तोफा आणा... रणगाडे आणा..मला मारून टाका...!!
"तोफा आणा... रणगाडे आणा..मला मारून टाका...!!"
(होळ, ता. केज जि. बीड येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या धैर्याची कथा)
१९६७ च्या वर्षात, भारतात निवडणुकींचे वारे वाहू लागले होते. लोकशाहीच्या रुजवतीचा काळ होता तो. क्रांतिसिंह नाना पाटील, इंग्रजांना हादरवणारा, 'प्रतिसरकार' स्थापणारा, सत्यशोधक विचारांचा पुरस्कर्ता, आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारीवर मैदानात उतरला होता. बीड जिल्हा, विशेषतः होळ गाव ता.केज हे काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जायचे. तिथे कम्युनिस्टांचा प्रवेश म्हणजे जणू खोलवर गेलेल्या मुळांमध्ये नवा विचार रोवण्याचा प्रयत्न. निवडणूक प्रचारासाठी नाना पाटील होळ येथे पोहोचले. गावाच्या वेशीवर काही लोक आधीच जमलेले. त्यांच्या हातात दगड, अंडी आणि राग होता.
“हे काय? नानांवर दगडफेक? अंडीफेक?”
कोणी म्हणाले, “कम्युनिस्टांचं काय काम आमच्या गावात?”
कोणी ओरडले, “हे काँग्रेसचं गाव आहे...!”
हल्ला झाला. गर्दीतून दगड हवेत उडाले, काही अंडी नानांच्या अंगावर येऊन फुटली. पण नाना पाटील एक इंचही मागे हटले नाहीत. नानांनी हात वर करून सगळ्यांना थांबवलं. आवाजात भय नव्हतं... राग नव्हता... पण त्यात एक धग होती – अनुभवांची, लढ्याची आणि माणुसकीची.
"लोकहो... मी नाना पाटील हाय....! इंग्रज बंदुका घेऊन, लाखाचे बक्षीस जाहीर करून मला पकडायला निघाले होते. मी त्यांच्या गोळ्यांनी मेलो नाही...मला मारायचं असेल तर तोफा आणा...रणगाडे आणा रे....कारण ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नव्हता, त्यांनाही मी झुकलो नाही. आणि आज, स्वतंत्र भारतात, दगडं आणि अंडी मारून मला घाबरवणार? मर्दपण असं नसतं....! मी निःशस्त्र आलोय... मारा मला....!
पण लक्षात ठेवा- आता निजामशाही नाही, इंग्रजशाही नाही...ही तुमची लोकशाही आहे.
तुम्ही मत टाकू नका... पण असले पोरचाळे करू नका...!"
गावकऱ्यांना नानांच्या शब्दांनी भेदलं. राग शांत झाला. गर्व आणि अहंकार गळून पडला. एका म्हाताऱ्या शेतकऱ्याने पुढे येत वाकून नानांच्या पायांवर डोकं टेकवलं.
“माफ करा नाना... आम्ही अंधारात होतो. तुमचं खरं रूप आज पाहिलं.”
त्या दिवशी दगड मारणारे हात, दुसऱ्या दिवशी नानांच्या प्रचारासाठी फड उभारू लागले.
अंडी फेकणारे तेच तरुण, नानांची भाषणं गावागावात ऐकवू लागले. नाना पाटील यांनी त्या प्रसंगातून एक मोठा धडा दिला -लोकशाही म्हणजे मतभेद स्वीकारणं, हिंसा नव्हे. विरोध मतांमध्ये असावा, माणुसकीत नव्हे. त्यांचं एक वाक्य त्या दिवशी गावाच्या भिंतीवर जसं कोरलं गेलं-
"मी दगडांनी मरणार नाही... मी सत्यासाठी जन्मलोय..!"
आजही होळ गावात नानांची आठवण आली की लोक सांगतात-
“त्या दिवशी नाना आमच्यावर नव्हे, आमच्या अज्ञानावर जिंकले...!”
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे,बीड
◆मो.9405344642
#क्रांतिसिंह_नाना_पाटील #होळची_घटना
#धैर्याची_शिक्षा #लोकशाहीचा_सन्मान
#मतभेद_नाही_मनभेद_नाही
Comments
Post a Comment