बचक

                    ◆●बचक●◆


           अजून अंधार पडला नव्हता. साडेसहा वाजले असतील. आभाळात थोडा केशरी रंग पसरला होता, आणि दिव्यांची लखलख सुरू झाली होती. मी बीड शहरातल्या पालवन चौकाच्या भाजी मंडईत गेलो. कोरोना लागल्यानंतर ही मंडई तिथं बसू लागली. रांगेनं शेतकरी आपापल्या टोपल्या, पोती, गाडी घेऊन बसलेले. कुणाच्या टोपलीत टवटवीत वांगी, कुणाच्या गाठीत मिरच्या, कुणाच्या ढिगात भोपळा… सगळीकडे ताज्या भाज्यांचा वास. मी चालता चालता भाजी बघत होतो. एका कोपऱ्यात एक शेतकरी दादा बसले होते, गव्हाळ रंग, डोक्यावर जुनं टॉवेल, आणि पायात चप्पल. त्यांच्या टोपलीत ताज्या-ताज्या मुगाच्या शेंगा होत्या. शेंगांचा हिरवा रंगच असा होता की पाहताच हात पुढं जाईल. मला त्या खूप आवडतात, म्हणून मी भाव विचारला. शेतकरी दादा म्हणाले,

 "पन्नास रुपयाला अर्धा किलो, तीस रुपयाला पावशेर." 

मी होकार देणार इतक्यात माझ्या अगोदर एक बऱ्यापैकी देखणा ग्राहक त्यांच्याकडं उभा होता. कपड्यांवरून आणि वागण्यावरून तो चांगल्या घरातला, कदाचित नोकरी करणारा किंवा व्यापारी असावा. त्याने शेतकरी दादांना विचारलं -

"चाळीस रुपयात अर्धा किलो देणार का?"

शेतकरी हलकेच हसले, "नाय हो साहेब, पन्नासचं आहे." पण तो ग्राहक पुन्हा म्हणाला, "द्या ना… चाळीसला काय जातंय ?"

काय करणार, शेतकरी दादांनी होकार दिला. तराजू उचलून शेंगा मोजायला लागले. तो ग्राहक मात्र डोळ्यांनी तोल बघत होता, आणि पारड्यात जरा जरी कमी दिसलं तरी स्वतःहून शेंगा ढकलून घालायला लागला. तराजूचं माप भरल्यावर जास्त झालेल्या शेंगा शेतकरी दादा बाजूला काढत होते. त्यावर तो ग्राहक म्हणाला —

"राहू द्या ना, चार शेंगाणं काय होतं ?"

शेतकरी दादांचा चेहरा क्षणभर गंभीर झाला. त्यांनी हळू आवाजात सांगितलं-

"अहो साहेब, एकेक शेंग माझ्या लेकरांनी, बायकोनं शेतात वाकून तोडलीये. पावसात, उन्हात, काट्यात हात घालून काढलीये. चार शेंगा माझ्यासाठीसुद्धा चार पैशांसारख्या आहेत." 

तरीसुद्धा त्यांनी शेंगा पिशवीत भरून दिल्या. पण पिशवी भरताना दोन-तीन शेंगा परत त्यांच्या ढिगात पडल्या. तो ग्राहक पटकन वाकून बचकभर शेंगा उचलल्या आणि आपल्या पिशवीत कोंबल्या. क्षणभर शेतकरी दादांचा चेहरा उतरला… जसा शेतात पिकलेला भोपळा पावसात पडून कुजतो तसा. त्यांच्या डोळ्यातलं ते दुःख, निराशा — मी बघत होतो आणि मन सुन्न झालं. तरीही त्यांनी तोंडावर काही बोललं नाही, फक्त एवढंच म्हणाले —

"अहो साहेब, आमच्या कष्टाची थोडीतरी जाणीव ठेवा हो… जिथं शेतकऱ्यालाच किंमत नाही, तिथं आमच्या मालाला काय किंमत येणार ?"

त्यांचं ते वाक्य अंगावर बर्फासारखं पडलं. मला खरंच बोलायला शब्द उरले नाहीत. मी माझ्या वाट्याच्या अर्धा किलो शेंगा घेतल्या, पैसे दिले आणि तिथून हळूहळू निघालो. रस्त्यात चालता चालता मनात एकच विचार -हे जे चार शेंगा घेतल्या गेल्या, त्या फक्त शेंगा नव्हत्या, तर त्या शेतकऱ्याच्या लेकरांच्या हातचं कष्टाचं मोल होतं. सकाळपासून शेतीत वाकून, काट्यातून हात ओरबडून, पाठीवर पिशवी लटकवून गावाहून शहरात आलेला तो शेतकरी… त्याच्या घामाचं मोल इतकं कमी? आपण बाजारात जातो, शंभर रुपयांचा पिझ्झा बिनधास्त घेतो. अनेकजण अनेक गोष्टीवर शेकडो-हजारो रुपये खर्च करतात पण शेतकऱ्याला चार शेंगांसाठी भाव घासतो. आपल्या पोटातला घास देणाऱ्या माणसाला आपणच कमी लेखतो. त्या दिवशी मला कळलं- भाजीपाला विकणं म्हणजे फक्त पैसे कमावणं नव्हे, तर त्यामागं शेतकऱ्याचा संसार, त्याचं पोट, त्याच्या लेकरांचा उद्या दडलेला असतो. आणि जर त्या माणसालाच आपण किंमत देणार नाही, तर त्याच्या मालाचं मोल कोण ठेवणार ? चार शेंगा… एवढ्या गोष्टीत एक शेतकऱ्याचं मन हरवून बसलं होतं. आणि मी मात्र फक्त पाहत होतो.


◆श्रीकृष्ण उबाळे, बीड

◆मो.9405344642.

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'