गोकुळ अष्टमी
गोकुळ अष्टमी
सन १९८५ किंवा १९८६ चा काळ. दोन्हीपैकी एक नक्की आहे. गोकुळ अष्टमीचा शुभमुहूर्त. गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण. अंगणात दहीहंडी फुटतेय, गावभर गोकुळाष्टमीचा उत्साह. आणि त्याच मंगलक्षणी एका मुलाचा जन्म झाला. दिसायला थोडा सावळा, पण अंगावरचे तेज मात्र लहानपणापासूनच वेगळे. गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्म झाला म्हणून त्याचं नाव “गोकुळ” ठेवावं, असं ठरलं. घरात पणजी ‘ताई’ आणि आजी ‘बाई’ यांनीच हे नाव सुचवलं. नामकरण विधी पार पडला. गावात गाजावाजा झाला. मात्र भावकीतल्या “दादा” नावाच्या माणसाला हे नाव रुचलं नाही. कारण त्याच्या स्वतःच्या मुलाचं नाव आधीच “गोकुळ” होतं. दादाला वाटलं, “आपल्या मुलाचं नाव दुसऱ्याने कसं काय ठेवलं?” तो संतापला. रागाच्या भरात घरी आला आणि संतापून बोलू लागला-
“आरे, मुलाचं नाव दगड ठेवा, धोंडा ठेवा, कचरा ठेवा, चाबूक, बंदूक, पिस्तूल काय ठेवायचं ते ठेवा; पण माझ्या मुलाचं नाव तुमच्या मुलाला ठेवायचं नाही..!”
घरात क्षणभर शांतता पसरली. आजी, आई सगळ्या बुचकळ्यात पडल्या. आता काय करायचं? कोणतं नाव ठेवायचं? तेवढ्यात पणजी ताई पुढे आली. तिचं शहाणपण, अनुभव आणि स्थिर मन गावात प्रसिद्धच होतं. ती हसून म्हणाली –
“जाऊ द्या, दादाशी वाद नको. आपला मुलगा गोकुळाष्टमीला जन्मला, पण आपण त्याचं नाव आणखी थोर ठेऊ. गोकुळाचा आधारच कृष्ण आहे. मग नाव ठेऊ ‘श्रीकृष्ण.....!” सगळ्यांनी मान डोलावली. आता त्या लेकराचं नाव “श्रीकृष्ण” झालं. असं करून माझं खरं नाव “श्रीकृष्ण” ठरलं. काळ सरकत गेला. शाळेत प्रवेश घेण्याची वेळ आली. आई-वडील दोघेही अशिक्षित असल्याने शाळेची कागदपत्रं, जन्मतारीख वगैरे त्यांना माहीत नव्हतं. मुख्याध्यापकांनी विचारलं –
“मुलाचं नाव काय?”
सोबत गेलेल्या आजीने सांगितलं – “श्रीकृष्ण.”
मग पुढचा प्रश्न आला – “जन्मतारीख काय लिहायची?”
आजीला गोकुळाष्टमी आठवली, पण नेमकी तारीख, महिना, वर्ष कुणाला ठाऊक नव्हतं. मग शाळेतली पद्धत म्हणून सोपं उत्तर मिळालं –
“चला, एक एप्रिल लिहून टाका.”
अशी माझी जन्मतारीख रेकॉर्डवर एक एप्रिल नोंदवली गेली. प्रत्यक्षात माझा जन्म ऑगस्ट महिन्यात, गोकुळाष्टमीला झाला होता, पण कागदोपत्री मात्र मी एप्रिलचा झालो. आज मागे वळून पाहिलं की ही गोष्ट एखाद्या कथेप्रमाणेच वाटते. नावाच्या वादामुळे झालेला गोंधळ, पणजी ताईची हुशारी, दादाचा राग, आणि शाळेतली नोंद – सगळं मिळून एक वेगळीच जन्मकथा घडली.
या जन्मकथेत मला जाणवतं की, नावापेक्षा त्यामागचं संस्काराचं मूल्य मोठं असतं. गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्म झाल्यामुळे माझ्या नावातच ‘कृष्ण’ आहे. जणू माझ्या जीवनाला ते नाव दिशा देणारं ठरलं. आई-वडिलांचे अशिक्षितपण, साधेपण, आणि तरीही माझ्यासाठी त्यांनी केलेली धडपड, ही माझी खरी शिदोरी ठरली. आज मी जे काही लिहितो, बोलतो, समाजात फिरतो, ते सगळं या बालपणीच्या साध्या पण विलक्षण आठवणींवर उभं आहे. असं माझं जन्मकथन, मीच तो मुलगा- श्रीकृष्ण उबाळे.
◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642
#श्रीकृष्णउबाळे #जन्मकथा #गोकुळाष्टमी #नामकरणसोहळा #ग्रामीणआठवणी #ललितकथा #माझीकहाणी #गावकुसुम #आजीपणजीशहाणपण #बालपणीच्या_आठवणी #MarathiStory #मराठीलेखन #गावकथा #आठवणी #MarathiCartoon
Comments
Post a Comment