशेष स्थान मिळवले आहे ते संत गजानन महाराज संस्थान ने. गेली अनेक वर्षं आमचा अनुभव हाच सांगतो की या संस्थानमध्ये शिस्त, नियोजन आणि स्वच्छतेचा जो आदर्श पाळला जातो, तो खरंच 'सॅल्यूट' करण्यासारखा आहे.
◆प्रवेशाच्याच क्षणी जाणवतो 'शिस्तीचा' श्वास:-
गजानन महाराज मठामध्ये पाय टाकताच जणू एखाद्या जागरूक व्यवस्थापन यंत्रणेचा अनुभव येतो. दरवर्षी आम्ही पंढरपूर वारीदरम्यान मठामध्ये जातो. पहिल्याच टप्प्यावर सुरक्षारक्षक तपासणी करून आत सोडतात. गर्दी असूनही कुठेही गोंधळ नाही. कारण प्रत्येक दहा पावलंवर एक स्वयंसेवक हातात लाकडी काठी घेऊन आपल्या सेवेत उभा असतो. रस्ता दाखवणं, योग्य मार्गाला वळवणं, अनुशासन पाळायला सांगणं – हे सगळं तो प्रसन्न चेहऱ्याने करतो.
◆प्रत्येक टप्प्यावर 'सेवेची श्रद्धा':-
गजानन महाराज संस्थानचे स्वयंसेवक म्हणजे चालतेबोलते संतच वाटतात. कोणीही रागावलेला नाही, ओरडणं नाही. प्रत्येकजण 'माउली', 'दादा', 'ताई' अशा संबोधनांनी भाविकांचं मन जिंकतो. बाथरूम, प्रसाद कक्ष, खाण्याची जागा – कुठेही अस्वच्छतेचा लवलेश नाही. हजारो लोक असूनही ती जागा इतकी स्वच्छ असते की आपल्याला क्षणभर वाटतं, 'आपण पंढरपूरात आहोत की एखाद्या परदेशी स्वच्छशिस्तीच्या आश्रमात?'
◆'निसर्गस्नेही' व्यवस्था :-
प्रसाद मिळतो तो झाडाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळीवर. हे पर्यावरणपूरकतेचं मोठं उदाहरण आहे. पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा, अन्नाचा उरला भाग – या सर्वांची विल्हेवाट नियोजितपणे लावली जाते. कोणीही उघडपणे कचरा टाकताना आढळत नाही. कारण स्वतःहून भावना तयार होते की – इथे अस्वच्छता करणं म्हणजे पाप!
◆स्वच्छतेमुळे निर्माण होणारी 'दिव्यता':-
आपण बऱ्याच ठिकाणी दर्शनासाठी गेल्यावर अस्वच्छतेची चीड येते. काही ठिकाणी बाटल्या, उरलेले अन्न, अर्धवट खाल्लेलं प्रसाद, दुर्गंधी यामुळे आपलं भक्तिभावच गडप होतो. पण गजानन महाराज संस्थानमध्ये जेव्हा आपण पाय ठेवतो, तेव्हा भक्ती आणि स्वच्छतेचा मिलाफ अनुभवायला मिळतो. संत गाडगेबाबांच्या वारशाची आठवण होते. त्यांनी जसं लोकांना 'साफसफाई म्हणजेच सेवा' शिकवलं, तसंच कार्य आज हे संस्थान करतं आहे.
◆'स्वतःचा पंथ नाही – वारकऱ्यांचा पंथ':-
गजानन महाराज संस्थानाची एक गोष्ट मनाला भिडते – त्यांनी स्वतःचा वेगळा पंथ कधीच तयार केला नाही. उलट त्यांनी वारकरी संप्रदायाशी आपली सेवा जोडली. त्यामुळेच त्यांचं कार्य हे केवळ अध्यात्मिक नाही तर सामाजिक, व्यवस्थापकीय आणि प्रेरणादायी ठरतं. देशभरातील इतर धार्मिक संस्थानांनी याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.
◆राष्ट्रीय नेत्यांकडून गौरव:-
राष्ट्रीय नेते मा.शरद पवार साहेब असोत किंवा केंदीय मंत्री मा. नितीन गडकरी साहेब, हे दोघंही अनेकदा आपल्या भाषणांमध्ये गजानन महाराज संस्थानच्या नियोजन कौशल्याचं आणि स्वच्छतेच्या ध्यासाचं कौतुक करताना दिसतात. हे एव्हढ्यावरून समजतं की ही संस्था स्थानिक नसून राष्ट्रीय पातळीवर आदर्श घालणारी ठरली आहे.
◆शेवटी एकच सांगावेसे वाटते...
गजानन महाराज संस्थान हे केवळ एक मठ नाही, तर व्यवस्थापनाचं विद्यापीठ आहे. शिस्त, स्वच्छता, सेवा आणि समर्पण यांचा आदर्श जर एखाद्या भाविकाला प्रत्यक्ष अनुभवायचा असेल, तर त्याने पंढरपूरमध्ये गजानन महाराज मठात एकदा तरी पाय ठेवायलाच हवा. हे संस्थान एक 'धर्म + व्यवस्थापन + पर्यावरण' यांचा संगम आहे. 'स्वच्छता ही सेवा आहे, स्वच्छता ही श्रद्धा आहे, स्वच्छता हाच खरा धर्म आहे' – हे गजानन महाराज संस्थानने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. आणि म्हणूनच, अशा संस्थानाला मनःपूर्वक सॅल्यूट करावा वाटतो....!!
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642
#गजाननमहाराजसंस्थान #स्वच्छतेचा_आदर्श
#वारीतीलशिस्त #प्रेरणादायीसंस्था
#पंढरपूरवारी #गौरवमोलसेवा
#स्वच्छता_हाच_धर्म #संस्थेचा_सॅल्यूट
#माउलींचीसेवा #गजाननमाउली
#शिस्तम्हणजेगजाननसंस्थान
#वारकरीसंप्रदाय #संतगाडगेबाबांचा_वारसा
#निसर्गस्नेहीसंस्था #वारकऱ्यांचीशान
#सेवेतीलस्वाभिमान #वारीचे_व्यवस्थापन
#संतसेवा_स्वच्छता #मनापासूनसॅल्यूट
#भक्ती_आणि_व्यवस्था
Comments
Post a Comment