“विष्ठेचे विज्ञान आणि श्रद्धेचा अंधार”
🕊️ “विष्ठेचे विज्ञान आणि श्रद्धेचा अंधार” 🕊️
कधी काळी अहिंसेचे पुजारी म्हणून गौरवले जाणारे काही “मुनी” आज अशा हास्यास्पद विधानांनी स्वतःच्या बुद्धीला झटके देत आहेत की, ऐकणाऱ्याने हसावं की रडावं हेच कळेनासं होतं. अलीकडेच काही तथाकथित “धर्मगुरूंनी” कबुतरांना श्रद्धांजली देण्यासाठी एक भव्य प्रार्थना सभा घेतली आणि तिथे जे विचार मांडले ते अंधश्रद्धेच्या खाईत आपलं समाजजीवन किती खोल गेलं आहे याचं जिवंत उदाहरण ठरले. पहिला “मुनी” म्हणतो-“कबुतराच्या विष्ठेमुळे लोक मरले तर पर्वा नाही; झाडाचं पान अंगावर पडलं म्हणून पानाला दोष देणार का?” वा रे! काय विचारमंथन...! म्हणजे झाडाचं पान आणि कबुतराची विष्ठा यांच्यातला फरकच संपवला! डॉक्टर मूर्ख, पण हा मुनी ज्ञानी. मग माणसाने विज्ञान शिकायचंच कशाला, विष्ठाचं तत्त्वज्ञान पुरेसं आहे....! दुसरा “मुनी” तर याहून एक पाऊल पुढे. तो सांगतो- “कबुतराची विष्ठा औषधी आहे. तिचा धूर घेतला की मेंदू स्वच्छ होतो, ती पाण्यात भिजवून प्यायली की किडनीचे रोग दूर होतात!” असं काही ‘वैद्यकशास्त्र’ भारतात जन्माला आलं असतं, तर WHO ने औषधनिर्मिती बंद करून विष्ठेचा व्यापार सुरू केला असता.तिसरा “मुनी” तर थेट अध्यात्मात उडी घेतो- “कबुतर भगवतीच्या कथेमुळे अमर झाले; त्याची हत्या म्हणजे भगवान शंकरावर आघात आहे.” अरे बापरे...! मग रस्त्यावरच्या कबुतरांच्या घोळक्याने जेव्हा माणसांच्या डोक्यावर विष्ठा टाकली, तेव्हा काय शंकरभक्ती होत होती का? पण गंमत बघा- या तिन्ही मुनींच्या बोलण्यात एकही शब्द विज्ञानाचा नाही, एकही तर्क नाही; आहे फक्त श्रद्धेचा अंधार आणि अज्ञानाचा गर्व. कबुतरखान्याचा वाद वाढत असताना, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकत्र येऊन म्हणाले- “जर एवढं कबुतरप्रेम आहे, तर तुमच्या स्वतःच्या क्लबमध्ये कबुतरखाना तयार करा.” हा तर्क नेमका आणि अचूक आहे. कारण या तथाकथित “अहिंसेच्या उपदेशकांची” भूतदया फक्त इतरांच्या अंगणातच दिसते; स्वतःच्या मंदिरासमोर मात्र कबुतरं येऊ नयेत म्हणून नेट लावतात. या सर्व प्रकाराकडे पाहताना प्रश्न असा उभा राहतो- धर्म इतका अंध का झाला आहे? माणसाला विचार करण्याची, शंका विचारण्याची, तपासण्याची क्षमता धर्माने हिरावून घेतली आहे का? खरं सांगायचं तर, हा प्रश्न फक्त एका धर्माचा नाही. गाईचं शेण अंगावर थापणारे, मूत्र पिणारे, फादरच्या पवित्र पाण्याने नाचणारे, भोंदू स्वामींच्या, मौलवींच्या अत्याचाराला बळी पडणा-या स्रिया, मौलवींच्या खोट्या चमत्कारांवर विश्वास ठेवणारे-ही मंडळी सर्व धर्मांमध्ये आहेत. आपण सगळेच त्या “अंधश्रद्धेच्या महासागरात” बुडत आहोत. आणि जेव्हा कोणी शंका विचारतो, तेव्हा त्याला धर्मद्रोही ठरवलं जातं. आज प्रश्न कबुतरांचा नाही, प्रश्न आहे “विचारांचा”.
जोपर्यंत आपण विज्ञान, तर्क आणि विवेकाच्या प्रकाशात गोष्टी पाहत नाही, तोपर्यंत आपली बुद्धी कोणत्यातरी ‘विष्ठा तत्त्वज्ञानात’ गुरफटलेली राहणार आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणं हीच खरी पूजा आहे- ती ना कबुतराची, ना गाईची आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात-'धर्म आहे वर्मा अंगी l कळले पाहिजे प्रसंगी ll'
धर्म म्हणजे 'वागण्याची रीत'....! धर्म हा पावला पावलावर बदलतो तो प्रसंगानुसार कळाला पाहिजे. एखादा चोर सोनं घातलेल्या स्त्रीच्या पाठीमागे सोनं चोरण्याच्या उद्देशाने पळत असेल आणि त्याने रस्त्याने जाणाऱ्याला विचारलं स्त्री कोणत्या रस्त्याने केली तर प्रसंग पाहून त्याने 'खोटं बोललं' पाहिजे. हा धर्म आहे. मुळात धर्माचा उद्देश अंधकार घालवणे हा आहे आणि असला पाहिजे.
'धर्माचे पालन l करणे पाखंड खंडन ll'
आज स्वतःला सूर्य समजणारे अंधार पेरण्याचे काम करत आहेत याचं दुःख वाटतं.
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◆मो.9405344642
#अंधश्रद्धा_विरोध #सामाजिकभाष्य #विचारांचीक्रांती #विज्ञानाचीदृष्टी #श्रद्धेचाअंधार #मुंबई_कबुतरखाना #वास्तव_आणि_विघ्न #धर्मआणिविवेक #बुद्धीचीपूजा #मराठीलेखन #सत्याचाबोलबाला #समाजजागृती
Comments
Post a Comment