एक अस्सल शिक्षक आणि संवेदनशील लेखक – प्रभाकरराव महाजन

एक अस्सल शिक्षक आणि संवेदनशील लेखक – प्रभाकरराव महाजन 
            प्रभाकरराव महाजन (माजी मुख्याध्यापक, राजस्थानी विद्यालय, बीड)- हे नाव बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आदराने घेतले जायचे. राजस्थानी विद्यालयाला ओळख निर्माण करून देणारे, अनुशासन, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभाकरराव महाजन सर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेने केवळ निकालांची उंची गाठली नाही, तर संस्कारांचे झाड रुजवले. आज त्यांचा देह निखळला असला, तरी त्यांनी दिलेलं शिक्षण आणि विचारांची बीजं अनेकांच्या मनामध्ये कायम जिवंत राहतील. मी “चंपावती पत्र” या दैनिकामध्ये ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आधारित ‘अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी’ या नावाने लेखमाला लिहीत होतो. त्या मालिकेतील एक लेख - “आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया”- सरांनी वाचला. त्या लेखाखाली मी दिलेली कथा त्यांना एवढी भावली की त्यांनी मला थेट फोन केला. फोनवरील त्यांचा आवाज अजूनही कानात घुमतो-
“अहो, तुमचं नाव श्रीकृष्ण उबाळे का? च-हाटा गावचे का?”
असं विचारून ते मनापासून हसले. मग म्हणाले, “ही कथा आणि अभंगाचं विवेचन वाचून खूप दिवसांनी मी मनापासून हसलो....!”
ते म्हणाले, “कधीतरी भेटा, घरी या.”
मी एक दिवस ठरवून त्यांच्या बामणवाडी येथील घराला गेलो. मंदिराच्या बाजूला त्यांचं साधं पण सुंदर घर. त्यांचे चिरंजीव-चंपावती शाळेत शिक्षक- त्यांनी आणि सरांनी दोघांनीही माझं मनापासून स्वागत केलं.
                सरांना वाटलं होतं की, “हा लेखक म्हणजे कुणीतरी वयस्क, दाढीवाला, चष्मा लावलेला माणूस असेल.” पण प्रत्यक्ष पाहिल्यावर ते हसले आणि म्हणाले, “अरे, तुम्ही एवढे तरुण ?” त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातला आनंद वेगळाच होता. साहित्यगप्पा सुरू झाल्या आणि दोन तास कसे गेले कळलंच नाही. त्यांनी त्यांच्या लिहिलेल्या विविध कथासंग्रह, ललित लेख, समाजभानातून उमटलेली लिखाणं मला दाखवली. त्यांनी सांगितलं, “माझ्या कथा म्हणजे पुस्तकातले अक्षर नव्हे-त्या लोकांच्या वेदना आहेत.” त्यांनी मला वाचायला एक सुंदर ललित पुस्तक दिलं. त्यात बीड आणि परिसरातील गोरगरीब, अंध, अपंग, वंचित लोकांच्या जीवनकथांचा भावविश्व भरलेला होता. त्या पुस्तकाने मला खोलवर स्पर्श केला.
“सशक्त माणसांच्या जमान्यात अशक्त माणसांची किंमतच नसते,” असं त्यांनी त्या संग्रहात दाखवून दिलं होतं. मी माझं ‘अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी’ हे पुस्तक त्यांना भेट दिलं. त्यांनी ते आदराने स्वीकारलं आणि म्हणाले, “तू लिहितो आहेस ते खूप चांगलं आहे. असंच लिहित राहा. भेटायला पुन्हा वेळ ठरवूया.”
              मी नंतर काही वेळा फोन केला. पण भेट घडली नाही. आणि काल... बातमी आली- “प्रभाकरराव महाजन सर आता नाहीत.”
क्षणभर मन सुन्न झालं. एक आदर्श मुख्याध्यापक, गणिताचे गाढे अभ्यासक, प्रशासनप्रिय व्यक्ती आणि संवेदनशील लेखक हरपला. त्यांनी आपल्या आयुष्यात कठोर शिस्तीला मान दिला, पण हृदय मात्र कोमल ठेवले. विद्यार्थ्यांसाठी ते गुरु होते, शिक्षकांसाठी प्रेरणा होते, आणि लेखकांसाठी विचारांचा प्रवाह होते. आज ते नाहीत, पण त्यांच्या शब्दांचा आणि विचारांचा प्रकाश अनेकांच्या मनात कायम राहील. त्यांच्या स्मृतींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. 

◆ श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642

#प्रभाकररावमहाजन 🙏
#आदर्शमुख्याध्यापक
#संवेदनशीललेखक
#राजस्थानीविद्यालयबीड
#गुरूंचीस्मृती
#शिक्षणसेवक
#गणितप्रेमी
#प्रेरणादायीव्यक्तिमत्व
#साहित्यप्रेमी
#भावपूर्णश्रद्धांजली

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'