नेमबाजीची बक्षिसी

◆●नेमबाजीची बक्षिसी●◆


        बालपण म्हणजे निरागस खट्याळपणा. त्या वयात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची आपली सवय असते. कुणाच्या बागेतून आंबे पाडणं, शेतातल्या झाडांवर चढणं, शाळेतून सुट्टी करून नदीत पोहायला जाणं – हे सगळं जरी त्या काळी फार मोठं वाटायचं, तरी आज आठवलं की चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं. मी सहावी-सातवीत असेन. उन्हाळ्याची दुपार. शाळा सुटली होती आणि आम्हा मुलांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता – आंब्याला पाड लागलाय, चला मग आंबे खाऊन येऊ. त्या काळी आंब्याचा प्रत्येक पाड आमच्या दृष्टीने खजिनाच होता. मांजरदरा शेतात भरत बाप्पूचं वावर होतं. त्या वावरात उभा असलेला "काळू-बाळू" नावाचा एक अफाट आंबा आम्हा मुलांचा आवडता होता. उंचीने मोठा, फांद्यांनी दाट आणि आंब्यांनी ओथंबलेला. आम्ही लांबूनच त्याच्याकडे बघत राहायचो. डोकं वर केलं की पिकलेले आंबे डोळ्यांना दिसायचे आणि तोंडाला पाणी सुटायचं. पण त्या आंब्याला एक मोठा अडसर होता – तीन-तीन आग्या मोहळं. मोहळाच्या माशांचा सैन्य त्या झाडाभोवती कायम घिरट्या घालायचं. साधा दगड झाडावर आदळला की माशा भुणभुण करत बाहेर पडायच्या आणि पळता पळता आमच्यापैकी कुणाला तरी डंख करून जायच्या. त्यामुळे बहुतेक मुलं त्या झाडाजवळ जाऊन आंबे तोडायची हिंमत करत नसत.

         मी मात्र नेमबाज म्हणून पोरांत थोडा प्रसिद्ध होतो. कुठलाही आंबा दोन-तीन दगडात खाली पाडणं ही माझी खासियत होती. त्यामुळे मुलांना वाटायचं – "बापू आहे तो नेमबाज, तो आला की आपलं काम झालं!" त्या दिवशीही असंच झालं. मी सहज आंब्याच्या झाडाजवळ गेलो तर तिथं आधीपासून मुलांचा घोळका जमला होता. त्यांच्याकडे एक "नामी योजना" तयार होती. पण त्या योजनेची मला कल्पना नव्हती. "बापूचा नेम भारी....! आग्या मोहळ एका दणक्यात पडेल," असं ते सगळे मला फुगवू लागले. मीही मनोमन आनंदलो – काय आपल्याला मान मिळतोय....! त्यांच्या कौतुकाच्या शब्दांनी मी त्यांच्या जाळ्यात अडकलो.

               मुलांनी दोन ठिकाणी धूर केला होता. त्यांचा विचार असा – धुराजवळ बसल्यावर मधमाशा आपल्याला चावणार नाहीत. त्यामुळे ते निर्धास्त बसले. आता सगळी जबाबदारी माझ्यावर. मी हातात एक "चिप" – पातळ दगड – घेतला. आकाशात फेकून नेम मोहळाकडे साधला. नेम अगदी अचूक लागला. मोहळ अर्धं तुटलं आणि सरळ खाली… पण दुर्दैव असं की, ते अगदी माझ्या अंगावरच आलं...!क्षणात हजारो मधमाशा माझ्या भोवती भुणभुण करू लागल्या. पुढं मी आणि मागं त्या. माझ्या आयुष्यातली ती सगळ्यात भन्नाट शर्यत होती. मी पळत पळत नदीच्या काठावर आलो. धावताना पाय येलात अडकला आणि मी थेट नदीत पडलो. कपडे फाटले, अंग खरचटलं, पण मधमाशांपासून सुटका होणं महत्वाचं होतं. तरीही माशा पाठलाग सोडायला तयार नव्हत्या. मी थेट डोंगराकडे पळालो. तिथं रावसाहेब भाऊ भेटले. त्यांना बिडी प्यायची सवय होती. त्यांनी धुराचा जाळ केला. धुरामुळे माशा बाजूला झाल्या आणि मी माशांच्या तावडीतून बचावलो.

          मला वाटलं, आता तर मी वीर झालो. इतक्या धाडसाने मोहळावर नेम साधला, आंबे मिळाले नाहीत पण अनुभव भारी मिळाला. पण खरा प्रसंग तर घरी होता. आमच्यातल्या एका मुलाने धावत जाऊन आईला सगळं सांगितलं होतं. मी घरी पाऊल टाकताच आईने "बापू, आज काय केलंस?" असं विचारलं. मी काही बोलायच्या आतच तिच्या हातातलं ओलं फोक माझ्या अंगावर वाजलं. आईची धुलाई म्हणजे नेमबाजीचं खरं बक्षिस...! आंबे न मिळाले, मोहळाचा धक्का बसला, माशांचे डंख खाल्ले आणि शेवटी आईची मारहाणही खाल्ली. त्या दिवशी एक गोष्ट पक्की लक्षात राहिली-आंब्यावर मोहळ असलं की तो आंबा पाडणं म्हणजे आपलं काम नाही. मोहळाचं सैन्य आपल्या नेमापेक्षा जास्त ताकदवान असतं. बालपणीच्या अशा आठवणी कधीच विसरता येत नाहीत. त्या वेळी आलेले डंख, पडलंले खरचटलेले गुडघे, आईकडून मिळालेली शिक्षा – सगळं आजही गोड वाटतं. आज मागे वळून पाहिलं की वाटतं, खरं तर त्या "नेमबाजीच्या बक्षिसीने" मला जीवनाचा एक मोठा धडा शिकवला – गेल्या पिढीची धुलाई आणि निसर्गाची शिकवण हेच खरं सोनं आहे. आता जेव्हा उन्हाळ्यात आंब्याचे पाड लागतात, तेव्हा काळू-बाळूच्या झाडाखालचे ते दिवस आठवतात आणि नकळत हसू येतं.

◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642

#नेमबाजी #बालपणाच्या_आठवणी #आंब्याची_गम्मत #मधमाशांचा_पाठलाग #उन्हाळ्याची_मजा #गावठी_कथा #बालपण_झिंगाट #खट्याळपणा #आंब्याचा_हंगाम #गमतीजमती #बालपणाची_बक्षिसी #मस्त_आठवणी

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'