ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील- राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या राज्यप्रमुखपदी निवड

ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील- राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या राज्यप्रमुखपदी निवड

अध्यात्म, संस्कार आणि परिवर्तनाचा प्रवास

             अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे आणि वारकरी संप्रदायातील नवे विचार रुजवणारे ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या महाराष्ट्र राज्यप्रमुखपदी निवड झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे वारकरी परंपरेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मुळशी तालुक्यातील मोसे खोरे या अतिदुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. कोणताही वारसा, पाठबळ किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःच्या कष्टावर आणि श्रद्धेवर आपले व्यक्तिमत्त्व उभे केले. लहानपणापासूनच संसाराची जबाबदारी अंगावर घेत त्यांनी पाणीपुरीच्या गाडीवर काम, पेपर वाटप, इस्त्री काम, ऑफिस बॉय अशी विविध छोटीमोठी कामे केली. या कष्टांमध्येही त्यांच्या अंतःकरणात भक्ती, भजन आणि कीर्तनाची गोड झुळूक वाहत राहिली. बालवयापासूनच कीर्तन आणि गायनाची आवड असल्याने त्यांनी २०१६ पासून कीर्तन सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर अल्पावधीतच त्यांच्या भाषणशैलीने, गायकीने आणि विचारांनी हजारो श्रोत्यांची मने जिंकली. त्यांनी केवळ स्वतःच कीर्तनकार म्हणून नाव कमावले नाही, तर अनेक सहकाऱ्यांना मार्गदर्शन करून वारकरी बनवले. वारकरी विचारांची पेरणी केली.

         वारकरी विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी “जगद्गुरु तुकोबाराय विचार प्रबोधिनी ट्रस्ट” या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी ग्रामीण तसेच शहरी समाजात संतविचार रुजवण्याचे कार्य सुरू केले. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी श्री क्षेत्र देहूवारी आयोजित उपक्रम हा या कार्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या वारीत आयटी इंजिनियर्स, डॉक्टर, शिक्षक, तरुण वर्ग आणि शहरी मंडळींना वारकरी परंपरेची ओळख करून देऊन त्यांनी अध्यात्माकडे आकर्षित करण्याचे मोठे काम केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि मूल्याधिष्ठित विचार रुजावेत म्हणून त्यांनी “वारकरी संत विचार संस्कार शिबिर” ही संकल्पना राबवली. तसेच वसंत पंचमीला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करून वारकरी परंपरेचे जतन केले. दत्ता महाराजांनी केवळ विचार आणि उपदेशानेच नाही, तर स्वतःच्या जीवनातूनही परिवर्तनाचे उदाहरण घालून दिले. स्वतःच्या विवाह सोहळ्यात त्यांनी विधवा भगिनींच्या हस्ते हळद लावून समाजातील अंधश्रद्धा व भेदभावाला छेद दिला. “परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून” हे त्यांचे तत्त्व आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
          त्यांनी “गाथा नित्य उपासना” या ग्रंथाचे संपादन व प्रकाशन करून संतसाहित्य आणि वारकरी परंपरेचा शास्त्रीय अभ्यास सुलभ केला आहे. तसेच पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर शेकडो कीर्तने, प्रवचने, व्याख्याने आणि गायनाच्या माध्यमातून त्यांनी संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रसार केला आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, देशाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांना “अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या महाराष्ट्र राज्यप्रमुखपदी” नियुक्तीपत्र देण्यात आले. ही निवड केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाची नाही, तर वारकरी परंपरेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहून समाजसेवा, अध्यात्म आणि संस्कार या तिन्ही क्षेत्रांचा संगम घडविणाऱ्या ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांच्या कार्यातून आजचा तरुण प्रेरणा घेईल यात शंका नाही.“भक्ती ही कर्मात, संस्कार ही व्यवहारात आणि अध्यात्म हे परिवर्तनात!” — या सूत्राला मूर्त रूप देणारे ह.भ.प.दत्ता महाराज आजच्या पिढीतील खरे वारकरी विचारवंत ठरले आहेत.

◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'