कुत्रे आणि समाज आरसा एकच आहे

◆कुत्रे आणि समाज : आरसा एकच आहे...!◆

            आजच्या समाजात ‘कुत्रे’ हा शब्द फक्त प्राण्यापुरता मर्यादित नाही. कुणाला कमी लेखायचं, कुणाचं वागणं दाखवायचं, कुणावर व्यंग करायचं- की झालं लगेच “अरे, तो तर कुत्र्यासारखा भुंकतो...!” असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर, समाजातल्या अनेक प्रवृत्ती या अगदी कुत्र्यांसारख्याच झाल्या आहेत. कुत्रं भुंकण्यासाठी प्रसिद्ध आहे- कारण असो वा नसो, त्यांना भुंकल्याशिवाय चैन पडत नाही. आजची माणसंही तशीच झाली आहेत. सोशल मीडियावर, राजकारणात, गावपातळीवर... कुणी काही बोललं की लगेच टोळकं भुंकायला लागतं. तथ्य, विवेक, संयम या गोष्टींचं काही घेणंदेणं नाही- फक्त आवाज मोठा हवा एवढंच....! काही कुत्रे पाळीव असतात- मालकाच्या ‘छो’वर चालतात. समाजातही असे बरेच ‘पाळीव’ माणसे आहेत. नेता, संस्थाचालक, किंवा आर्थिक मालक जे म्हणतील तेच करायचं. विचार स्वतःचा नसतो, पण आदेश मिळाला की “तुटून पडायचं ” हाच त्यांचा धर्म. काही कुत्रे मात्र मोकाट असतात. मालक नाही, नियंत्रण नाही-जसं मनात येईल तसं वागतात. शहरात, गावात, गल्लीबोळात, पानटपरीवर सगळीकडे त्यांचं ‘राज्य’! अशा माणसांनाही आपण दररोज पाहतो- समाजाच्या रस्त्यावर मोकाट फिरणारे, कोणत्याही जबाबदारीशिवाय ‘भुंकत’ राहणारे.
        कुत्र्यांचं आणखी एक वैशिष्ट्य- एक भुंकलं की सगळी टोळी भुंकते! आजच्या काळातही असंच होतंय. एकाने अफवा टाकली की सगळे शेअर करतात. विचार न करता, तपास न करता- फक्त टोळधाडीनं प्रतिक्रिया देतात. समाजाचं विवेकबुद्धीचं ‘भुंकणं’ सुरु झालंय.  गाडीखाली चालणाऱ्या कुत्र्यांना वाटतं- “गाडी आपल्यामुळे चालली.” समाजातही असे बरेच ‘कुत्रे’ आहेत ज्यांना वाटतं की देश, समाज, संस्था त्यांच्या दमावर चालते. काही कुत्रे हत्ती दिसला की भुंकायला लागतात. हत्ती मात्र शांत असतो, कारण त्याला माहिती असतं- भुंकणं आणि चालणं यात फरक असतो. काही कुत्रे मोठ्या फोरव्हीलरमध्ये बसतात-बीस्किट खातात, रुबाबात फिरतात. त्यांचा मालक मोठा असतो. समाजातही असे लोक आहेत जे ‘मोठ्यांच्या’ सावलीत जगतात. स्वाभिमान नाही, पण स्टेटस भारी असतो. काही मोकाट कुत्रे खरकट्यावर जगतात पण दिसायला झापुक झुपुक असतात. तसंच काही लोक खोट्या दिखाव्यावर जगतात- सत्य, नैतिकता, श्रम यांचा काही संबंध नाही. पोलिसांचे कुत्रे मात्र वेगळे- त्यांना प्रशशकीय कुत्रे म्हणतात. शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ, नि:स्वार्थ. हे आपल्याला सांगतात की कुत्रेपणातही प्रामाणिकपणा असू शकतो-पण माणसपणात मात्र त्याचा अभाव जाणवतो.
            कुसुमाग्रजांनी सांगितलं-“भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका”. पण आज समाजात भलेपणावरच सर्वाधिक भुंकणं होतं. चांगले काम करणारा कोणीतरी दिसला की लगेच टोमणे, टीका, अपप्रचार. तुकाराम महाराजांनी जेव्हा “श्वान शीघ्रकोपी” म्हटलं तेव्हा ते फक्त प्राण्याबद्दल नव्हते बोलले- ते माणसाच्या कुत्रेपणाबद्दलही सांगत होते. जो विचार न करता संतापतो, जो दुसऱ्यावर भुंकतो, जो चांगुलपणाचा तिरस्कार करतो- तो खरं तर ‘श्वान’च आहे. आज समाजात भुंकणाऱ्यांची संख्या वाढतेय. खरकटं वाढल्यामुळेच कुत्रे वाढतात. आणि समाजात घाण वाढली की तिथं असलेले “कुत्रे”ही वाढणारच. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात-

“भुंकती ती द्यावी भुंको lआपण त्यांचे नये शिको ll

 "भुंकू नका भुंकू नका l आला तुका विष्णुदास ll"

म्हणजेच, भुंकणाऱ्यांना उत्तर देण्यात अर्थ नाही. कारण ते कुत्र्याचं काम करतात-आणि आपण माणूस आहोत, हे विसरू नये. कुत्र्यांचं एकच चांगलं वैशिष्ट्य आहे-ते त्यांच्या मालकावर निष्ठा ठेवतात. पण आज समाजात लोक निष्ठा मालकावर नाही, तर स्वार्थावर ठेवतात. त्यामुळे कुत्रे तरी प्रामाणिक राहिले, पण माणसं मात्र ‘भुंकणं’ शिकले...माणूसपण विसरले....!

◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642

#कुत्र्यांचेजीवन #व्यंगचित्र #मराठीव्यंग #समाजआरसा #ShrikrishnaUbale #कुत्रेआणिसमाज #मराठीकार्टून #हास्यचित्र #व्यंगचित्रलेखन #BheedDiaries #SatireInMarathi #मराठीसंस्कृती #ThoughtfulHumor #SocialSatire #CartoonArt

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी