सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदुळकर…!"
◆●अभियंता दिन विशेष●◆
"सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदुळकर…!"
दि.१५ सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. आज २१ वे शतक असून त्याला विज्ञान तंत्रज्ञानाचे युग म्हणतो. आज ठीक ठिकाणी विविध अभियांत्रिकी महाविद्यालये, आयआयटी, तंत्रज्ञान विद्यापीठे उपलब्ध आहेत. हजारो अभियान सुद्धा उपलब्ध आहेत. शिवरायांच्या काळात अशा पद्धतीच्या शिक्षण किंवा इंजिनिअरिंगची कुठलीही व्यवस्था नव्हती. स्थापत्य कलेची आजच्याप्रमाणे आधुनिक व्यवस्था नव्हती. त्या काळामध्ये बांधकाम विभाग संभाळणारे बेलदार किंवा त्या क्षेत्रातील तज्ञ असायचे. शिवरायांना रायगड ही राजधानी चांगली घडवायची होती. रायगडावर पूर्वी एक अर्धवट अवस्थेतील किल्ला होता. रायगडाचा डोंगर नुसता डोंगर नव्हता. तो स्वराज्याची राजधानी होणार होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एकच विचार होता-“हा गड असा उभा राहिला पाहिजे की स्वराज्याचे वैभव आणि सामर्थ्य शत्रूलाही थरथरवेल.” हा स्वप्नसाकार करण्याची जबाबदारी महाराजांनी एका साध्या पण विलक्षण कर्तृत्ववान माणसावर सोपवली-हिरोजी इंदुळकर. हिरोजी हे केवळ एक बांधकाम प्रमुख नव्हते, तर तो स्वराज्याच्या गाभ्याशी निष्ठा ठेवणारे एक शिल्पकार होते. आज जेव्हा आपण आधुनिक यंत्रसामग्री, नकाशे आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान युगात आहेत, त्यावेळी हिरोजींनी फक्त कष्ट, बुद्धी आणि निष्ठेच्या बळावर गड उभा केला. रायगडावर काम सुरू झालं. कधी कड्याकपारीत दगड फोडले जात, कधी विशाल दालने उभी राहत, कधी मनोरे, तर कधी सुंदर उद्याने तयार होत. हिरोजी प्रत्येक कामाच्या ठिकाणी स्वतः हजर असत. त्यांचे डोळे चुकत नसत, हात थांबत नसे, मन थकत नसे. कारण त्यांना ठाऊक होतं-हे काम माझं नसून महाराजांचं स्वप्न आहे. काही वर्षांत रायगडाचे रूप पालटले.
भक्कम प्रासाद, सदन, बारा महाल, गजशाला, रस्ते, तळी, मनोरे-सगळं काही स्वराज्याच्या भव्यतेला साजेसं. रायगड पाहून महाराजांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आले. शिवराज्याभिषेकाच्या आधी महाराजांनी हिरोजींना जवळ बोलावलं.
“हिरोजी, तुम्ही आमची राजधानी उभी केली. आज आम्ही तुम्हाला काहीही देऊ शकतो. बोला, काय हवं आहे?”
हिरोजी काही बोललेच नाहीत.
महाराज पुन्हा म्हणाले,
“बोला हिरोजी, आज तुमचा दिवस आहे.”
तेव्हा हिरोजी नम्रपणे म्हणाले-
“राजं, आम्हाला काही नको. फक्त एक अनुमती द्या.”
“बोला,” महाराज म्हणाले.
हिरोजींनी डोळ्यांत भक्तिभाव आणत उत्तर दिलं-
“राजं, या रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची परवानगी द्या."
या अजब मागणीचे महाराजांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्याचं कारण विचारलं. त्यावर हिरोजी म्हणाले
"महाराज आपण जेव्हा जगदीश्वच्या मंदिरात दर्शनाला याल, तेव्हा तुमच्या पायाचा स्पर्श त्या पायरीला होईल… आणि तुमच्या पावलांची धूळ नावावर म्हणजे आमच्या मस्तकावर पडेल, यापेक्षा मोठं पारितोषिक आम्हाला नको आहे.”
हे ऐकून महाराज स्तब्ध झाले. त्यांनी हिरोजींना घट्ट मिठी मारली. डोळ्यांतून पाणी आलं.
आणि हिरोजींनी पायरीवर शिलालेख कोरला-
“सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदुळकर…!”
ही ओळ आजही त्या गडावर बोलते, सांगते-
सेवा हीच खरी निष्ठा आहे. स्वराज्यासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी जीव ओतणाऱ्या सेवकाचं नावच अमर होतं. रायगड उभा आहे, महाराजांची गाथा उभी आहे, पण त्यामागे हिरोजीसारख्या निष्ठावंत सेवकाचं मनोबल आहे. हिरोजीचं जीवन शिकवतं. कीर्ती ही संपत्ती मागून नाही मिळत, ती सेवाभावाने मिळते. खरी समाधी दगडात नसते, ती लोकांच्या हृदयात असते.आणि म्हणूनच आजही रायगड सांगतो-
“सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदुळकर…!”
आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आणि शिक्षणाच्या वाढलेल्या विस्तारित रूपामध्येही जिथे एक वर्षापुर्वी बांधलेला पूल ढासळतो, दोन वर्षपूर्वी बांधलेली बिल्डिंग गळू लागते, दोन महिन्यात रस्ता उधडुन जातो. शेकडो वर्षापासून उभा असलेला रायगड व त्यासारखे किल्ले मजबूत उभे राहतात. याचं कारण ती सेवा होती आपलं सर्वस्व ओतून केलेली. त्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान जरी नव्हतं तरी एकच दृढ विश्वास होता हे कार्य उत्कृष्टातील उत्कृष्ट झालं पाहिजे. जसा आपला विचार असतो तशीच कृती होते आणि त्या पद्धतीने काम होत असतं. अभियंता पहिल्यांदा मनात विचार करतो, मनात आराखडा ठरवतो आणि तो नंतर सत्यात उतरवत असतो. तुमच्या मनामध्येच जर सत्य, दृढता, निश्चय, सेवाभाव असेल तर रायगड नक्की घडेल.
अभियंता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....!
◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642
अभियंता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....!
◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642
#हिरोजीइंदुळकर #सेवेचेठायी_तत्पर #रायगड #शिवराज्याभिषेक #शिवराय #स्वराज्याचेरक्षण #इतिहास #महाराष्ट्राचागौरव #MarathaHistory #Inspiration #HirojiIndulkar #Raigad #ShivajiMaharaj #स्वराज्य #मराठाआइतिहास #अभिमान #Motivation #जयशिवराय #Maharashtra
Comments
Post a Comment