बेलपान
बेलपान
मी पाचवी-सहावीत शिकत होतो. घरची परिस्थिती साधीच. आमचं घर श्रीमंत नव्हतं, पण मेहनतीचं होतं. आई-वडील दिवसभर कष्ट करत, आणि त्यांना हातभार लावणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. मी आणि माझ्या दोन बहिणी, आम्ही सगळ्या घरकामात, शेतकामात आणि जनावरांच्या देखभालीत मदत करायचो. सुट्टीचे दिवस असले की गाई-म्हशी, शेळ्या, कोंबड्या सांभाळणं, शेतात पाणी घालणं, तण काढणं… आणि दिवाळीनंतर कापसाचं हंगाम सुरू झाला की, गावात दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात किलोने कापूस येचायला जायचो. त्या कामातून मिळालेले पैसे मी हाक आई-वडिलांच्या हातावर ठेवायचो. त्यावेळी वाटायचं - "आपण लहान असलो तरी घराला थोडा आधार देऊ शकतो."
दरवर्षी श्रावण महिना आला की, माझ्यासाठी एक वेगळाच आनंद यायचा. श्रावणातील प्रत्येक सोमवारी लोक महादेवाच्या दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात जायचे. आमच्या गावात काही मोठी बेलाची झाडं होती. मी सकाळी लवकर उठून ती बेलपानं तोडायचो. ती पानं अगदी टवटवीत, ताजी, हिरवीगार असायची. मग ती एका मोठ्या गोणीत भरून मी शेजारच्या गावातील तिप्पटवाडीच्या महादेवाच्या मंदिराकडे निघायचो. तिप्पटवाडी त्या काळी फार प्रसिद्ध तीर्थ झालं होतं. आमच्या च-हाटा गावाबरोबरच पंचक्रोशीतील लोक पायी, बैलगाडीत किंवा पाठीवर ओझं घेऊन, कोणी सायकलीं घेऊन दर्शनाला यायचे. लहान मुलं, बायका, मोठे माणसं असे सर्वजण तिप्पटवाडीला जायचे. तिप्पटवाडीला जाण्यासाठी गावातून कच्चा रस्ता होता व दुसरा डोंगरावरून एक रस्ता होता. मीसुद्धा पायी डोंगराच्या रस्त्याने जायचो. वाटेमध्ये एक डोंगर लागायचा. डोंगर चढताना अंगावर येणारा गार वारा आणि डोंगर उतरताच कडेला असलेली जुनी विहीर-अहाहा, काय मजा असायची....! आम्ही मित्र तिथे थोडं पोहायचो, उड्या मारायचो, आणि मग पुढे मंदिराकडे निघायचो. मंदिरासमोर बसून बेलपान विकणं ही माझी सवय झाली होती. एक रुपयाला पाच-सहा पानं, तेही अगदी ताजी. लोक माझ्याकडून पानं घ्यायला उत्सुक असायचे, कारण मी पानं स्वच्छ धुऊन, नीट बांधून ठेवायचो. मंदिरासमोर एक म्हातारीसुद्धा पान-फुल विकायची. तिच्याकडे बेलपान नसायचं, पण ती चंदनाचा पाला बेल म्हणून विकायची. लोकांना खऱ्या बेलाची ओढ असल्यामुळे माझ्याकडे गर्दी व्हायची. सोमवारी माझ्या हातात ८०-९० रुपये जमा व्हायचे, आणि कधी कधी तर शंभराची नोटही यायची. त्या वेळी ती खूप मोठी रक्कम होती. त्यातले पाच-दहा रुपये मी माझ्या छोट्या इच्छा पूर्ण करायला खर्च करायचो- मला गोडीशेव खूप आवडायची, शेवचिवडा, किंवा पपडी, भजे जिलेबी असं काही घ्यायचो. उरलेले सर्व पैसे घरी आलो की आईच्या हातावर ठेवायचो. आईच्या डोळ्यांत तेव्हा अभिमानाचे आणि समाधानाचे पाणी दाटायचं.
एकदा मात्र गंमत झाली. त्या म्हातारीला माझा व्यवसाय सहन झाला नाही. ती थेट मठाचे प्रमुख, रामदास महाराज, यांच्याकडे गेली आणि तक्रार केली, "एक च-हाटा गावचं पोर इथं पानफुल इकतंय, माझं कुणी घ्यायला येत नाही." महाराजांनी मला बोलवलं आणि माझ्यावर रागावले. मला वाईट वाटलं, पण रडून बसणं माझ्या स्वभावात नव्हतं. मी माझं बेलपान उचललं आणि मंदिराच्या पायऱ्यांच्या पार खाली, बाजूला बसलो. तिथेसुद्धा लोक माझ्याकडूनच पानं घेऊ लागले. हळूहळू ती म्हातारी माझ्याशी भांडण करणं सोडून दिलं. हा उपक्रम मी नववीपर्यंत चालू ठेवला. नंतर माझ्या विक्रीत नारळही आला. लोक नारळ घेऊन महादेवावर चढवायचे, म्हणून त्यालाही चांगली मागणी होती. पान-फुल-नारळ विक्रीतून मी घरात काही ना काही भर घालायचो. त्या पैशांनी घरच्या लहान गरजा भागायच्या.
दहावी आली आणि अभ्यासाचं ओझं वाढलं. मग मी बेलपान विकणं थांबवलं. पण आजही, कुठे पानफुल विक्रेता दिसला की मन जुने दिवस शोधायला लागतं. डोंगर चढणं, विहिरीवर पोहणं, गजबजलेला श्रावण, महादेवाच्या मंदिरासमोरची गर्दी, ताज्या बेलपानांचा वास, आईच्या चेहऱ्यावरचा आनंद - हे सगळं अजून डोळ्यांसमोर उभं राहतं. त्या काळी माझ्या लहानशा वयात मला एक गोष्ट समजली- आपली परिस्थिती जरी साधी असली, तरी आपली मेहनत, प्रामाणिकपणा आणि आई-वडिलांवरील प्रेम यामुळे आपण मोठं काही करू शकतो. ते दिवस फक्त पैशांसाठी नव्हते, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, जबाबदारीची आणि घराला हातभार लावण्याची खरी शिकवण होते. आजही जेव्हा महादेवाला बेल चढवतो, तेव्हा मला माझ्या लहानपणीचा तो "बेलपान विक्रेता" आठवतो, जो छोट्या-छोट्या पावलांनी मोठं शिकत होता. त्या आठवणी माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान संपत्ती आहेत.
◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642
Comments
Post a Comment