ज्ञानऋषींच्या दर्शनाने समृद्ध झालेला दिवस

◆◆ज्ञानऋषींच्या दर्शनाने समृद्ध झालेला दिवस◆◆

(डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या भेटीचा अविस्मरणीय अनुभव)
         कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात की त्या क्षणांचं स्मरण मनाला पुन्हा पुन्हा उभारी देतं, आत्मा प्रफुल्लित करतो आणि विचारांच्या नव्या वाटा दाखवतो. असा एक क्षण माझ्या आणि नितीन महाराज पिसाळ यांच्या आयुष्यात आला- जेव्हा आम्हाला आजच्या काळातील ज्ञानऋषी, मानवतावादी चिंतक आणि लोकशिक्षक डॉ. आ. ह. साळुंखे सर यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा आणि संवादाचा योग आला. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरमध्ये डॉ. जयसिंगराव पवार सरांचा निरोप घेऊन साताऱ्याकडे निघालो होतो. प्रवास जरी लांब होता, तरी मनात उत्साह ओसंडून वाहत होता. कारण आज आपण त्या व्यक्तिमत्त्वाला भेटणार होतो ज्यांनी महाराष्ट्रात विवेक, विज्ञाननिष्ठा, मानवता आणि तुकारामांच्या विचारांची आधुनिक व्याख्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवली आहे. सुमारे सायंकाळी पाचच्या सुमारास आम्ही साताऱ्याच्या बसस्थानकावर पोहोचलो. तिथून रिक्षा करून आम्ही गेंडामाळ येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. राकेश दादा- म्हणजेच साळुंखे सरांचे सुपुत्र- यांनी आमचं मनापासून स्वागत केलं. त्यांच्या नम्रतेत आणि विनम्रतेतच घरातील संस्कारांची झलक होती. त्या वेळी तात्या-म्हणजेच डॉ. आ. ह. साळुंखे सर विश्रांती घेत होते. त्यांना भेटायला काही जण आधीच आले होते. राकेश दादांनी आम्ही बीडहून आलो आहोत हे सांगितल्यावर थोड्याच वेळात सर वॉकरच्या साहाय्याने चालत बाहेर आले. त्यांच्या चालण्यात थोडा मंदपणा होता, पण त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता, डोळ्यांतील प्रसन्नता आणि विचारांतली खोली पाहून आमचं मन नतमस्तक झालं. त्या क्षणी असं वाटलं की आपण एखाद्या महासागरासमोर उभे आहोत-जिथे शब्दांचा प्रत्येक थेंब ज्ञानाचा मोती बनतो. समृद्धी म्हणजे काय, शांतता म्हणजे काय आणि खऱ्या अर्थाने विद्वत्ता म्हणजे काय- हे सगळं एका क्षणात त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून जाणवलं.
            माझी आणि त्यांची ही दुसरी भेट होती. जुलै २०१९ मध्ये बीडमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्यांना भेटून मी 'बालतरंग' हा माझा बालकविता संग्रह भेट दिला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने छापलं आहे असं सांगितलं होतं. त्यावर त्यांनी अत्यंत कुतूहलान एक दोन कविता वाचून पाहिल्या होत्या व माझं अभिनंदन केल होतं. पण गर्दीत झालेली भेट जास्त बोलता आलं नव्हतं. यावेळी तर प्रत्यक्ष संवाद साधायचा व भेटण्याचा योग लाभला होता. त्यांनी आम्हाला विचारलं-“कुठून आला? काय करता?” आम्ही सांगितलं की आम्ही शिक्षक व कीर्तनकार आहोत. हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर एक हळव, पण समाधानाच हास्य फुललं. संवाद पुढे सरकला. मी त्यांना सांगितलं की त्यांच्या ‘विद्रोही तुकाराम’, ‘अभंग शतक’ आणि ‘न सरे ऐसे तुकोबांचे दान’ या ग्रंथांचे मी अभ्यासक आहे. हे ऐकल्यावर त्यांचा आनंद अधिक वाढला. मग आम्ही तुकारामांच्या विचारांवर, आजच्या समाजातील मूल्यसंस्थेवर, शिक्षणाच्या दिशेवर, आणि कीर्तन परंपरेच्या बदलत्या रूपावर चर्चा केली. वादग्रस्त असणा-या मुद्द्यांना जास्त महत्त्व न देता तुकोबांचे अभंग आजच्या समाजाला जीवन जगण्यासाठी कसे प्रेरणादायी आहेत व त्या अभंगाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रचार करावा. आजच्या समाजाचे खचलेलं मनोबल वाढवावे. तरुणांमध्ये प्रेरणा द्यावी, समाजामध्ये जागरूकता वाढवावी यासाठी अभंग तुम्ही प्रसारीत करावेत आणि ते महत्त्वाचं आहे असं त्यांनी आम्हाला सुचवलं.
           बोलताना ते म्हणाले, “सत्याचा मार्ग नेहमी एकाकी असतो, पण जो त्यावर टिकतो तोच लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करतो.” त्यांचं प्रत्येक वाक्य म्हणजे विचारांचं दालन होतं. ते बोलत असताना जणू शब्द नव्हते, तर जीवनाचं तत्त्वज्ञानच आमच्यासमोर उलगडत होतं. मी त्यांच्यावर लिहिलेली  'आण्णा माझा' ही कविता ऐकवली.

"सत्याचा शोधक असत्या बाधक | 
ढोंगांचा वधक आण्णा माझा ||
बळीचा शाहीर भूमिका जाहिर | 
शब्दांचा माहीर आण्णा माझा ||
लोकायत धारा जीवन उद्धरा | 
मानवतेचा झरा आण्णा माझा ||
बुद्धाचं सपन अमृताची खाण | 
बहुजना शान आण्णा माझा ||
तुकोबांची आग शोषणाचा राग | 
प्रबोधन जागं आण्णा माझा ||
ज्ञानाचा सागर स्फूर्तीचे आगर | 
अखंड जागर आण्णा माझा ||"
त्यांनी ती शांतपणे ऐकली, मग काही अत्यंत सूक्ष्म पण महत्त्वाच्या सूचना दिल्या. म्हणाले-“कविता म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही, ती सत्याला दिलेलं हृदयाचं रूप असते.” आणि मग त्यांनी सौम्य आवाजात सांगितलं- “सत्य मांडत रहा. जगाच्या भीतीने शब्द रोखू नका. शब्द जर प्रामाणिक असतील तर त्यांची पूजा होते.” त्या क्षणी मला तुकोबांची ओळ आठवली- ‘तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्दाची गौरव पूजा करू’. एक दीड तास कसा निघून गेला, आम्हालाच कळलं नाही. तो संवाद म्हणजे साधं बोलणं नव्हतं, तर एका विचारविश्वाची यात्रा होती. त्या प्रवासात आम्ही स्वतःच्या विचारांचं पुनर्मूल्यांकन केलं. सरांनी सांगितलं की त्यांची कन्या आमच्या बीडमध्ये दिलेली आहे- आणि त्या निमित्ताने आमच्यात अजून आपुलकीचं नातं जडलं.
             संवादानंतर आम्ही तात्यांना शाल अर्पण करून त्यांचा सन्मान केला. ‘मायबापे केवळ काशी’ हा आमचा ग्रंथ त्यांना भेट म्हणून दिला. त्यांनी प्रेमाने स्वीकार केला आणि आशीर्वादही दिला. यानंतर राकेश दादांनी आम्हाला खाली असलेल्या त्यांच्या ग्रंथदालनात नेलं. त्या ठिकाणी शेकडो ग्रंथांची शिस्तबद्ध मांडणी होती. प्रत्येक पुस्तक म्हणजे सरांच्या आयुष्याचा एक अध्याय वाटत होता. त्यांनी आम्हाला काही ग्रंथ दाखवले, आणि दोन-तीन पुस्तके प्रेमाने भेट दिली. मी तिथे “शिवभारत”- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ग्रंथ- विकत घेतला. संध्याकाळचे सात वाजत आले होते. निरोप घेण्याची वेळ आली. आम्ही राकेश दादांना आणि साळुंखे सरांना नम्र प्रणाम केला. त्या क्षणी मनात एक वेगळीच शांतता उतरली होती- जणू काही अंतर्मनातील गोंधळ, संभ्रम आणि अस्वस्थता सगळं निवळून गेलं होतं. त्या भेटीचा अनुभव म्हणजे ‘मनशांतीचा महामंत्र’ होता. आजच्या गोंगाटमय जगात जिथे प्रत्येकाला यश हवं आहे पण ज्ञान नाही, प्रसिद्धी हवी आहे पण प्रामाणिकता नाही, तिथे साळुंखे सरांसारखे विचारवंत हे जणू दिशादर्शक दीप आहेत. त्यांनी आयुष्यभर ‘विवेक’ आणि ‘मानवता’ यांचं एकत्रित तत्त्व मांडलं. त्यांच्या प्रत्येक ग्रंथात समाजाच्या उन्नतीची चिंता आहे आणि प्रत्येक शब्दात सत्याचा शोध आहे. बीडकडे परतताना आम्ही दोघंही शांत होतो, पण ती शांतता रिकामी नव्हती- ती समाधानाची, कृतज्ञतेची आणि नव्या प्रेरणेची होती. आजही त्या भेटीचा विचार आला की मनात एकच भाव उमटतो-“ज्ञानाची ती भेट नव्हती फक्त, ती आत्मजागृतीची सुरुवात होती.”

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◆मो.9405344642

Rakesh Salunkhe 
 Shrikrishna Ubale 
नितिन महाराज पिसाळ 

#ज्ञानऋषी #आहसाळुंखेसर #डॉआहसाळुंखे #विवेकवादीचिंतन #तुकारामविचार #प्रेरणादायीभेट #सातारा #बीड #कीर्तनपरंपरा #ज्ञानप्रेरणा #मानवतावाद #सत्याचामार्ग #मराठीलेखन #मराठीसंस्कृती #डॉआहसाळुंखेभेट #शब्दचिदेव #सत्यमांडतरहा #प्रेरणास्त्रोत #ShrikrishnaUbale #NitinMaharajPisalk

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'