एक गॅसची टाकी आणि चार तासांचा संघर्ष
◾एक गॅसची टाकी आणि चार तासांचा संघर्ष◾
बुधवारी आमच्या घरचा गॅस संपला आणि घरात स्वयंपाक थांबण्याची वेळ आली. आजपर्यंत आम्ही गॅस एजन्सीच्या होम डिलिव्हरी करणाऱ्या रिक्षावाल्याला फोन करून गॅस मागवत होतो. दोन तासात गॅस घरी येत असे. पण यावेळी फोन केला तर त्याने सांगितले की आता होम डिलिव्हरी बंद केली आहे, तुम्ही बुकिंग करून दोन दिवसांनी एजन्सीवरून गॅस घ्या. त्याप्रमाणे मी लगेच आयव्हीआरवर फोन करून गॅस बुकिंग केली. बुकिंग नंबरही मिळाला, पण त्याचा मेसेज काही आला नाही. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मी गॅस एजन्सीवर गेलो. तिथे गेल्यावर त्यांनी ओटीपी दाखवा असे सांगितले. मी आयव्हीआरवर मिळालेला बुकिंग नंबर दाखवला, पण त्यांनी सरळ सांगितले की मेसेज असेल तरच गॅस मिळेल. माझी समस्या समजून घेण्याऐवजी त्यांनी एक प्रकारे मला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी एका व्यक्तीला बोलावून माझी माहिती तपासायला सांगितले. त्या व्यक्तीने मोबाईल ऍपवर माझे केवायसी तपासले. सर्व काही व्यवस्थित होते. मग त्याने माझ्याच मोबाईलवरून पुन्हा बुकिंग केली. त्यानंतर जो मेसेज आला तो पाहून मीच थक्क झालो. त्या मेसेजमध्ये लिहिले होते की तुम्ही 24 फेब्रुवारीला गॅस घेतलेला आहे, त्यामुळे पुढचा गॅस 22 मार्चला मिळेल. पण मी तर 24 फेब्रुवारीला गॅस घेतलाच नव्हता. तेव्हा माझ्या मनात एक गंभीर शंका आली की काही ठिकाणी ग्राहकाच्या नावावर गॅस दाखवून तो दुसऱ्यालाच दिला जातो का? मी एजन्सीमध्ये याबाबत विचारणा केली. माझा चिडलेला आवाज पाहून त्यांनी शेवटी गॅस देण्याची तयारी दाखवली. पण संघर्ष इथेच संपला नाही. गॅस घेण्यासाठी जवळजवळ शंभर लोकांची रांग होती. मीही रांगेत उभा राहिलो. थोड्या वेळाने समजले की या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट घेत नाहीत आणि मी रोख पैसे आणायला विसरलो होतो. मग पुन्हा दोन किलोमीटर दूर एटीएमवर जाऊन पैसे काढले आणि परत येऊन रांगेत उभा राहिलो. अर्ध्या तासानंतर माझा नंबर आला. पैसे भरले, पावती मिळाली. पण गॅस अजून मिळायचा होता. एजन्सीपासून जवळजवळ दोन किलोमीटर दूर असलेल्या गोदामात जाऊन टाकी घ्यावी लागली. या सगळ्या प्रक्रियेत एक गॅसची टाकी मिळवण्यासाठी जवळजवळ चार तास गेले.
घरी आल्यावर टीव्हीवर बातम्या ऐकल्या. मोठे नेते मंत्री बोलत होते. त्यात सांगितले जात होते की सगळं सुरळीत आहे आणि विरोधक फक्त बदनामी करत आहेत. पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आहे. एजन्सीमध्ये अनेक म्हातारी माणसं रांगेत उभी होती. काहींना रिकामी टाकी उचलतही नव्हती. त्यांची अवस्था पाहून मन हेलावून गेलं, पण काय करणार? आज डिजिटल इंडिया, ऑनलाइन सेवा आणि सुविधा यांची मोठी चर्चा होते. पण प्रत्यक्षात एक गॅसची टाकी मिळवण्यासाठी सामान्य माणसाला दिवसभर संघर्ष करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. ही कोणाची बदनामी नाही, ही फक्त सत्य परिस्थिती आहे. सिस्टम सुधारली पाहिजे, होम डिलिव्हरी व्यवस्थित झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाचा वेळ आणि सन्मान वाढला पाहिजे.
◾ श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड
◾ मो.9405344642
#गॅससंकट #सामान्यमाणसाचासंघर्ष #गॅसमिळवण्यासाठी4तास #व्यवस्थेचीवास्तवस्थिती #गॅसएजन्सीअनुभव #डिजिटलइंडियाचेसत्य #सिस्टमसुधरलीपाहिजे #सामान्यमाणसाचाआवाज #ग्राहकहक्क #व्यवस्थेतीलत्रुटी #खरीपरिस्थिती #सत्यस्थिती #जनतेचादुखावा #गॅसवितरणप्रश्न #सामाजिकवास्तव
Comments
Post a Comment