संत तुकाराम महाराजांचे दोहे दोहा क्रमांक-२
●◆तुकोबांचे शब्दधन◆●
संत तुकाराम महाराजांचे दोहे
क्रमांक-२
"रामराम कहे रे मन। औरसुं नहीं काज ।
बहुत उतारे पार। आघे राख तुकाकी लाज ॥"
या दोह्यात संत तुकाराम महाराज आपल्याच मनाला एक प्रेमळ पण ठाम सल्ला देतायत. ते म्हणतात, "हे मना, तू फक्त रामाचं नामस्मरण करत जा, इतर गोष्टीत तुला काही घेणंदेणं नाही." म्हणजे काय, तर या जगात अनेक गोष्टी आकर्षक वाटतात – पैसा, माया, मान-सन्मान, हौस, नवलाई, परंतु या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर आहेत. या गोष्टी काही केल्या आपल्याला परमेश्वराच्या वाटेवर नेणार नाहीत. त्या फक्त मनाला गुंतवतात, आणि गोंधळ घालतात. तसेच अध्यात्मिक क्षेत्रात अनेक मार्ग आहेत. यामध्ये योग, यज्ञ, कर्मकांड, तंत्रमंत्र, बळी नवस तसेच इतर अनेक कठीण मार्ग आहेत. संत तुकाराम महाराज सांगतात की, "हे मना, तू इतर साधनांमध्ये, दांभिकपणात, आडमुठेपणात, आंगठीधारी बाबांच्या भूलथापांमध्ये नको गुंतूस. फक्त ‘रामराम’ म्हणायचं, तोच खरा साधनाचा रस्ता आहे. आणि तो सगळ्यात सोपा आहे." या दोह्यामध्ये ‘रामराम’ हा शब्द केवळ देवाचं नाव म्हणून नव्हे, तर एक जीवनमार्ग, भक्तीचा मंत्र, आणि अंतःकरणाच्या शुद्धतेचं साधन म्हणून घेतलेलं आहे. तुकाराम महाराजांचा विश्वास होता की, नामस्मरण केलं की माणसाचं मन निर्मळ होतं, अहंकार गळून पडतो, आणि दैवाच्या ओंजळीत माणूस आपोआप जातो. 'राम म्हणता रामची होईजे' ही अवस्था प्राप्त होते. त्यांनी अनुभवातून जाणलेलं हे सत्य आहे – "रामाचं नाव हेच सगळ्यात मोठं साधन आहे." तुकाराम महाराज इथे सांगतात की, "असं रामनाम घेत घेत, खूप लोकांनी ह्या संसारसागर पार केलाय." म्हणजे हा ‘भवसागर’ – आपल्याला रोज भेडसावणारा दुःखांचा महासागर – यातून बाहेर पडायचं असेल, खरी मुक्ती मिळवायची असेल तर नामस्मरणच एकमेव साधन आहे.
कितीही मोठा पंडित असो, कीर्तनकार, धनिक असो, राजकारणी असो – कोणालाही फुकटात मुक्ती मिळत नाही. जे ‘राम’ म्हणतात, जे परमार्थाच्या वाटेवर चालतात, त्यांनाच मुक्ती मिळते. आपण रोजच्या जगण्यात एवढे गुंततो की, रामनाम हे आपण फक्त संकटातच आठवतो. पण तुकाराम महाराज सांगतात, "हे मना, संकटातच नव्हे तर नेहमीच, श्वासोश्वासात ‘रामराम.' तुकाराम महाराज म्हणतात, "मी रोज लोकांना सांगतोय की रामनाम घ्या, रामाला शरण जा. आता हेच मी देवापुढे सांगतो की – देवा, मी लोकांना सांगतोय, आता माझी लाज तू राख." या वाक्याच्या पाठीमागे एक निर्मळ श्रद्धा आणि निरागसता आहे. त्यांनी कोणताही स्वार्थ ठेवलेला नाही. केवळ भक्तीच्या आधारे ते सर्वांना जागं करतायत. त्यांना आपली स्वतःची चिंता नाही – पण जो विश्वास इतरांमध्ये निर्माण करतोय, त्याची जबाबदारी घेता. आजचं जग झपाट्यानं बदलतंय. मोबाईल, टीव्ही, पैशाचा हव्यास, स्पर्धा, मान-अपमान या सगळ्यांमध्ये माणूस हरवतोय. एवढ्या गोंधळात शांत बसून रामाचं नाव घेणं म्हणजे एक प्रकारची मनाची तपश्चर्या आहे. रामनाम हे कोणत्याही वयाच्या, जातीच्या, लिंगाच्या, आर्थिक स्थितीच्या माणसाला उपयोगी आहे. नाम हे साधण फुकट आहे, सोपे आहे पण अमूल्य आहे. जे आत्मा समजून सांगतात, ते संत असतात. तुकाराम महाराजांचा हा दोहा म्हणजे त्यांच्या अंतःकरणातला परमेश्वराशी होणारा संवाद आहे. आपणही हे ऐकून, वाचून फक्त "वा" म्हणण्यात थांबू नये – मनात, हळूहळू, रोज ‘रामनाम’ सुरू केलं पाहिजे.
वाल्या हा जंगलात राहणारा एक रानटी दरोडेखोर होता. तो जंगलात येणाऱ्या यात्रेकरूंना लुटायचा, त्यांचा खून करायचा. एके दिवशी महर्षी नारद त्याच्या वाटेला लागले. वाल्याने नारदमुनींना अडवून विचारलं, “तुमच्याकडं काय आहे?" नारदमुनी म्हणाले, “माझ्याजवळ देवाचं नाव आहे.” तेव्हा नारदांनी त्याला विचारलं, “तू जे पाप करतोस, ते तुझ्यासोबत तुझं कुटुंब वाटून घेईल का?” वाल्या घरी गेला आणि कुटुंबाला विचारलं. पण सर्वांनी सांगितलं – “तुझा पापाशी आमचा काही संबंध नाही.”तेव्हा त्याला समजलं की, पाप आपलं स्वतःचं असतं. नारदमुनींनी त्याला ‘राम राम’ मंत्र दिला. पण तो म्हणू शकत नव्हता. मग नारद म्हणाले, “तू ‘मरा मरा’ म्हणायला सुरुवात कर.” तो 'मरा मरा' म्हणता म्हणता 'राम राम' म्हणू लागला. तो खूप वर्षे ध्यानात मग्न राहिला. वाळून गेला, त्याच्या शरीराभोवती मुंग्यांनी वाळूचा घर बांधला. म्हणून त्याला ‘वाल्मिकी’ हे नाव मिळालं. नंतर तोच वाल्मिकी पुढे 'रामायण' सारखा ग्रंथ लिहिणारा महर्षी वाल्मिकी बनला.
"नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरीची ॥"
याची अनुभूती इथे येते. कलयुगात नाममार्ग हा पवित्र होण्याचा, सिद्ध होण्याचा सोपा मार्ग आहे. त्याचा सर्वांनी अनुभव घ्यावा असे तुकोबा सुचवतात.
◆ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◆मो. 9405344642
(कीर्तनकार, कवी, लेखक)
तुकाराम गाथ्यावर आधारित लिखित पुस्तके:
१.अभ्यासासी सांग कार्यसिद्धी (१०१८)
२. संत तुकारामांचे दोहे (२०२०)
३.मायबापे केवळ काशी (२०२३)
४.जगद्गुरूंचा हरिपाठ (अप्रकाशित)
#संततुकाराम #तुकाराममहाराज #तुकोबांचेदोहे #तुकारामअभंग #तुकारामगाथा #तुकोबांचीवाणी #भक्तिरस #मराठीसंत #संतचरित्र #आधात्मिकविचार #तुकोबाचेराम #विठूमाउली #विठ्ठलनाम #तुकोबांचीशब्दसत्ता
#गाथासागर #नामस्मरण #शब्दगंगेतीलमोत्या #तुकारामवाणी #SantTukaram #TukaramMaharaj #AbhangaVani #MarathiSpiritualQuotes #BhaktiMovement #WarkariSampraday #TukaramDoha #WarkariTradition
Comments
Post a Comment