माझी बीजमाय 'संजीवनी'

●◆माझी बीजमाय 'संजीवनी'◆●
        तिचं नाव संजीवनी असलं तरी गावात सगळेजण तिला वहिनी म्हणतात. लहानपणापासून मी पण तिला वहिनीच म्हणायचो. पण लग्न झाल्यानंतर बायकोच्या सांगण्यावरून नकळत “आई” म्हणू लागलो. माझी ही माय – संजूबाई. शालेय शिक्षण तिचं झालेलं नाही. अक्षरं कधी हाताळली नाहीत. पण तिला शेतकीची, कुणबीकीची मात्र नैसर्गिक, अनुभवजन्य सविस्तर माहिती आहे. एखाद्या शेती खात्यातील अधिकाऱ्याला किंवा प्राध्यापकालाही रानपाला, झाडांची, वेलींची, पिकांची, फळांची माहिती नसेल एवढ्या माहितीचा साठा तिच्याकडे उपलब्ध आहे. ही माहिती तिला कामातूनच लहानापासूनच मिळाली. पानाफुलांचा, वेलवेलीचा, भाजीपाला आणि बियांचा संसार हे तिचे खरे विद्यापीठ. दर वर्षी पावसाळ्याच्या आधी आमचं घर बीजांचं गाठोडं बनतं. घरातल्या वाळक्या ओसरीवर, कुठे बांबूच्या टोपलीत, कुठे जुन्या साड्यांच्या गाठीमध्ये – वेगवेगळ्या बीजांचं संकलन ठेवलेलं असतं. वाळलेल्या वालाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, शेगड्या, वांगं, टमाटर, चुका, शेपू – कितीतरी प्रकार. गावकऱ्यांच्या बायका येऊन “वहिनी, तुमच्याकडं बी मिळेल का?” असं विचारत असतात. आणि वहिनीच्या ओंजळीतून सगळ्यांच्या अंगणात जीवनाचं बी पेरलं जातं.

        गावरान भाज्या म्हणजे तिचं खास दान. माकड शिंदोळ्याची भाजी, फांद्याची भाजी, छोटे बारीक रान टमाटे, वाघाटे, चिंचेच्या फुलांची भाजी या भाज्यांची खास रेसिपी करून ती घरच्यांसाठी राखून ठेवते. मला नेहमी वाटायचं, तिच्या नजरेला घरच्यांच्या पोटाची भूक हीच एकमेव माप. सगळ्यात मोठं काम ती करते ते गावरान बाजरीचं बीज जपण्याचं. शेतात बाजरीच्या पिकातील टपोरे कणसं हाताने वेचून, वाळवून, वेगळं करून, त्याचं बी करून ठेवते. पेरणीच्या वेळी तीचं बी वापरलं जातं. म्हणून आमच्या घरात कधीही बाजारातून बाजरीचं बी विकत आणावं लागत नाही. हीच खरी संपत्ती. हीच खरी शहाणीव. गावरान बाजरी काळसर असते, पण तिचं उत्पन्न म्हणजे खरं सोनं. खमंगपणा, पौष्टिकता आणि शेतकऱ्याच्या घामाची चव. आजच्या धान्याच्या बिया बाहेरून येतात, त्यात नुसतं पॅकेट आणि कंपनी. पण आमच्या घरात बीजमातेनं जपलेली पिढीजात संपत्ती आहे. ही माय फक्त बीज जपत नाही, तर घरातला संसारही तिनं तिच्या हाताने विणला आहे. संसार उभा करायला, लेकरं मोठी करायला, रात्रंदिवस राबली. उन्हं-पावसात संसाराचा गाडा गरिबीत हाकला. माझ्या लहानपणी ती जात्यावर दळण दळायला बसली की घंटा घंटा जात्यावरल्या ओव्या म्हणायची आणि तिच्या ओव्या सुरू झाल्या की मी तिच्या मांडीवर जाऊन झोपी जायचं. आजही तिला शेकडो ओव्या येतात त्यातल्या बऱ्याच मी संकलित करून ठेवल्या आहेत.

            पुरुष सत्ता गाजवतो, वर्चस्व दाखवतो. पण स्त्री ही खरं तर नवनिर्माण करणारी बीजमाता असते. माझ्या मायेकडे पाहिलं की मला हे जाणवतं. तिच्या ओंजळीतून प्रत्येक गोष्टीत नवीन बी उगवतं – मग ते शेताचं असो, लेकरांचं असो, की घरातल्या सुखाचं. तिच्या हातात जादू आहे. तिने लावलेलं काही वया जात नाही. तिच्या मायेचा पदर दारापुढं नेहमी पसरलेला असतो. कुणीही आलं, तरी तिच्या अंगणातून मायेची उब न मिळता परत जात नाही. पण या सगळ्या प्रवासात ती स्वतःला मात्र विसरली. तिची स्वप्नं, तिचं जगणं – हे सगळं तिनं कधीच बाजूला ठेवलं. लेकरं सुखी झाली, घर उभं राहिलं, संसार घडला – एवढंच तिचं समाधान. आज मागं वळून बघताना मला जाणवतं, आपल्या देशात जेव्हा मातृसंस्कृती होती ना, तेव्हा प्रत्येक घरात अशा बीजमाता असत. जीवन देणाऱ्या, नवनिर्माण करणाऱ्या, स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या. अशीच माझी माय, माझी बीजमाता – 'संजीवनी'

◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.९४०५३४४६४२

#माझीमाय #बीजमाता #गावरानबी #ग्रामीणसंस्कृती #शेतकरीजीवन #आईचंप्रेम #गावरानभाज्या #बाजरीज्वारी #मातृत्व #संसार #कष्टकरीस्त्री #मातृसंस्कृती #Marathwada #Beed #गावकथा

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी