खरोखर 'तुकाराम' मुंढेंचे निलंबन नव्हे बडतर्फी करायला हवी...!!

खरोखर 'तुकाराम' मुंढेंचे निलंबन नव्हे बडतर्फी करायला हवी...!!

              आजही आपल्या समाजात सत्य बोलणारा, नियम पाळणारा आणि सरळ चालणारा माणूस ‘समस्या’ समजला जातो. इतिहासात संत तुकाराम महाराजांना तत्कालीन व्यवस्थेने सहन केले नाही, त्यांच्या अभंगांनी ढोंगीपणाचा मुखवटा फाडला म्हणून त्यांना विरोध झाला. आजचा काळ बदलला… पण ढोंगीपणा, भ्रष्टाचार, पूरकतेची मानसिकता अजिबात बदलली नाही. तुकाराम म्हणजे सत्यनिष्ठा. सत्यासाठी जगणे, सत्यासाठी उभे राहणे, सत्यासाठी झगडणे हीच त्यांची शिकवण. ते म्हणालेच आहेत : “सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे…” सत्यावर असंख्य अभंग....कारण त्यांना माहिती होते की मनुष्याला सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सत्य जगणे.
         आज या सत्यनिष्ठ विचारांचा वारसा पुढे नेणारा एक अधिकारी—तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईचे राजकारण सुरू आहे. कारण? ते नियम पाळतात. भ्रष्टाचार सहन करत नाहीत. सिस्टिममधील सडलेले चेहरे उघडे करतात.बोगस अपंग योजनेचा गैरवापर करणार्‍यांवर कारवाई करतात. आणि म्हणून त्यांना सतत बदली, निलंबन, दबाव याला सामोरं जावं लागतं. हेच तर भीषण वास्तव आहे. आपल्या देशात… लाच घेणाऱ्याचे कौतुक, लाच न घेणाऱ्याची चौकशी. अपराध्यांचे राजकीय संरक्षण, प्रामाणिकांचे सतत बदलीकरण. जी व्यवस्था भ्रष्टांना हात जोडते, पण इमानी अधिकाऱ्यांना टाचेवर बसवते—ती व्यवस्था स्वतःच आजारी आहे. असे अधिकारी “अडथळा” बनतात कारण ते सिस्टिममध्ये बसलेल्या अनेकांच्या पोटावर पाय ठेवतात. म्हणूनच त्यांना आवडत नाही.सत्य सांगणारा नेहमीच एकटा पडतो, कारण खोट्याने आपला जाळ जगभर पसरवलेला असतो. आजची व्यवस्था संत तुकारामांना आवडली नाही,तेव्हाची व्यवस्थाही तुकाराम महाराजांना आवडली नाही.सत्य सांगणाऱ्याचा मार्ग नेहमीच काटेरी राहिला आहे. प्रश्न फक्त एवढाच...आपण कोणाच्या बाजूला? सत्याच्या? की खोट्या, भ्रष्ट, कमजोर व्यवस्थेच्या जी सत्याचा आवाज ऐकूच इच्छित नाही? जोवर अशा तुकाराम मुंडे यांना पाठिंबा देणारे हात कमी राहतील, तोवर सत्यवादी लोकांना शिक्षा आणि भ्रष्टांना सत्ता-हे वास्तव असंच भीषण राहणार आहे. तुकाराम मुंढे हे भ्रष्टाचाराला विरोध करतात. सत्याने चालतात त्यामुळे त्यांना या व्यवस्थेत राहण्याचा भ्रष्टाचारी लोकांच्या दृष्टीने, व्यवस्थेच्या दृष्टीने कुठलाच अधिकार नाही. त्यामुळे त्यांना निलंबितच काय भाजपचे आमदार खोपडे का कोण साहेब तुम्ही तुकाराम मुंढे यांना कायमस्वरूपी बडतार्फ करा आणि तुमच्यासारख्या 'पार्टी विथ डिफ्रन्स'च्या नेत्यांना चरायला रान मोकळं करा...! 

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'