उपेक्षित महानायिका सावित्रीबाई फुले

◾उपेक्षित महानायिका सावित्रीबाई फुले◾
             आपले महाराष्ट्र राज्य हे प्रगतीशील राज्य म्हणून गणले जाते. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात शिक्षण खासकरून स्त्री शिक्षण जास्त प्रमाणात आहे. अनेक सामाजिक बदलांचे नेतृत्व महाराष्ट्राने केले आहे. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत तर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला तोड नाही. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांनी यशस्वीपणे प्रवेश करून पुरुषांची मक्तेदारी कमी केली आहे. कुठल्याही शाळा-महाविद्यालय, विद्यापीठ, बोर्ड किंवा स्पर्धा परीक्षा यामध्ये मुलींनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून आम्ही कुठेच कमी नाही यावर मोहर उमटवली आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण, आमदारकी खासदारकी, मंत्री, मुख्यमंत्री एवढेच काय भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत गवसणी घालण्याचा मान स्त्रीला प्राप्त झाला. या सर्वांसाठी ज्या देवीने पाया तयार करून ठेवला, स्वतःला संपवून घेतलं त्या सावित्रीबाई फुले यांच्या विषयी किती जणांच्या खासकरून जणींच्या मनात भाव आहे ? त्यांच्याविषयीची सामान्य जाणीव किती आया-बायांना आहे ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. संत तुकाराम महाराज म्हणतात,

"एका बीजा केला नाश l मग भोगिले कणीस |
कळो सकळा हा भाव l लहान थोरांवरी जीव ||"

एक बीज स्वतःला जमिनीत गाडून घेत. स्वतःचा नाश करून घेत तेव्हा कुठे कणसाची प्राप्ती होते. ज्या बीजाने जगाला कणीस मिळावे म्हणून स्वतःला खपवून घेतलं त्या बिजाविषयी कृतज्ञ भाव असलाच पाहिजे. लहान मोठ्या सर्वांना त्याची नेहमी जाणीव असायला हवी. सावित्रीबाई फुले यांनी त्या बिजाप्रमाणे स्वतःला खपवून घेतले. स्त्रियांच्या जीवनात सुखाचे दिवस आणले. त्याची जाणीव , कृतज्ञता असायलाच हवी पण दुर्दैवाने म्हणावे लागते की आज सार्‍या महिला, समाज, शासन-प्रशासन कृतघ्न बनले आहेत. सावित्रीला विसरले आहेत. सावित्रीमाय, तिचे कर्तृत्व, तिचा इतिहास, तिचा लढा आज उपेक्षित आहे असे ठामपणे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. 
           १८४८मध्ये पुण्यासारख्या कर्मठपणाचा कळस असणाऱ्या शहरामध्ये मुलींची देशातली पहिली शाळा काढणे हे किती मोठं क्रांतिकारी पाऊल होतं याचा अंदाज आपल्याला आज येऊ शकत नाही. 'येथे पाहिजे जातीचे येरागबाळ्याचे काम नव्हे' ही तूकोक्ती  या ठिकाणी लागू होते. शाळा काढली म्हणून ज्योतिबांना वडिलांनी घरातून हाकलून लावलं. न डगमगता सावित्रीबाईंनी आपल्या पतीची साथ दिली. आपला नवरा स्त्रीमुक्तीचे पवित्र काम करतो आहे हे त्यांना माहीत होतं. आज आम्ही शिकून डबल एम.ए. झालेल्या बाया नवरा एखादं कर्मकांड नको म्हटला तर त्याला समर्थन देत नाहीत. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या प्रशिक्षित स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका आहेत. दुसरी शाळा १८५१ साली ज्योतिरावांनी सुरू केली. सनातन्यांचा प्रचंड विरोध होत होता. मुली शाळेत न्यायला विरोध व्हायचा. पालकांचीही अडवणूक केली जायची. तेव्हा पालकांनी मुली पोत्यात बांधायच्या आणि शाळेत आणून सोडायच्या अशी 'पोते शिक्षण पद्धत' सुरू झाली. सावित्रीबाईंना दगड, चिखल, शेण यांच्यासह शिव्यांचा प्रसाद मिळू लागला पण घाबरते ती सावित्री कसली. त्यांनी त्रास देणार्‍यांना नम्रपणे सांगितलं, "बंधुंनो मी तुमच्या धाकट्या भगिनींना शिकवण्याच पवित्र कार्य करत आहे. तुम्ही या कामी मला शेण, खडे मारत आहात हे माझ्यावर उधळले फुलेच आहेत असेच मी समजते. मी माझ्या कामापासून कधीच मागे हटणार नाही. ईश्वर तुमचं भलं करो." मुलींसाठी काय सोसले त्या आईने ? पोत्यातल्या त्या मुलींच्या मनाची स्थिती काय असेल त्यावेळी ? याचा विचारही कधी तरी आजच्या स्त्रियांनी नक्की करायला हवा. 
                    भारतातील स्त्रियांचे प्रश्न सागर असतील तर विधवा स्त्रियांचे प्रश्न अनेक महासागर आहेत. अशा विधवा स्त्रियांसाठी जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली १०० हून अधिक ब्राह्मण विधवांची बाळंतपणे त्यांनी या गृहात केली. त्याची पूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंवर होती. त्यातीलच एका विधवेच्या मुलाला यशवंतला त्यांनी दत्तक घेतले. त्याला शिकवून डॉक्टर केले. त्याकाळी पुण्यामध्ये विधवा स्त्रियांना विद्रूप करण्याची प्रथाच होती. त्यामध्ये विधवा स्त्रियांचे पूर्ण केस कापून टाकून त्यांची चप्पी केली जाई. केस म्हणजे स्त्रियांचा अनमोल दागिना. या प्रथेचा बंदोबस्त केलाच पाहिजे यासाठी त्यांनी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली व सदोबा न्हावी यांच्या अध्यक्षतेखाली १८९० मध्ये पाचशे न्हाव्यांचा ऐतिहासिक संप घडवून आणला. येथून पुढे विधवांचे केस कापणार नाही असा ठराव पास करण्यात आला. त्याची दखल त्यावेळच्या इंग्लंड येथील 'टाइम्स' वर्तमानपत्राने घेतली यावरून या गोष्टीचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. १८७९ साली मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी दलित, दुबळे यांची एक हजार मुलं जगण्याचं, त्यांना दोन वेळचं जेवण देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांच्या नेतृत्वाखाली झालं. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या लिखाणाच्याही आधी 'काव्यफुले' नावाचा कवितासंग्रह लिहिला होता त्यात त्या म्हणतात,

"ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही 
बुद्धी असून चालत नाही,तयास मानव म्हणावे का ?"

जीवनभर चंदनाप्रमाणे झीजून अनेकांच्या जीवनात सुगंध दरवळून टाकणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू प्लेगच्या रोग्यांची सेवा करीत असताना प्लेगची लागण होऊन झाला. सावित्रीबाईंनी ज्या शाळेत शिकवले त्या शाळेत ब्राह्मण, धनगर, मराठा, माळी, महार-मांग, मुसलमान सर्वच समाजाच्या मुलींचा समावेश होता. म्हणजे समाजातील सर्व स्त्रियांचा उद्धार करण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. सर्वच स्त्रियांवर त्यांचे उपकार आहेत हे विसरून चालणार नाही. आपल्या पवित्र कार्यात त्यांनी कधी जात धर्म पाहिला नाही. विधवा केशवपण, बालहत्या प्रतिबंधक गृहात ज्यांना लाभ मिळाला त्या सर्व ब्राह्मण समाजाच्या भगिनी होत्या. फुले दाम्पत्यांचा लढा मानवतेसाठी होता. मानवतेची इमारत उभा करण्यासाठी जीवनभर राबणारे हे खरेखुरे संत होते. धर्माच्या नावे चालणारी दुकानदारी, भोंदूगिरी, पुरोहितशाही, अंधश्रद्धा, कर्मकांड त्यांना मान्य नव्हते. आजची परिस्थिती विचित्र आहे. त्यांचा जिवंत इतिहास सांगणारी 'भिडे वाड्यातील' देशातील मुलींची पहिली शाळा आज शेवटच्या घटका मोजत आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात गुंतलेली आहे. शासन-प्रशासन, समाज यांच या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. किती ही उपेक्षा त्यांची. एक वास्तूही आम्ही चांगल्या पद्धतीने जतन करू शकलो नाहीत. आमच्या पुढच्या पिढ्या नक्कीच आम्हाला माफ करणार नाहीत. खरंतर आज पैशासाठी खेळणाऱ्या, स्वतःचे विक्रम नोंदवण्यासाठी काम करणाऱ्यांना भारतरत्न सारखे पुरस्कार खैरात म्हणून वाटले जातात, एखाद्या पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना भारतरत्न पुरस्कार दिले जातात. त्यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे, विठ्ठल रामजी शिंदे यांसारखी समाजाला प्रकाशवाट दाखवणारी मंडळी उपेक्षित राहतात याहून दुसरे दुर्दैव नाही. ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपलं सर्वस्व स्वाहा केलं त्यांचा इतिहास, साहित्य, विचारधारा या सार्‍यांची उपेक्षा होताना पाहून अंतकरणातून त्रास होतो. ही उपेक्षा अशीच ठेवायची कि थांबवायची याचा विचार नक्कीच व्हायला हवा. 

◾श्रीकृष्ण महाराज उबाळे
◾मो.९४०५३४४६४२


Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'