संत तुकाराम महाराजांचे दोहे-१


      दोहा क्रमांक- १ 

"तुका बस्तर बिचारा काय करे रे । अंतर भगवा न होय।
भीतर मैला कब मिटो रे । मरे उपर धोय ॥"


           जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी या दोह्यामध्ये केवळ वस्त्राचे भगवेपण न धरता, मनाचे भगवेपण, अंतःकरणातील वैराग्य आणि त्यागाचे महत्व अधोरेखित केले आहे. त्यांनी यामधून असा संदेश दिला आहे की, वरवर भगवे कपडे परिधान करून कोणी साधू, संन्यासी, त्यागी बनत नाही. खरी साधना आणि वैराग्य हे अंतःकरणातून उत्पन्न व्हावे लागते. "तुका बस्तर बिचारा काय करे रे" या ओळीतून त्यांनी ‘बस्तर’ म्हणजे वस्त्र – कपडे – याबद्दल बोलताना एक करुण भाव व्यक्त केला आहे. जर एखाद्या व्यक्तीने फक्त वरून भगवे वस्त्र घातले आणि त्याच्या अंतरात्म्यात वैराग्य नाही, त्यागाची भावना नाही, तर त्याच्यावर परिधान केलेले वस्त्र काही उपयोगाचे नाही. म्हणूनच ते भगवे वस्त्र ‘बिचारे’ ठरते, कारण ते फक्त एक ढोंग झाकून ठेवते. "अंतर भगवा न होय" – जर अंतःकरणात भगव्या रंगाचा अर्थ, म्हणजे त्याग, साधुता, आत्मशुद्धी, निर्लोभी वृत्ती, हे नसेल तर भगवे वस्त्र परिधान करून काही उपयोग नाही. कारण भगवा रंग हा त्याग, संयम, वैराग्य, आणि आत्मशुद्धीचे प्रतीक आहे. तो रंग फक्त अंगावर नसून, मनावर आणि वृत्तींवर असायला हवा. "भीतर मैला कब मिटो रे" – संत तुकाराम विचारतात की, जर आपल्या अंतरात्म्यात, मनात वाईट विचारांचे, विकारांचे, अहंकाराचे, लोभाचे, स्वार्थाचे मळ आहे, तर फक्त वरून स्वच्छ राहून काय उपयोग ? या मळाला, या दुर्गुणांना, केवळ बाह्य शुचिर्भूतपणाने दूर करता येत नाही. "मरे उपर धोय" – काही लोक शरीर धुवून पवित्र करण्याच्या परंपरा पाळतात. परंतु संत तुकाराम महाराज विचारतात की, जर मनातला मळ आधी निघाला नाही, तर वरून मरेपर्यंत रोज कोणत्याही तिर्थाच्या पाण्याने, साबण लावून कितीही अंघोळ केली, किती मंत्र म्हणून स्नान केले, तरी त्या व्यक्तीचे आत्मशुद्धीकरण होणार का ?  या दोह्यामध्ये संत तुकाराम महाराजांनी ढोंग, दिखावा आणि केवळ बाह्य प्रदर्शनावर आधारित अध्यात्माला फाटा दिला आहे. ते म्हणतात की, अध्यात्म म्हणजे आतून निर्माण होणारी निर्मळता.  मनातील विकार घालवणारी प्रक्रिया. भक्ती, वैराग्य, करुणा, दया खरं वैराग्य हे फक्त अंगावर भगवा कपडा घालून मिळत नाही, तर अंतर्मनात निस्वार्थी भावनांची जोपासना करून, वाईट विचारांचा त्याग करूनच मिळते. त्यांच्या एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे –

"भगवे तरी श्वान सहज वेष त्याचा l
  तेथे अनुभवाचा काय पंथ ll"

यातून त्यांनी दाखवून दिलं आहे की, एखादा कुत्राही निसर्गतः, जन्मतः भगवा असतो. त्याला भगवा रंग सहज निसर्गाकडून मिळतो तर मग तो फक्त रंगाने भगवा आहे म्हणून आपण त्याला साधू म्हणणार आहोत का ? त्या वेषाला अर्थ तेव्हाच असतो, जेव्हा त्यामागे अनुभूती, त्याग, वैराग्य असतं. त्याचप्रमाणे, ते दुसऱ्या ठिकाणी म्हणतात –

"तीर्था जाऊनिया काय त्वा केले l
  चर्म प्राक्षाळीले वरीवरी ll"

यातून ते स्पष्ट सांगतात की, फक्त तीर्थक्षेत्रात जाऊन किंवा स्नान करून वरचं कातडं निर्मळ होईल पण मन शुद्ध होत नसतं. अंतःकरणात दोष, विकार, ईर्ष्या, अहंकार राहिलेच, तर पवित्र जलाचा उपयोग नाही. वरवरच्या दिखाऊ परिवर्तनाला काही अर्थ नसतो खरं परिवर्तन आतून असतं. संत तुकाराम महाराजांचा हा दोहा आपल्याला अंतर्मुख करतो. अध्यात्म आणि वैराग्य ही फक्त वेशभूषेची गोष्ट नसून, ती अंतःकरणातली शुद्धता आहे. आपल्या विचारांमध्ये, कृतींमध्ये आणि आचरणात भगवा म्हणजे त्याग असला पाहिजे. ढोंगी साधुपणाला त्यांनी ठाम विरोध केला आणि खऱ्या साधनेचा मार्ग हा अनुभव, त्याग, नम्रता, आणि सत्यशीलतेत आहे, हे ठामपणे सांगितलं.
         रामायणातील कथा सर्वांना ज्ञात आहे. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात होते. त्या वेळी रावणाने सीतेला पळवून न्यायची योजना आखली. रावण हा लंकेचा राजा, अत्यंत बलाढ्य, विद्वान असला तरी अहंकारी, क्रूर आणि वासनेने भरलेला होता. त्याला सीतेचे सौंदर्य पाहून वासनेचा मोह झाला. पण त्याला थेट तिच्याजवळ जाता येत नव्हतं, कारण श्रीराम आणि लक्ष्मण तिच्या रक्षणासाठी होते. त्यामुळे त्याने एक कपटयुक्त योजना आखली. रावणाने आपल्या मामा मारिचाला सोनेरी हरणाचं रूप घ्यायला सांगितलं. सीतेने ते सोन्याचं हरण पाहिलं आणि ते रामाने पकडावं अशी इच्छा व्यक्त केली. राम हरणाचा पाठलाग करत दूर गेले. सीतेला एकटी पाहून रावणाला संधी मिळाली. रावणाने साधूचा वेश धारण केला – भगवे कपडे, हातात कमंडलू, चेहऱ्यावर दाट दाढी, भस्माचे टिळक, शांततेचा आव आणलेला. सीतेजवळ येऊन त्याने भीक मागण्याच्या बहाण्याने संवाद सुरू केला. सीतेला वाटलं – एखादा साधू आलेला आहे, म्हणून तिनं त्याला अन्न-पाणी द्यावं असा विचार केला. सीता एकटी होती, आणि लक्ष्मणरेषा ओलांडली गेली. त्याच क्षणी रावणाने आपलं खरं रूप उघड केलं. तो म्हणाला –

"मी रावण आहे! लंकेचा राजा.... तुला घेऊन जातो माझी राणी म्हणून.....!"

सीता घाबरली, रडली, विनवणी केली – पण उपयोग झाला नाही. रावणाने तिला जबरदस्तीने आपल्या सोबत लंकेला नेले. रावणाने बाहेरून साधूचा वेश घेतला, पण त्याचं मन विकारी, वासनेनं भरलेलं होतं. म्हणूनच तो संत तुकाराम महाराजांच्या या दोह्यात बसतो:

"तुका बस्तर बिचारा काय करे रे । अंतर भगवा न होय।"

🔹 शिकवण :

ढोंगी वेश धारण करून चांगलेपणाचं दिखावं करता येईल, पण आतला स्वभाव कधीच लपवताच येत नाही. मन शुद्ध असेल, तर वेश काय साधा असो वा भगवा, व्यक्ती पवित्र ठरते. फक्त वेष भगवा आहे म्हणून कोणी साधू, संत होऊ शकत नाही त्याचं अंतःकरण त्यागपूर्ण म्हणजेच भगवं हवं. अशा केवळ वेषधारी लोकांच्या नादी लागल्यावर आपलं वाटोळं ठरलेलं असतं.

जय जगद्गुरू....!!

◆ ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◆मो. 9405344642

#संततुकाराममहाराज #तुकोबांचेअभंग
#ज्ञानवाणीतुकोबांची #विठ्ठलतुकोबा #तुकारामगाथा #तुकोबांचिपाऊले
#अभंगगाथा #भावअभंग
#तुकोबांचीनामस्मरण #तुकाराममहाराजकीजय
#दोहे #कबीर #जगद्गुरू

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'