अस्पृश्यता निर्मूलणासाठी सर्वस्व अर्पण करणारा 'संत' विठ्ठल रामजी शिंदे

अस्पृश्यता निर्मूलणासाठी सर्वस्व अर्पण करणारा 'संत' विठ्ठल रामजी शिंदे 
         महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील उपेक्षित, बहिष्कृत आणि दलित घटकांच्या उन्नतीसाठी वेचले. समाजसुधारणेच्या मार्गावर चालताना त्यांनी स्वतःच्या सुख, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेचा विचार न करता मानवी समतेचा ध्यास अखेरपर्यंत जपला. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटक राज्यातील जमखंडी संस्थान येथे एका खानदानी मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामजीबाबा आणि आई यमुनाबाई. घराणे पूर्वी श्रीमंत होते; मात्र कालांतराने ही श्रीमंती ओसरली आणि गरिबीने घरात प्रवेश केला. वडील रामजीबाबा काही काळ संस्थानात शिक्षक व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी असल्याने घरात भक्ती, सात्त्विकता आणि साधेपणाचे वातावरण होते. आई यमुनाबाई सात्त्विक वृत्तीची असून घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते. याच वातावरणामुळे लहानपणापासूनच विठ्ठलरामजींच्या मनात माणुसकी, समता आणि करुणा या मूल्यांची बीजे रुजली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला. लहान वयात संसाराची जबाबदारी येऊनही शिक्षणाची ओढ आणि समाजाविषयीची जाणीव त्यांच्या मनात सतत जागी होती. जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून त्यांनी १८९१ मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. याच काळात त्यांच्या धाकट्या बहिणीवर जनाबाई हिच्या सासरी अन्याय होऊ लागल्यामुळे तिला पुण्यात आणून हुजूरपागा शाळेत घालण्यात आले. स्त्रीशिक्षण व अन्यायाविरोधातील त्यांची भूमिका यातून स्पष्टपणे दिसून येते.
             घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी शिक्षण थांबवले नाही. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या कर्जाऊ शिष्यवृत्तीच्या आधारावर आणि खाजगी शिकवण्या करून काटकसरीचे जीवन जगत त्यांनी १८९८ मध्ये बी.ए. पदवी संपादन केली. याच काळात अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव्ह. जे. टी. संडरलंड यांच्या व्याख्यानांमुळे त्यांना एकेश्वरमताचा परिचय झाला. मॅक्स म्यूलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची धर्मप्रेरणा अधिक प्रगल्भ झाली. न्या. रानडे, रा. गो.भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा सहवास लाभल्यामुळे त्यांनी १८९८ मध्ये प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. पुढील अभ्यासासाठी ते मुंबईस गेले. मुंबई व कोलकात्याच्या प्रार्थनासमाजाच्या शिफारशीवरून ब्रिटिश अँड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये निवड केली. १९०१ ते १९०३ या काळात त्यांनी तेथे तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा, बौद्ध धर्म, समाजशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला. विदेशातील शिक्षणामुळे त्यांचा दृष्टीकोन अधिक व्यापक झाला. परंतु या साऱ्या ज्ञानाचा उपयोग स्वतःपुरता न ठेवता भारतातील शोषित समाजासाठी करायचा, असा त्यांनी निश्चय केला. भारतभर केलेल्या प्रवासात अस्पृश्य समाजाची दयनीय अवस्था पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले. शतकानुशतके बहिष्कृत जीवन जगणाऱ्या या समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालावे, हा विचार त्यांच्या मनात पक्का झाला. १९०६ मध्ये त्यांनी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना करून अस्पृश्यता निर्मूलणाच्या कार्याला प्रत्यक्ष सुरुवात केली. त्यांच्या मते हे कार्य म्हणजेच खरे धर्मकार्य होते.
            आपल्या विचारांना कृतीची जोड देण्यासाठी त्यांनी स्वतः आणि आपल्या दोन्ही बहिणींना घेऊन दलित वस्तीत राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या काळात उच्चवर्णीय समाजातील व्यक्तीने असे करणे हे मोठे धाडस होते. त्यामुळे त्यांना तत्कालीन मराठा समाजाकडून हिनवणूक, अपमान आणि सामाजिक बहिष्कार सहन करावा लागला. अनेक सनातनी लोकांनी त्यांच्या कार्यात अडथळे आणले, त्यांच्या सभांना विरोध केला, काही ठिकाणी त्यांच्यावर हल्लेही झाले. तरीही त्यांनी आपला मार्ग बदलला नाही. दलित समाजाने शिक्षण घेतले, आत्मसन्मानाने उभे राहिले तरच समाज बदलेल, असा त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणून त्यांनी दलित मुलांसाठी शाळा, वसतिगृहे, उद्योगशाळा सुरू केल्या. मुंबई, पुणे, अकोला, अमरावती, नागपूर, हुबळी, धारवाड, बंगलोर, चेन्नई अशा अनेक ठिकाणी मिशनच्या शाखा उभारल्या. त्यांच्या आई-वडिलांनी आणि बहिणींनीही या सेवाकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. या कार्याला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेषतः शाहू महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी दिलेला पाठिंबा शिंदे यांच्या कार्याला मोठे बळ देणारा ठरला. पुढील काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या संघर्षमय पर्वाची पायाभरणी या जागृतीच्या कार्यातूनच झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विठ्ठल रामजी शिंदे हे प्रभावी लेखक आणि संशोधकही होते. अस्पृश्यतेच्या उगमापासून ते समकालीन परिस्थितीपर्यंत त्यांनी सखोल संशोधन केले. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, माझ्या आठवणी व अनुभव, भागवत धर्माचा विकास, मराठ्यांची पूर्वपीठिका (लेख), कानडी - मराठी संबंध (लेख), कोकणी - मराठी संबंध (लेख) इत्यादी पुस्तके लिहिली. ‘माझ्या आठवणी व अनुभव’ आणि त्यांची रोजनिशी या लेखनातून त्यांच्या संवेदनशील, अध्यात्मिक आणि माणुसकीने ओथंबलेल्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय मिळतो. २ जानेवारी १९४४ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. अस्पृश्यता निर्मूलणासाठी आयुष्यभर केलेल्या त्यागमय कार्यामुळे त्यांना ‘कर्मवीर’ आणि ‘महर्षी’ या उपाधींनी गौरविले जाते. विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन आजही समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी झगडणाऱ्या प्रत्येकासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरते. तुकोबाच्या भाषेत ते खरेखूरे संत होते- 
'जे का रंजले गांजले l त्यासी म्हणे जो आपुले ll 
तोचि साधू ओळखवा l देव तेथेची जाणावा ll"

पण या संताला ओळखायला व पचवायला महाराष्ट्रात त्या दर्जाचे भाविक जन्माला आले नाहीत हे आपले दुर्दैव..!

काल त्यांची पुण्यतिथी होती विनम्र अभिवादन....!

◾श्रीकृष्ण महाराज उबाळे 
◾मो. 9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'