स्व. माजी खासदार अंकुशराव टोपे साहेब – एक आठवण

स्व. माजी खासदार अंकुशराव टोपे साहेब – एक आठवण

          “शिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात २००९ साली झाली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजाटाकळी येथे माझी पहिली नेमणूक झाली. त्या वेळेस आम्ही सर्व तरुण शिक्षक सामाजिक कामाची उर्मी घेऊन उभे होतो. शिक्षकांची वेगवेगळी संघटना होत्या, पण आम्ही डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद या संघटनेतून काम करण्याचा निश्चय केला. शनिवार-रविवार सुट्टीत, वेळ मिळेल तसा आम्ही शिक्षकांचे प्रश्न, सन्मान सोहळे, अधिवेशने आयोजित करायचो. मी स्वतः फक्त एक साधा सभासद होतो, पण प्रत्येक कार्यक्रमात मनापासून सहभागी होत असे. आमच्यात सोपान पाष्टे सर, शंकर बोबडे सर, शशिकांत कावळे सर, हरी भोसले सर, विनोद आरसूळ सर, लक्ष्मण नेव्हल सर, अरुण राऊत सर यांच्यासह अनेक मंडळी होती. सगळे एकत्र येऊन काम करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवायची.
          तारीख २० डिसेंबर २०१४. त्या वेळेस राजेश भैय्या टोपे आमदार व माजी मंत्री होते. आम्ही तरुण शिक्षकांनी कॅलेंडर तयार करून छापलं होतं. डिसेंबर महिना होता. कडाक्याच्या थंडीमध्ये आम्ही सर्वजण कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, अंबडमार्गे जालन्याला निघालो. त्या कॅलेंडरचं प्रकाशन राजेश भैय्या यांच्या हस्ते करायचं होतं. सकाळी आठ वाजता आम्ही त्यांच्या जालना येथील घरी पोहोचलो. आम्ही इतक्या सकाळी त्यांच्या घरी गेलो तरी तिथे आमच्या अगोदर अनेक लोक कामासाठी जमलेले होते. ते मंत्री नसतानाही त्यांच्या घरी जमलेले इतके लोक म्हणजे त्यांच्या कामाची पावतीच होती असं आम्हाला जाणवलं. आ.राजेश भैय्यांना मत्स्योदरी महाविद्यालयात एका मोठ्या कार्यक्रमाला जायचं होतं. घरात गडबड होती. ते निघण्याच्या तयारीत होते. पण आम्ही सर्वजण आलो आहोत हे कळताच त्यांनी आमचं स्वागत केलं. प्रत्येकाचा परिचय करून घेतला. कॅलेंडरचं प्रकाशन केलं आणि आमच्याशी चर्चा करू लागले.
         तेवढ्यात अचानक आमच्या समोर एक व्यक्तीमत्व आलं. उंच बांधा, रुबाबदार चाल आणि आवाजातला दम. ते म्हणजे माजी खासदार स्व. अंकुशराव टोपे साहेब....!
साहेब थोडं हसत, थोडं रागावत राजेश भैय्यांना म्हणाले –

“अरे भैया, तिकडून सरांचा फोन येत आहे. कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली आहे. तुला वेळेचं भान नाही का? तू एकदा बोलायला लागला की, त्याच कामात रमून जातोस. वेळ पाळ रे!”

भैय्यांनी हसत-हसत “मी आलो…” असं दोनदा उत्तर दिलं. पण साहेब दोन वेळा येऊनही परत गेले. शेवटी साहेबांनी थेट भैय्याजवळ येऊन जोरकस आवाजात सांगितलं –
“आता निघ बरं…!”
          त्यांची ती बोलण्याची ढब, शिस्त लावण्याची पद्धत विलक्षण होती. आपला मुलगा मंत्री, आमदार आहे, मोठ्या पदावर आहे, तरीही त्याला वेळ पाळायला शिकवणं, त्याला थांबवणं – हे फक्त साहेबांच्याच हातात होतं. तो क्षण मी प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवला. आजही तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. साहेबांचा तो करारी, स्पष्ट, रुबाबदार स्वभाव मनाला भिडून गेला. साहेबांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलं. घनसावंगी-अंबड परिसरात अनेक शाळा, महाविद्यालयं उभारली. जालना, अंबडसारख्या ठिकाणीच नाही तर ग्रामीण भागातही उच्च शिक्षण पोचवलं. समर्थ सहकारी बँक स्थापन केली. दोन सहकारी साखर कारखाने उभारले. म्हणजे केवळ राजकारणात नाही तर सामाजिक-शैक्षणिक बांधणीमध्येही ते तितकेच प्रभावी होते.
          गोदापट्ट्यातील पाथरवाला बुद्रुकसारख्या छोट्याशा गावातून आलेले अंकुशराव टोपे साहेब पुढे वकील बनले. त्यांची बुद्धिमत्ता तल्लख होती. लोकसभेचे खासदार झाले. त्यांना लोकसभेचा सभासद होण्याची एकदाच संधी मिळाली. त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. त्यांनी संसदेतही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांची भाषणं अभ्यासपूर्ण आणि प्रभावी असायची. संपूर्ण लोकसभा त्यांचं ऐकत राहायची. काल १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड रेल्वे स्थानकाचे उद्घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं. बीडच्या रेल्वेचा प्रश्न आपल्या खणखणीत वाणीने आणि इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी लोकसभेमध्ये मांडला होता. आणि योगायोगाने १८ सप्टेंबर तारखेला त्यांची जयंती आहे. आज त्यांची आठवण काढताना वाटतं – ते खरे अर्थाने 'गावाकडचा मुलगा' होते. त्यांना ग्रामीण लोकांचे जीवन सुधारावं, ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावर जावं यासाठी धडपडावा वाटलं. त्या मुलाने संपूर्ण देशात आपलं नाव गाजवलं. त्यांच्या जयंतीनिमित्त आज मी त्यांच्या स्मृतीपुढे विनम्र अभिवादन करतो. हा माझा एक साधा अनुभव, पण त्यातून मला जे उमगलं ते म्हणजे –शिस्त, वेळेचं भान आणि लोकहितासाठी सातत्याने काम करणं – हेच खरं नेतृत्वाचं गमक आहे. आज मी त्यांच्याच पाथरवाला बुद्रुक या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहे याचाही मला विशेष गर्व वाटतो.

स्व. अंकुशराव टोपे साहेबांच्या आठवणीला मनःपूर्वक वंदन...!!💐

◆ श्रीकृष्ण सुंदरराव उबाळे
◆मो.९४०५३४४६४२

#अंकुशरावटोपे #AankushraoTope #नेतृत्वाचीओळख #मराठवाड्याचा_आवाज #सामाजिकभान #जनतेचानेता #लोकनेता #जालना #विदर्भमराठवाडा #सदाहरितआठवण #InspirationalLeader #MarathwadaLeader #PoliticalJourney #PublicServant #PeopleFirst

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी