सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत.....!!

सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत.....!!
                सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात तसेच प्रत्येक जिल्ह्यात, आपल्या बीडमधील आजूबाजूच्या तालुक्यांत आणि गावोगावी एकच चर्चा चालू आहे की बिबट्यांची दहशत वाढली, बिबट्या गावात शिरला, शेतात दिसतोय, माणसांवर हल्ले होतातायत. हे ऐकल्यावर भीती वाटणं साहजिक आहे, पण थोडं शांतपणे विचार केला तर कळतं की खरंतर दहशत बिबट्यांची नाही, दहशत आपल्या गैरसमजांची आहे. बिबट्या हा काही आज कालच जंगलातून बाहेर पडलेला प्राणी नाही, तो इथेच होता, आपल्या आजोबांच्या काळातही होता, फरक एवढाच आहे की तेव्हा जंगलं, झुडपं, डोंगररांगा होत्या, आज तिथं रस्ते झाले, कारखाने झाले, वसाहती वाढल्या, उसाची शेती सगळीकडं पसरली आणि बिबट्याचा आसरा कमी झाला. जिथं लपायला उस आहे, पाणी आहे, मोकाट कुत्रे आहेत, डुक्कर आहेत, शेळ्या, मेंढ्या आहेत, तिथं बिबट्या येणारच, त्याला गावात यायची हौस नसते, त्याला फक्त पोटाची आणि जगायची गरज असते. लोक म्हणतात बिबट्यांची संख्या फार वाढली, पण खरं सांगायचं तर बिबट्यांपेक्षा माणसांची संख्या आणि आपला निसर्गातला हस्तक्षेप जास्त वाढला आहे. आपण शेतात, जंगलाच्या हद्दीत घुसलो, घरं बांधली, झाडं तोडली, पण बिबट्या दिसला की म्हणतो तो आमच्या गावात आला. खरं तर आपण त्याच्या जागेत गेलो आहोत.
          आता काही जण भावनेच्या भरात म्हणतात की सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत, पण हे बोलणं जितकं सोपं आहे तितकंच ते घातक आहे. बिबट्या नसला तर मोकाट कुत्रे वाढतात, डुक्कर वाढतात, रोग पसरतात, अपघात वाढतात, आणि मग तेच लोक म्हणतात की प्रशासन काहीच करत नाही. निसर्गात प्रत्येकाचा एक रोल असतो. काही जण म्हणतात की सगळ्या बिबट्यांची नसबंदी केली पाहिजे, पण हे शहरात बसून काढलेले उपाय आहेत. बिबट्या म्हणजे शेळी नाही की पकडून ऑपरेशन करून सोडायचं, तो वन्य प्राणी आहे, चपळ आहे, हजारो बिबट्यांना पकडणं अशक्य आहे आणि त्यातच कित्येक बिबटे मरतील, मग फायदा कुठं आहे. मग उपाय काय, तर आधी भीती कमी करायची, अफवा थांबवायच्या, बिबट्या दिसला म्हणून गावभर गर्दी करायची नाही, दगडफेक, आरडाओरडा करायचा नाही, लगेच वनविभागाला कळवायचं. मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, उसाच्या शेतात रात्री उगाच जाणं टाळायचं, शेतात लाईट, कुंपण, आवाजाची साधनं ठेवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिबट्याला शत्रू मानायचं नाही, तर तो आपल्याच परिसरात राहणारा एक जीव आहे हे समजून घ्यायचं. शेवटी एवढंच सांगायचं आहे की बिबट्या संकट नाही, तो संकटाची खूण आहे. आपण निसर्ग किती मोडतोय, याचा इशारा तो देतोय. बिबट्या मारून प्रश्न सुटत नाहीत, शहाणपणाने वागून, सहअस्तित्व स्वीकारूनच आपलं आणि पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित राहील, नाहीतर आज बिबट्या संपवू, उद्या निसर्गच आपल्याला संपवेल.

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642

#बिबट्याचा_वास्तव #बीड_ग्रामीण_आवाज
#बिबट्या_दहशत_की_गैरसमज
#निसर्गाशी_सहअस्तित्व
#बिबट्या_शत्रू_नाही #वन्यजीव_संरक्षण
#ग्रामीण_वास्तव #मराठवाडा
#बीड_जिल्हा #निसर्ग_समतोल
#अफवा_थांबवा #शहाणपणाने_वागा
#पर्यावरण_जपा #वनविभाग_सहकार्य
#मानव_आणि_निसर्ग

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'