सोनम वांगचुक यांच्या सन्मानातून दिसणारे वास्तव

◆●सोनम वांगचुक यांच्या सन्मानातून दिसणारे वास्तव●◆

              भारतात ज्ञान, शहाणपण आणि विद्वत्ता यांना प्राचीन काळापासून मोठं स्थान दिलं गेलं आहे. “विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन | 
   स्व-देशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ||” 
हे संस्कृत सुभाषित केवळ वाक्य नसून भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. राजा आपल्या राज्यात पूजनीय असतो, पण विद्वान संपूर्ण जगात पूजनीय ठरतो. आज या उक्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे लेह-लडाखचे सुपुत्र सोनम वांगचुक. अभियंता असूनही त्यांनी शिक्षण, पर्यावरण, शाश्वत विकास आणि हिमालयाच्या अस्तित्वासाठी आयुष्य समर्पित केलं. ‘आइस स्तुपा’ सारखा क्रांतिकारी शोध असो वा लष्करासाठी सौर-टेंटची संकल्पना – त्यांच्या कार्यात केवळ विज्ञान नव्हे तर समाजाला उपयोगी ठरणारी दूरदृष्टी दिसते. 
             त्यांच्या योगदानाचा गौरव भारतानेच नव्हे तर जगभराने केला आहे. 1996 पासून राज्यस्तरीय पदक, 2001 साली “मॅन ऑफ द इयर”, 2002 मध्ये अशोका फेलोशिप, 2014 मध्ये युनेस्को आर्किटेक्चर अवॉर्ड, 2016 मध्ये टेरा अवॉर्ड, 2017 मध्ये ग्लोबल अवॉर्ड फॉर सस्टेनेबल आर्किटेक्चर, 2018 मध्ये आशियातील सर्वात प्रतिष्ठित रेमन मेगसेसे पुरस्कार – अशी असंख्य यादी त्यांचं विद्वत्त्व अधोरेखित करते. पण दुर्दैव असं की – ज्या देशाने या विद्वानाचा अभिमान बाळगायला हवा होता, तिथे आज त्यांना ‘भारतविरोधक’ ठरवलं जातं. कारण काय? त्यांनी लडाखसाठी, पर्यावरणासाठी, शाश्वत भविष्यासाठी आवाज उठवला. शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभं केलं. म्हणजेच विद्वानाने सत्य मांडण्याचा गुन्हा केला.
              आजच्या सत्ताधारी व्यवस्थेचा कल ‘भक्तनिर्मिती’कडे जास्त आहे. प्रश्न विचारणाऱ्याला शत्रू समजण्याची प्रवृत्ती वाढते आहे. राजकीय शक्तीला आव्हान देणारी विद्वत्ता त्यांना खटकते. म्हणूनच सोनम वांगचुक यांसारख्या कर्तृत्ववानांना समाजापासून वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न होतो. हे केवळ व्यक्तीचं अपमान नव्हे तर संपूर्ण भारतीय संस्कृतीला दिलेला धोका आहे. भारताने जगाला गुरू म्हणून मार्गदर्शन केलं ते विद्वत्तेमुळे – वेदांत, गणित, योग, साहित्य, विज्ञान यांच्यामुळे. आज जर आपण विद्वानांचा अपमान केला, त्यांना देशद्रोही ठरवलं तर हा वारसा आपण स्वतःच्या हातांनी नष्ट करू. सत्ता ही क्षणभंगुर असते, पण विद्वत्ता शाश्वत असते. म्हणूनच आजची गरज आहे की आपण सोनम वांगचुक यांच्यासारख्या लोकांना केवळ पुरस्कार देऊन गौरविण्यापेक्षा त्यांच्या विचारांना, त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या चेतनेला स्थान द्यावं. अन्यथा उद्याच्या पिढ्या विचारतील – “ज्या भूमीत विद्वानांचा गौरव करायला हवा होता, तिथे तुम्ही त्यांना उपेक्षित का ठेवलं?” सत्ताधाऱ्यांनी कदाचित विसरलं असेल, पण भारताच्या संस्कृतीत आजही ज्ञानाची पूजा केली जाते. आणि जोपर्यंत विद्वानांचा आवाज घुमत राहील, तोपर्यंत भारताची खरी ओळख – सभ्यता आणि शहाणपण – संपणार नाही.

#SonamWangchuk #IceStupa #SolarTent #Innovator #Engineer #Environmentalist #Changemaker #SustainableLiving #HimalayanHero #RamonMagsaysayAward #AshokaFellowship #GreenTeacher #GlobalInspiration #IndianScientist #EcoFriendlyInnovation #SaveHimalayas #ClimateAction

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'