आठवणीतले प्रा.भास्कर चंदनशिव

●◆आठवणीतले प्रा. भास्कर चंदनशिव◆●

◆श्रीकृष्ण उबाळे, बीड 

             २००१ साली मी बीडमधील बलभीम महाविद्यालयाच्या दारात पाऊल टाकलं. अकरावीचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणून सुरुवात झाली आणि पुढे बारावी पार करून पदवीच्या प्रवासालाही मी तिथेच सुरुवात केली. त्या काळात बॉटनी, झूलॉजी, कम्प्युटर सायन्स हे विषय हाताळताना इंग्रजी आणि मराठी हे अनिवार्य विषय माझ्यासोबत असायचे. पण खरी गोडी, खरं आकर्षण, खरं वेगळेपण मराठी विभागामुळेच निर्माण झालं. मराठी विभागाचे प्रमुख होते प्रा.भास्कर चंदनशिव सर. साधेपणाने राहणारे, नेहमी नेहरू शर्टात दिसणारे, गंभीर आवाजात बोलणारे आणि त्यातही अनोखी ताकद असणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या पहिल्याच व्याख्यानापासून मला जाणवलं की हे केवळ एक शिक्षक नाहीत, तर लेखक, साहित्यिक आणि विचारवंत आहेत. त्यांचे बोलणे म्हणजे एखाद्या कथेला ऐकण्यासारखे, एखाद्या पुस्तकाच्या पानात शिरल्यासारखे. लहानपणापासूनच आम्ही ‘लाल चिखल’ ही त्यांची कथा शाळेतून कित्येक वेळा वाचली होती. आणि आता तोच लेखक आपल्या समोर व्याख्यान देतो आहे, आपल्यालाच शिकवतो आहे हे पाहून मनामध्ये अभिमान दाटून यायचा. खरंच, ते क्षण विसरणं अशक्य आहे. एखाद्या नामांकित लेखकाचा साक्षात सानिध्य लाभणं म्हणजे भाग्यच. त्यांच्या भोवती नेहमी विद्यार्थ्यांची गर्दी असायची. एम.ए. मराठीचे विद्यार्थी त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचे. पण आम्हीही, पदवीचे विद्यार्थी, त्यांना जवळ बसून ऐकण्याचा, त्यांच्या गप्पा पकडण्याचा प्रयत्न करायचो. मला आठवतंय, त्यांच्या गंभीर आवाजात एखादी कथा जिवंत व्हायची. ग्रामीण जग, शेतकरी जीवन, दुष्काळाच्या छाया – हे सगळं ते इतकं प्रभावीपणे मांडायचे की मनावर ठसून जायचं.

           २००६ पर्यंत मी महाविद्यालयात होतो. या दरम्यान सरांचं मार्गदर्शन, त्यांचं साहित्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप मनावर इतकी ठळक पडली की मीही छोट्या छोट्या कथा लिहायला सुरुवात करू लागलो. सरांनी मला दोन-तीन वेळा काही सूचना केल्या. मी त्यांना त्यावेळी विचारलं होतं- 

"सर इतकी भारी कथा तुम्हाला सुचते तरी कशी ? कथा आम्ही कशी लिहिली पाहिजे ? 

त्यावर त्यांनी सांगितलेलं उत्तर खूप प्रेरणादायी होतं. ते म्हणाले-

"आपल्या आजूबाजूला वेदनेनं, दु:खानं गांजलेली व्यक्ती असते. तीच दुःख आपल्याला जर त्याच्या पातळीवर जाऊन टिपता आलं आणि आपल्या मोडक्यात तोडक्या भाषेमध्ये मांडता आलं ना तर तो प्रत्येकजण उत्तमातील उत्तम कथाकार होऊ शकतो."

 त्यांच्या कथा ऐकताना मनात विचार यायचा – "आपल्या आजूबाजूला इतकं काही घडतंय, हे जर आपण नोंदवलं नाही, लिहून ठेवलं नाही तर ते कुणाला कळणार?" आणि असं म्हणत म्हणत मी गोष्टी लिहू लागलो. शेतकरी दुःख, समाजातील बदल, ग्रामीण वेदना – या सगळ्याचं भान मला त्यांच्या साहित्यामुळे आलं. भास्कर सरांनी आपल्या आयुष्यात वैयक्तिक दुःखही मोठं झेललं. त्यांच्या मुलाचा मृत्यूची बातमी मध्यंतरी ऐकली होती. तेव्हा अंतःकरण हादरलं होतं. एक लेखक, एक शिक्षक म्हणून ते आधीच संवेदनशील होते, आणि या दुःखाने त्यावर आणखी आघात झाला. 

         अधूनमधून त्यांची तब्येत बरी नसल्याचं कानावर येत होतं. सध्या ते त्यांच्या गावी कळंब या ठिकाणी राहत होते. दिवाळीच्या सुट्टीत सरांना भेटण्याचं आम्ही ठरवलं होतं. मी आणि माझे दोन-तीन मित्र खूप उत्सुक होतो. त्यांच्याशी प्रत्यक्ष गप्पा माराव्यात, त्यांच्या कथा ऐकाव्यात, लेखनाबद्दल विचारावं असं मनात होतं. माझा प्रकाशित झालेला 'गोफनी गुंडा' हा बारा कथांचा संग्रह त्यांना द्यायचा होता. त्यांनाही त्यातील 'गोफनी गुंडा' ही शेतकऱ्यांची कथा ऐकवायची होती. पण तो योग कधीच जुळून आला नाही. काळाने आमचं हे स्वप्न हिरावून घेतलं. आणि नंतर काल दि.२७ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्या निधनाची वार्ता आली तेव्हा मनाच्या कोपऱ्यात एक हुरहूर कायमची बसून राहिली. आज मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं – सरांचं अस्तित्व म्हणजे फक्त वर्गातलं शिकवणं नव्हतं, ते आमच्यासाठी प्रेरणास्थान होतं. त्यांच्या साधेपणाने, त्यांच्या शब्दांच्या जादूने आम्हा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये लेखनाची गोडी पेटवली. मी लिहायला सुरुवात केली, कथा गोळा करायला लागलो, छोट्या छोट्या अनुभवांना शब्द देऊ लागलो – यामागे सरांचीच छाया होती.

           भास्कर चंदनशिव म्हणजे मराठवाड्याच्या मातीचा सुगंध. दुष्काळ, शेतकऱ्याचं दुःख, ग्रामीण जीवनाचा वेदनादायी स्वर त्यांनी आपल्या कथांमधून मांडला. ‘जांभळढव्ह’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारुळं’ यांसारख्या कथासंग्रहांमध्ये त्यांनी जगणं जसंच्या तसं पकडलं. आजही जेव्हा मी माझ्या गोष्टी लिहितो तेव्हा सरांच्या आठवणी डोळ्यासमोर येतात. त्यांच्या गंभीर आवाजातलं व्याख्यान कानात घुमतं. आणि वाटतं – "खरंच, हेच ते शिक्षक, ज्यांनी आयुष्याच्या वाटेवर विचारांचा दिवा दिला." भास्कर सर गेले, पण त्यांचा सुगंध शब्दांमध्ये, कथांमध्ये, आणि आमच्या आठवणीत आजही दरवळतो आहे. भास्कर म्हणजे सूर्य तो आज मावळला असला तरी विचार रूपाने तो रोज नव्या जोशाने उगवेल. आमच्या ग्रामीण भागातील दुःख तो नव्याने सांगेल. तो ज्ञान भास्कर सांगतोय मी कायमचा मावळलेलो नाही. हे बळी पुत्रांनो मी विचार रूपाने, बीज रूपाने आहे तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन....!

◆श्रीकृष्ण सुंदरराव उबाळे
◆मो.९४०५३४४६४२

#भास्करचंदनशिव
#BhaskarChandanShiv
#कवीभास्करचंदनशिव
#मराठीकवी
#काव्यरत्न
#कवितेचा_स्वर
#MarathiPoet
#ChandanShiv
#कवितामनोगत
#साहित्यप्रेम
#लालचिखल
#ग्रामीणकथा

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'