बीडच्या डोंगर पट्ट्यातील निवडुंग वनस्पती धोक्यात



बीडच्या डोंगर पट्ट्यातील निवडुंग वनस्पती धोक्यात

च-हाटा परिसरात पांढऱ्या रोगाचा फैलाव; निवडुंग मोठ्या प्रमाणावर नष्ट

◆श्रीकृष्ण उबाळे

◆मो.9405344642


बीड: बीड जिल्ह्यातील डोंगराळ व कमी पावसाच्या पट्ट्यात नैसर्गिकरीत्या उगवणारी आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक मानली जाणारी निवडुंग वनस्पती आज गंभीर संकटातून जात आहे. अलीकडच्या महिन्यांमध्ये पांढऱ्या किडीचा (mealy bug) प्रादुर्भाव एवढ्या वेगाने वाढला आहे की च-हाटा गावासह आसपासच्या संपूर्ण डोंगरपट्ट्यात ही वनस्पती जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. निवडुंगाच्या खोडावर पांढऱ्या रंगाचा चिकट थर दिसू लागतो आणि काही आठवड्यांतच संपूर्ण झाड व्यापून टाकतो. ही कीड रस शोषून घेत असल्याने झाड पूर्णपणे कमजोर होते, पिवळे पडते आणि अखेरीस पूर्णपणे सुकून जाते. गेल्या काही वर्षांत कधीही न दिसलेला एवढा मोठा प्रादुर्भाव या वर्षी प्रथमच नजरेस पडत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. ग्रामीण आणि डोंगराळ भागात निवडुंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो-माती धूप होऊ नये म्हणून मृदासंरक्षण करतो, पावसाचे पाणी धरून ठेवून भूजल पातळी वाढवतो, विविध पक्षी, सरडे, साप, कीटक आणि लहान प्राण्यांचे आश्रयस्थान, कमी पावसाच्या प्रदेशातील जैवविविधतेचा आधारस्तंभ अशी ही वनस्पती आहे. विशेष म्हणजे या वनस्पतीची रचना अत्यंत विलक्षण आहे. पानं काट्यात रूपांतरित झाल्याने ही वनस्पती उष्णतेत टिकून राहते, तर हिरव्या खोडावरून प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया चालते. उन्हाळ्यात हिरवी व पावसाळ्यात लालसर फळे येणारा निवडुंग हा डोंगर व रानवाटांचा ओळखीचा साथीदार आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते गेल्या काही वर्षांत हवामानात अनियमितता वाढली आहे. पावसाळ्यात कधी अतिवृष्टी, तर कधी दीर्घकाळ दुष्काळ, तापमानातील अनियमित चढ-उतार, वाढते वायू प्रदूषण, डोंगर व रान परिसरातील वृक्षतोड या सर्वांमुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. निवडुंगासारख्या काटेरी आणि कठीण परिस्थितीत टिकणाऱ्या वनस्पतीवरदेखील संसर्ग होणे ही चिंता वाढवणारी बाब असल्याचे तज्ञांनी नमूद केले आहे.

◆च-हाटा परिसरातील स्थिती गंभीर :

च-हाटा गावातील डोंगर पठार, चराई क्षेत्र, बांधांवर आणि मळ्याच्या वाटांवर आढळणारे शेकडो निवडुंग झाडे आता पांढऱ्या किडीने झाकली गेली आहेत. काही झाडे पूर्णपणे कोमेजून काळसर पडली असून काही ठिकाणी संपूर्ण निवडुंग पट्टेच नष्ट झाले आहेत.
स्थानिकांच्या मते, “पूर्वी निवडुंगामुळे डोंगर हिरवे आणि जिवंत वाटायचे, पण आता उघडी वाळलेली जागा दिसते.” ही परिस्थिती लक्षात घेता पर्यावरण अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने खालील उपाय करण्याची मागणी केली आहे—वन विभागाने सर्वेक्षण मोहीम राबवावी, पांढऱ्या किडीवरील नियंत्रण उपाय जाहीर करावेत, नैसर्गिकरीत्या निवडुंग वाढवण्यासाठी नवीन रोपे लावावीत, डोंगर परिसरातील वृक्षतोड रोखण्याची मोहीम मजबूत करावी, कीटकनाशकांचा पर्यावरणपूरक वापर करण्याची मार्गदर्शक तत्त्वे द्यावीत. तज्ञांच्या इशाऱ्यानुसार, जर वेळेत उपाययोजना न केल्यास ही स्थानिक व पर्यावरण रक्षक वनस्पती उद्या पूर्णपणे नामशेष होण्याची भीती आहे. ही वनस्पती टिकली, तरच डोंगरपट्ट्याचं भविष्य सुरक्षित राहील, असा इशारा पर्यावरण प्रेमी देत आहेत.

◆पर्यावरण अभ्यासकांची प्रतिक्रिया :

"बीडच्या डोंगर पट्ट्यात निवडुंग वनस्पती नष्ट होण्याची सुरू झालेली प्रक्रिया अत्यंत चिंताजनक आहे. पांढऱ्या किडीमुळे संपूर्ण परिसराची नैसर्गिक साखळीच विस्कळीत होत आहे. निवडुंग ही फक्त काटेरी झुडूप वनस्पती नाही, तर डोंगर उतारावरचा सर्वात मोठा रक्षक आहे. आज तोच रक्षक धोक्यात आल्यास उद्या मृदासंरक्षण, जैवविविधता आणि भूजल यांचं संतुलन ढासळणार आहे. हवामान बदल आणि प्रदूषणामुळे वाढणारे हे रोग वन विभागाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात संपूर्ण डोंगर पट्टा ओसाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडुंग वाचवणे म्हणजे संपूर्ण पर्यावरण वाचवणे—ही जबाबदारी आपली सामूहिक आहे."

◆अभिमान खरसाडे, पर्यावरण अभ्यासक



Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'