शेतकऱ्याच्या मुलाची केंद्र सरकारच्या वकीलपदाला गवसणी

शेतकऱ्याच्या मुलाची केंद्र सरकारच्या वकीलपदाला गवसणी

ॲड.नारायण कोंडीबा सिरसट यांची भारत सरकारकडून निवड

◆श्रीकृष्ण उबाळे

बीड : अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र ॲड. नारायण कोंडीबा सिरसट यांची भारत सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी केंद्र सरकारचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यात अभिमानाची लाट पसरली आहे. पुढील तीन वर्षे ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. मुळगाव वडगाव (कळसंबर), ता. बीड येथील सिरसट कुटुंबीयांची उपजीविका शेतीवर अवलंबून होती. आई-वडील शेतात राबून कुटुंब चालवत होते. अशा सामान्य शेतकरी घरातून आलेल्या नारायण यांनी बालपणापासूनच संघर्षाचा सामना करत शिक्षणाची कास धरली. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण वडगाव हायस्कूल व नूतन कुंदकेश्वर विद्यामंदिर, कळसंबर येथे पूर्ण केले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे घेतले. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथून बीए पदवी संपादन केली. कायद्याचे शिक्षण घेण्याची त्यांची जिद्द कायम होती. अखेर २०१५ साली रामराव आवरगावकर विधी महाविद्यालय, बीड येथून एल.एल.बी. शिक्षण पूर्ण केले. २०१५ पासून नारायण सिरसट यांनी बीड न्यायालयात वकिली सुरू केली. ग्राहक तक्रार, भूसंपादन, दिवाणी व फौजदारी खटले तसेच मोटार अपघात प्रकरणांमध्ये त्यांनी उल्लेखनीय विधी सेवा दिली आहे. विशेष म्हणजे शेतकरी समस्या मांडण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले. रस्ते अपघात रोखण्यासाठी मोहीम चालवत अपघात होऊच नयेत यासाठी प्रयत्नशील राहिले. त्यांच्या या जनसामान्याभिमुख कामामुळेच ते गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या नजरेत खऱ्या अर्थाने "जनतेचे वकील" ठरले आहेत. केंद्र सरकारच्या वकीलपदाची निवड होताच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध ठिकाणाहून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बीड येथील श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट (शक्तीपीठ) यांच्यातर्फे ऍड. नारायण सिरसट यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थानचे अध्यक्ष रामनाथ खोड, श्रीकृष्ण महाराज उबाळे, संतोष महाराज डोंगरे, सचिन भस्मारे, हंगे, सानप, केदार, आदित्य पानगुडे, ऍड. चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर व मित्रमंडळी उपस्थित होती. एक अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कठोर परिश्रम, चिकाटी आणि नीतिमत्तेच्या जोरावर केंद्र सरकारच्या वकीलपदी पोहोचला, ही गोष्ट होतकरू युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरणारी आहे.


पदवी प्रवेश घेताना चढले कोर्टाची पायरी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठांमध्ये पदवीला प्रवेश घेताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाली व त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यावेळी त्यांनी आपल्या जीवनात वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कोर्टाची पायरी चढली. उच्च न्यायालयात केस जिकून पदवीला प्रवेश मिळवला.  इथूनच वकील होण्याचं त्यांनी मनात निश्चत केलं.



प्रतिक्रिया

"आयुष्यामध्ये केलेल्या संघर्षाचे फळ आज मिळाले. नीतिमत्ता कामाला आली. अपेक्षा न ठेवता काम करत राहिलो. काही वेळा लोकांनी पैसे बुडवले तरी त्याची कुरकुर कधी केली नाही आणि मनाला ताण लागू दिला नाही. जे मिळालं, जे मिळतंय त्यात कायम समाधानी राहिलो व लोकसेवा करत राहिलो. त्याचेच हे फळ आहे."

◆ॲड.नारायण सिरसट, नवनियुक्त सरकारी वकील

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'