शेतकरी बापाच्या शेतमळ्यावर मुलींनी फुलवली ‘खाकी’ची बाग

●◆शेतकरी बापाच्या आंबिका◆●

शेतकरी बापाच्या शेतमळ्यावर मुलींनी फुलवली ‘खाकी’ची बाग

नंदपूर येथील चंद्रसेन उबाळेंच्या चार मुली पोलीस दलात बजावताहेत सेवा

बीड : बीड जिल्ह्याचा उल्लेख झाला की समाजमनात अजूनही काही कटू वास्तव दाटून येते – मुलगी नको अशी मानसिकता, गर्भपातात आघाडी, बालविवाहाची परंपरा… पण हाच बीड जिल्हा आज एका शेतकरी बापामुळे आणि त्याच्या चार मुलींमुळे अभिमानाने डोकं उंचावतो आहे. कारण गेवराई तालुक्यातील नंदपूर गावातील चंद्रसेन उबाळे या शेतकरी बापाच्या कष्टाच्या मळ्यावरून उभ्या राहिल्या आहेत चार खाकीधारी मुली. चंद्रसेन आणि संगिता उबाळे या दाम्पत्याने पाच मुलींच्या संगोपनात मुलगा-मुलगी असा कधीच भेदभाव केला नाही. शिक्षण आणि संस्कार या दोन गोष्टींचं बी त्यांनी आपल्या मुलींच्या मनामनात पेरलं. “तुम्ही तुमचं स्वप्न पहा, कष्ट करा, प्रामाणिकपणे समाजात जगा,” या बोधवाक्यानंच उबाळे कुटुंब उभं राहिलं. यातूनच मोठी मुलगी ज्योती उबाळे हिने २०१४ मध्ये बीड जिल्हा पोलीस दलात भरती होऊन सध्या माजलगाव येथे सेवा सुरू आहे. दुसरी मुलगी अश्विनी उबाळे २०२१ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस दलात दाखल झाली. तिसरी मुलगी दिपाली उबाळे २०२४ मध्ये बीड जिल्हा पोलीस दलात निवडली गेली. आणि नुकतीच चौथी मुलगी मोहिनी उबाळे हिची छत्रपती संभाजीनगर येथे कारागृह पोलीस म्हणून निवड झाली.  कु. मोहिनीची कहाणी विशेष प्रेरणादायी आहे. नंदपूरच्या जि.प. शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मोहिनीने मारफळा शाळा व गढी येथील जयभवानी महाविद्यालयात माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. गेली तीन वर्षं बीड येथील योध्दा अकॅडमीमध्ये संचालक कृष्णा पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीची तयारी करत असताना तिने सतत पराभवाला न घाबरता पुढे वाटचाल केली. बीड, पुणे, रायगडच्या भरतीत आलेल्या अपयशानंतरही हार न मानता अखेर संभाजीनगर कारागृह पोलीस भरतीत तिने यश मिळवलं. तिची मेहनत फक्त अभ्यासापुरतीच मर्यादित नव्हती. वडिलांना शेतकामात कापसाची वेचणी, फवारणी, बाजरी-ज्वारी काढणी, रात्री जागून अभ्यास, आणि सकाळी ग्राउंडवर धावणं… अशा काटेकोर दिनचर्येनेच तिने हे यश साध्य केलं. नुकत्याच झालेल्या 'नमो मॅरेथॉन'मध्ये तिने तृतीय क्रमांक पटकावला असून याआधीच्या मॅरेथॉनमध्येही ती प्रथम-द्वितीय आली आहे. उबाळे कुटुंबाची ही कथा म्हणजे बळीराजाच्या घामातून फुललेली यशाची बाग आहे. ओला-कोरडा दुष्काळ, कर्जबाजारीपण या सगळ्या संकटांना छातीठोकपणे तोंड देत चंद्रसेन उबाळे यांनी पत्नीच्या खंबीर साथीने आपल्या चारही मुलींना खाकीवर्दी घालून समाजसेवेच्या, देशसेवेच्या वाटेवर उभं केलं आहे. आज नंदपूरसकट संपूर्ण बीड जिल्हा या ‘चार खाकी कन्या’च्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगतो आहे. अशा या शेतकरी बापाच्या कष्टाने फुललेल्या यशोगाथा खऱ्या अर्थानं समाजाला प्रेरणा देतात. मुलींच्या या यशाबद्दल सर्वच असतानातून उबाळे कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. तुम्ही या दुर्गाना, आंबिकाना नमन...!!

 "ज्योती उबाळे -बीड जिल्हा पोलीस 
 अश्विनी उबाळे-पिंपरी-चिंचवड पोलीस  
 दिपाली उबाळे -बीड जिल्हा पोलीस 
 मोहिनी उबाळे- संभाजीनगर कारागृह पोलीस"

प्रतिक्रिया:

 "माझ्या तीन बहिणी पोलीस दलात कार्यरत आहेत. अभ्यासात‌ त्यांचे मार्गदर्शन मिळाले. कृष्णा पाठक‌ सर शारीरिक चाचणीसाठी‌ मार्गदर्शन लाभले. माझ्या वडिलांनी आम्हाला काहीही कमी‌ पडू‌ दिले नाही. अनेकवेळा अपयश आले पण‌ त्यांनी आम्हाला खचू न देता‌ सतत मेहनत करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्यामुळेच‌ आम्ही सर्वजणी यशस्वी होऊ‌ शकलोत‌."

◆ कु. मोहिनी उबाळे (छत्रपती संभाजीनगर, कारागृह पोलीस)

"माझ्या मुली खूप मेहनती आहेत. त्यांना आमच्या गरीबीची जाणिव होती त्यामुळेच त्या कष्ट करून यशस्वी झाल्या. पोलीस दलात नोरील असून ‌देखील त्या सुट्टीमध्ये कसलीही लाज न बाळगता मला शेतीत‌ मदत करतात. कितीही स्पर्धा असली तरी चांगल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. माझी छोटी मुलगी प्रियांका उबाळे ही पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहे. ती नक्कीच यशस्वी होईल."

◆चंद्रसेन उबाळे ,( वडील )

#शेतकरीबापाचागौरव #खाकीकन्या #बीडचाअभिमान #नंदपूरचीशान #चारबहिणीचारखाकी #कष्टातूनयश #बापलेकांचीयशोगाथा #खाकीवर्दीतीलमुली #बळीराजाचीयशोगाथा #प्रेरणादायीकथा #शेतकऱ्याचीयशस्वीमुली #बीडपोलिसकन्या #उबाळेकुटुंबाचाअभिमान #कन्याशक्ती #गरीबीवरमात #मुलगीशिक्षितदेशशिक्षित #समाजप्रेरणा #खाकीबाग #मुलींचेयश #बीडजिल्हा

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'