कमळाकर

                 ◆●कमळाकर●◆
            गाव म्हणलं की त्याच्या अंगणात आपोआप काही वैशिष्ट्यपूर्ण माणसं असतात. काही लोकं गावात जन्मलेली असतात, काही कुठून तरी आलेली असतात. पण त्या सगळ्या गर्दीत आपली छाप उमटवणारा माणूस कधी कधी असा असतो, ज्याला समाज "वेडा" समजतो. आमच्या च-हाटा ता.बीड गावात असाच एक माणूस होता – कमळाकर. तो आमच्या गावचा नव्हता. कुठल्या तरी ब्राह्मण कुटुंबातून आलेला. त्याची पत्नी आणि मुलगा बीडला किंवा कुठेतरी शहरात राहत होते. पण कमळाकर मात्र आमच्या गावात येऊन स्थिरावला. लोकं सांगायची की त्याच्या मनावर परिणाम झाला होता. तो थोडा वेडसरसारखा वागायचा, पण गावात कोणालाही त्रास देत नव्हता. कमळाकर मामांची दुनिया वेगळीच होती. नेहमी फेकून दिलेले, मळकट कपडे अंगावर. ते कपडे तो स्वतःच्या हाताने सुई-दोऱ्यानं शिवून घालायचा. डोक्यावर नेहमी गांधी टोपी. त्याच्या गाठोड्यात त्याचं सगळं आयुष्य भरलेलं असायचं—लोखंडाचा पाण्याचा डबा, जेवणासाठी जर्मनची प्लेट, एक परात आणि दोन-चार कपडे. इतकंच त्याचं घर, इतकंच त्याचं आयुष्य. गावातला कुणीही त्याला घाबरत नसे. लहान मुलं तर त्याच्याशी खेळायची.

"मामा, मी पास होईल का?"
कोणी विचारलं तर तो नक्की म्हणायचा—"हो बाबा, तू पास होणार."
त्याचा चेहरा गंभीर, पण आवाज मायेचा असायचा. मुलांना वाटायचं, कमळाकर मामा जणू एखादा जादूगार आहे. त्याच्या आशीर्वादाने नक्की पास होतो आपण!

           कमळाकर कधीच गावकऱ्यांकडून फुकटची भाकर मागत नसे. तो ओढ्यावर, नदीकाठी जाऊन सरपण गोळा करायचा. मग गावातल्या कुठल्या तरी घरात नेऊन द्यायचा. बदल्यात एखादी भाकर, कांदा, चटणी मिळाली की त्याचं पोट भरायचं. ही त्याची रोजची रीत. तो भुकेला असेल पण काम न करता कुणाकडून काही घेणार नाही. गावकऱ्यांना एके काळी समजलं की तो प्रत्यक्षात ब्राह्मण आहे, त्याला कुटुंब आहे. म्हणून अनेकदा त्याला धरून त्याच्या घरी सोडलं. पण काही दिवसांनी तो पुन्हा गावात परतायचा. जणू गावातच त्याला समाधान मिळालं होतं. तो रात्री जिल्हा परिषद शाळेच्या वरांड्यामध्ये मुक्काम करायचा आणि सकाळ होताच तो निघून जायचा. तो कधी कुणाला त्रास देत नसे. तसेच गावातील कोणीही कधीच त्याला त्रास देत नसे. त्याच्या नातेवाईकांनी त्याला ठेवायचा जास्त प्रयत्न केला नाही. आणि तो स्वतः गावकऱ्यांच्या आपुलकीत रुळून गेला. कमळाकर मामांची बोलणं मजेशीर असायचं. तो स्वतःशीच बडबड करायचा. पण कुणी सरळ काही विचारलं तर व्यवस्थित उत्तर द्यायचा.

"मामा, काय करता?"
"बसलोय बाबू."
"जेवलात का?"
"हो बाबू, तू जेवलास का?"
त्याच्या अशा प्रश्नातही एक निरागसपणा दडलेला असायचा.

              गावातलं प्रत्येक मूल, तरुण, म्हातारा त्याला "कमळाकर मामा" म्हणायचं. तो खऱ्या अर्थानं गावाचा एक सदस्य झाला होता. हळूहळू वर्षं सरली. ज्याच्या हातात कधी सरपणाच्या जुड्या दिसायच्या, तोच कमळाकर आता थकला. वय वाढलं. शरीराची ताकद संपली. तो आजारी पडू लागला. आता ना तो सरपण गोळा करू शकत होता, ना कोणत्या कामाच्या बदल्यात भाकर मिळवू शकत होता. गावातल्या लक्ष्मी आईच्या मंदिरात त्याने आसरा घेतला. मंदिरातल्या एका कोपऱ्यात तो बसायचा. गावकरी त्याला ओळखीच्या नजरेनं बघायचे. कुणी भाकर द्यायचं, कुणी भाजी. कुणी पाणी. तो फार मागणं नसायचा. मिळालं तेवढ्यानं समाधान मानायचा. पण शेवटी, प्रत्येक माणसाला एक दिवस जावंच लागतं. कमळाकर मामाही एक दिवस शांतपणे त्या मंदिरातच वारले. गावात हळहळ व्यक्त झाली.

"कमळाकर वारला....!"
गावकऱ्यांना एकदम दुःख झालं. तो आपला गावचा नव्हता, तरीही त्याचं जाणं प्रत्येकाला जवळच्या माणसासारखं जाणवलं. गावकऱ्यांनी ठरवलं की त्याच्या कुटुंबाला कळवलं पाहिजे. नातेवाईकांना बातमी दिली. त्याचा मुलगा आला. पण त्यानं हात झटकले.

"माझ्या परिस्थितीत मी अंत्यविधी करू शकत नाही. तुम्हीच काय करायचं ते करा."

            गावकऱ्यांना ते बघून वाईट वाटलं. पण त्यांनी हार मानली नाही. महादेव दादा पुढं आले. गावभरून वर्गणी जमवली. सगळ्यांनी मिळून पैसे गोळा केले. कमळाकर मामाचे अंत्यविधी गावकऱ्यांनीच केले. लक्ष्मी आईच्या मंदिरासमोरच त्याला दफन केलं. नातेवाईकांपैकी एक श्रीमंत होता. तो बोटं दाखवत म्हणाला, "असं करायला नको होतं, तसं करायला हवं होतं." पण गावकऱ्यांनी मनात ठरवलं होतं—कमळाकर हा आमचा माणूस होता, आणि त्याला शेवटपर्यंत गावानेच सांभाळलं. कमळाकर मामाचं आयुष्य वेगळं होतं.  तो कुठल्याही नात्यात अडकला नाही. कुठल्याही अपेक्षेनं जगला नाही. तो कुणाकडं फुकट खायला गेला नाही, कुणाला त्रास दिला नाही. त्याचा चेहरा नेहमी हसरा. हातात नेहमी सरपणाची जुडी किंवा स्वतः शिवलेले कपडे. आजही गावात एखादा वेडसर दिसला की लोकांना कमळाकर मामा आठवतो. त्याची गांधी टोपी, त्याचे ढगळ कपडे, आणि त्याचं निरागस हास्य... आमच्या बालपणीच्या आठवणींमध्ये तो कायमचा जिवंत राहिला आहे. कमळाकर मामा – हा फक्त एक "वेडा माणूस" नव्हता. तो माणुसकीचा एक धडा होता. स्वाभिमानानं जगण्याचा एक आदर्श होता. आणि गावानं त्याला दिलेलं स्थान हेच दाखवतं की, रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त मोठं नातं असतं—ते म्हणजे माणूसकीचं.

◆श्रीकृष्ण उबाळे, च-हाटा
◆मो.9405344642

#कमळाकर #गावकथा #ग्रामीणजीवन #लोकआठवणी #गावोगावच्या_गोष्टी #MarathwadiKatha #गावचीओळख #मराठीकथा #आठवणी #गावगप्पा

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'