गरज सरोआणि वैद्य मरो
◾गरज सरो आणि वैद्य मरो ◾
एखाद्या कादंबरीत असावी अशी घटना. चार वर्षांपूर्वी बीड शहरात घडलेली. माणसाच्या स्वार्थी वृत्तीचं, उपकार विसरण्याचं आणि गरज संपली की माणसं कशी बदलतात याचं जिवंत उदाहरण. बीड येथील एका सामाजिक संस्थेने मोठ्या कष्टानं वृद्धाश्रम सुरू केलं होतं. फार मोठ नाही, पण स्वच्छ, माणुसकी जपणारं, प्रेमाने चालणारं. तेथे येणारे वृद्ध म्हणजे आयुष्याने थकलेले, नात्यांनी फसवलेले, संसाराने झिजवलेले. अशाच एका दुपारी आश्रमाच्या दारात एक वृद्ध जोडपं उभं होतं. साधी कपडे, अंगावर थकव्याची झाक, डोळ्यांत भीती आणि आसरा द्यावा ही अपेक्षा यांचा विचित्र संगम. वय साधारण साठच्या आसपास. त्यांना मुलबाळ नव्हते. आयुष्यभर सरकारी सेवेत काम केलेलं. पती मंडळ अधिकारी होते. पण काही कारणाने त्यांची सरकारी सेवेतून बडतर्फी झाली होती. ती अन्यायकारक असल्याचं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. केस चालू होती. पण केस चालू असताना नोकरी गेली, पगार थांबला, आणि आयुष्याची गाडी रुळावरून घसरली.नोकरी हेच त्यांचं जगण्याचं एकमेव साधन होतं. सुरुवातीला थोडीफार पुंजी होती. ती हळूहळू खर्च झाली. घरखर्च, औषधं, कोर्टखर्च… सगळं निभावताना त्यांच्या हातातलं सगळं संपलं. जेव्हा पैसा संपतो, तेव्हा नातीही संपतात, हे त्यांना कडू अनुभवाने कळलं. आपल्या जवळ पैसा असतो त्यावेळी सगळ्या जगाकडे पैसा असतो. आपण दरिद्री त्यावेळी सारं जगही दरिद्री असतं. जवळचे नातेवाईक, ओळखीची माणसं, कुणीही त्यांना जवळ केलं नाही. हळूहळू त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. एक दिवस असा आला की डोक्यावर छप्पर राहिलं नाही. रेल्वे स्थानक, बसस्थानक हेच त्यांचं घर बनलं. कधी चहासाठी, कधी भाकरीसाठी अक्षरशः भीक मागून दिवस काढावे लागले. आयुष्यभर सन्मानाने जगलेली माणसं अशा अवस्थेत पोहोचली होती. त्या वृद्ध माणसाच्या डोळ्यातील लाज आणि त्या वृद्धेच्या चेहऱ्यावरचं मूक दुःख पाहून दगडाचंही काळीज विरघळेल. अशाच अवस्थेत कुणीतरी त्यांना वृद्धाश्रमाबद्दल सांगितलं. शेवटचा आधार म्हणून ते आश्रमात आले.
संचालकांनी त्यांची हकिकत ऐकली. कुठलाही प्रश्न न करता, कुठलीही अट न घालता त्यांना आत घेतलं. राहायला खोली, खायला अन्न, औषधोपचार, माणुसकीचा स्पर्श… सगळं मिळालं. अनेक दिवसांनी त्यांना पोटभर अन्न मिळालं, शांत झोप मिळाली. काही दिवसांतच त्यांच्या शरीरावर झालेली उपासमारीची झीज भरून निघू लागली. त्या वृद्धेच्या चेहऱ्यावर हसू परत आलं. त्या वृद्धाच्या डोळ्यांत आत्मविश्वासाची चमक दिसू लागली. “आपण अजून माणूस आहोत,” ही जाणीव त्यांना आश्रमाने दिली होती. संचालक मायाळू होते. आश्रमातलं वातावरण आपुलकीचं होतं. त्यांना जणू नवं जीवनच मिळालं होतं. असेच काही दिवस गेले. एक दिवस आश्रमात एक व्यक्ती त्यांना शोधत आली. त्याने ओळख करून दिली. काही कागद दाखवले. आणि एक बातमी सांगितली. त्यांनी बडतर्फीविरोधात दाखल केलेली केस जिंकली होती. न्यायालयाने त्यांना न्याय दिला होता. जवळजवळ काही लाख रुपये थकीत रक्कम मिळणार होती. शिवाय दरमहा निवृत्ती वेतनही सुरू होणार होतं. ही बातमी ऐकून त्या जोडप्याला धक्का बसला. आनंद, आश्चर्य, दिलासा… सगळं एकाच वेळी. त्यांचं आयुष्य पुन्हा बदलणार होतं. काही दिवसांत पैसे मिळाले. अचानक सगळं जग त्यांच्या अवतीभवती फिरू लागलं. जे नातेवाईक कधी फोनही उचलत नव्हते, ते आता आपुलकीने चौकशी करू लागले. त्यांनी वृद्धाश्रम सोडण्याचा निर्णय घेतला. एका नातेवाईकांसोबत जाण्याचं ठरवलं. आश्रम सोडताना त्यांनी औपचारिक धन्यवाद दिला. पण ना आश्रमाला कुठली मदत, ना कृतज्ञतेचं एक शब्दाचं पत्र, ना कधी फोन. ते गेले… आणि पुन्हा कधीच परत आले नाहीत. ज्या वेळी ते निराधार होते, तेव्हा कुणीही नातेवाईक जवळ आला नाही. पण पैसा आला, की नाती चिटकली. ज्या वृद्धाश्रमाने त्यांना विनाअट आसरा दिला, पोटभर अन्न दिलं, माणुसकी दिली त्या आश्रमाला मात्र विसरलं गेलं. उपकार करणारा बाजूला पडला. ही कथा फक्त त्या जोडप्याची नाही. ही कथा माणसाच्या स्वार्थाची आहे. गरज असेपर्यंत देव आठवतो, माणसं आठवतात. गरज संपली, की सगळं विसरलं जातं. आपल भागलं की माणूस उपकार करणाऱ्याला कसा कोलतो याचं जातिवंत उदाहरण आहे. संत कबीर यांनी यावर सुंदर दोहा लिहिला आहे. 'दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय। जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे को होय।' माणसाला गरज वाटते ती दुःख असल्यावर... सुख जवळ असल्यावर माणूस सगळं विसरून जातो. 'गरज सरो आणि वैद्य मरो' ही म्हण इथे अक्षरशः खरी ठरते. पैसा आला की माणूस मोठा होत नाही, तर त्याचा खरा चेहरा उघडा पडतो. आणि म्हणूनच, या कथेतील वृद्धाश्रम हे फक्त एक वास्तू नाही, तर माणुसकीचा दीप आहे जो उपकार विसरणाऱ्या समाजालाही शांतपणे उजळवत राहतो.
◾श्रीकृष्ण महाराज उबाळे
◾मो. 9405344642
#गरजसरोमाणूसमरो #उपकारविस्मृती #माणुसकीचा_दीप #स्वार्थी_नाती #पैसा_आणि_माणूस #वृद्धाश्रम #सामाजिक_वास्तव #कडू_सत्य #मानवी_स्वभाव #नात्यांचा_हिशोब #आजचा_समाज #विसरलेली_माणुसकी #गरज_आणि_नाती #सत्यकथा #मन_हेलावणारी_कथा
Comments
Post a Comment