गाडगेबाबा थोर संत
◾संत गाडगेबाबांविषयी गैरसमज पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर◾
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संत गाडगे महाराज यांचं स्थान अत्यंत उंच आहे. अशा थोर संतपुरुषांना “नास्तिक” ठरवण्याचा प्रयत्न माधव घुले नावाच्या तथाकथित बुवाकडून जाणीवपूर्व होत असेल, तर तो केवळ अज्ञानाचा नाही तर वारकरी परंपरेचा अपमान आहे. गाडगेबाबा हे नास्तिक नव्हते ते अंधश्रद्धाविरोधी होते. त्यांनी देव नाकारला नाही, पण देवाच्या नावावर चालणाऱ्या खोट्या आडंबराला विरोध केला. त्यांच्या कीर्तनाची सुरुवात “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या नामस्मरणाने व्हायची आणि संत तुकाराम महाराजांचे अभंग तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांचा आधार घेतल्याशिवाय ते कधी बोलले नाहीत. मग अशा संताला नास्तिक म्हणणं हा कोणता अभ्यास, असा सवाल प्रत्येक वारकऱ्याच्या मनात निर्माण होतो. वारकरी संप्रदायाचा गाभा म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आणि हे तिन्ही गुण गाडगेबाबांच्या जीवनात ओसंडून वाहत होते. म्हणूनच अनेक वारकरी त्यांना तुकोबांचा अवतार मानतात. त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू येथे वारकऱ्यांसाठी धर्मशाळा, आश्रम उभे केले, घाट बांधले आणि वारीच्या काळात स्वतः झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. हजारो लोकांना स्वच्छतेचा, सेवाभावाचा आणि माणुसकीचा संदेश दिला. महाराष्ट्रात प्राण्यांच्या बळीची प्रथा कमी होण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी समाजातील दिनदलित, कष्टकरी, वंचित घटकांना उभं करण्यासाठी आयुष्य झोकून दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला त्यांनी मनापासून पाठिंबा दिला. स्वतः निर्माण केलेल्या संस्थांवर कधीही हक्क सांगितला नाही हा त्यागाचा सर्वोच्च आदर्श आहे.
आज काही जण कीर्तन परंपरेचंही विकृतीकरण करताना दिसतात. वारकरी संप्रदायात कीर्तन ही उभी राहून, नम्रतेने आणि संतांच्या विचारांचा आदर ठेवून केली जाणारी सेवा आहे. त्यात कोणत्याही संतांची निंदा किंवा इतर धर्म-जातीबद्दल द्वेष पसरवण्याला मुळीच स्थान नाही. अशा पवित्र परंपरेत बसून कीर्तन करणं, गप्पा झोडणं आणि संतांच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह उभं करणं ही कोणती परंपरा, हा विचार करण्याचा विषय आहे. कोण आस्तिक, कोण नास्तिक आणि कोण वारकरी हे ठरवण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. उद्या अशीच प्रवृत्ती वाढली तर संत तुकाराम यांचे अभंगही चुकीचे ठरवले जातील आणि संत ज्ञानेश्वर यांच्यासारख्या महान संतांच्या विचारांनाही विकृत केलं जाईल. ही प्रवृत्ती अत्यंत घातक आहे. दांडेकर मामा यांसारख्या ज्येष्ठ वारकरी विद्वानांनी गाडगेबाबांवर चरित्र लिहिलं आहे, त्यांच्या कार्याची साक्ष दिली आहे. हे सर्व दुर्लक्षित करून कोणीही काहीही बोलत असेल, तर तो केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. गाडगेबाबांनी “जिवंत माणसात देव पाहा” हा संदेश दिला. त्यांनी धर्माच्या नावाखाली दूर लोटल्या गेलेल्या समाजाला आपल्या हृदयाशी धरलं. त्याग, सेवा आणि समता हीच त्यांची खरी ओळख आहे. आज महाराष्ट्रात कोणताही आधार नसताना वाटेल ते बोलण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते आहे. ही प्रवृत्ती थांबली नाही तर ती आपल्या संतपरंपरेलाच बाधा पोहोचवेल. वारकरी संप्रदायाचा खरा संदेश द्वेष नव्हे, तर प्रेम, सेवा आणि सत्य हाच आहे. संत गाडगेबाबांसारख्या दिवंगत संतांवर “नास्तिकतेचा” शिक्का मारणं हा केवळ अन्याय नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशावर घाव आहे. अशा विचारांचा निषेध झाला पाहिजे, पण त्याचबरोबर संबंधित व्यक्तींनीही सत्य जाणून घ्यावं, संतांच्या चरणी नम्र व्हावं, हीच अपेक्षा. संतांचा अपमान सहन केला जाणार नाही पण त्याला उत्तरही संतांच्या मार्गानेच, संयमाने आणि ठामपणे दिलं जाईल.
"तुका म्हणे तोची वेडा l त्याचे हाणूनी थोबाड फोडा ll"
"बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥
जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥
जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥२॥
तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥
"कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥१॥
भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥
अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥२॥
तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥३॥"
माधव घुले नावाच्या नालायक बुवाचा जाहीर निषेध....!
◾ श्रीकृष्ण महाराज उबाळे
◾ मो.9405344642
Comments
Post a Comment