गाडगेबाबांचे आमच्या गावातील कीर्तन

◾गाडगेबाबांचे आमच्या गावातील कीर्तन◾
         खूप वर्षांपूर्वीचा तो दिवस…माझे आजोबा रामराव माधवराव उबाळे सांगायचे, तेव्हा त्यांचे वय अवघे सोळा वर्षे होते. पाच वर्षांपूर्वी वयाच्या शंभरव्या वर्षी त्यांचे निधन झाले. चऱ्हाटा ता. बीड गाव तसं लहानसं, साधंसुधं. सर्व जाती धर्माचे लोक गावात राहायचे. कच्च्या गल्ल्या, विहिरीचं पाणी, लाईट नाही, संध्याकाळ झाली की टेंभ्यांचा उजेड. आजोबांच्या आठवणीतला तो प्रसंग मात्र आजही जिवंत होता. वयाच्या एकशेएक वर्षांपर्यंत त्यांनी तो तितक्याच जिवंतपणे सांगितला. त्या दिवशी सकाळी सकाळी गावाच्या वेशीवरून एक विचित्र माणूस चालत आला. पांढरीशुभ्र दाढी, उंच, रांगडा देह; पण अंगावर फाटक्या चिंध्या. डोक्यावर कापड गुंडाळलेलं आणि त्यावर मडक. लोकांनी पहिल्यांदा पाहिलं आणि मनात आलं हा कुठला फकीर ? कुठून आला असेल? तो माणूस थेट गल्लीमध्ये गेला. खेळत असलेल्या बारक्या पोरांना हाक मारली.“अरे पोरांनो, या रे… काम आहे.” पोरं कुतूहलानं गोळा झाली. त्यानं कुठलीही कथा सांगितली नाही, उपदेश केला नाही. हातात खराटा घेतला आणि म्हणाला, “चला, गाव झाडून काढूया.” आणि पाहता पाहता चमत्कार घडू लागला. पोरं त्याच्या मागे लागली. गल्लीतील घाण, कचरा, शेण, साचलेलं पाणी सगळं साफ होऊ लागलं. जिथं पाणी साचलेलं असे, तिथं माती टाकून एक बाजूने वाट काढून दिली. आजोबा सांगायचे, “आम्ही पोरं होतो, पण त्या माणसाच्या हातात जादू होती. दमणूक वाटलीच नाही.” सकाळचा सूर्य वर आला आणि अख्खं गाव झाडून निघालं. एवढंच नाही तर मारुतीच्या देवळाच्या आजूबाजेणे लोकांनी हागनदारी बनवली होती. आपल्या झाडूने ती हागनदारी  झाडून निर्मळ केली. तेवढ्यात त्यानं हलगीवाल्याला बोलावलं. पोरांना सोबत घेतलं आणि गावभर दवंडी फिरवली, “आज रात्री गाडगेबाबांचं कीर्तन आहे हो...!”
लोक थबकले.
“गाडगेबाबा?”
नाव ऐकलेलं होतं, पण पाहिलं कुणीच नव्हतं. दुपारी तो माणूस विहिरीवर गेला. शांतपणे निर्मळ आंघोळ केली, आपले कपडे धुतले. गावात दोन घरांतून भाकर मागितली. ती घेऊन मारुतीच्या देवळात आला. देवासमोर बसून ती भाकर शांतपणे खाल्ली आणि तिथंच अंग टाकून विसावला. संध्याकाळ होत आली. गावकरी मारुतीच्या मंदिरासमोर जमू लागले. आजूबाजूच्या वाडी-वस्तीवरून, शेजारच्या गावातूनही लोक मोठ्या संख्येने जमू लागले. त्याकाळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या गावात लोक एकत्र याण्याची ती पहिली वेळ होती. टेंभ्यांचा उजेड लुकलुकू लागला. विणेकरी, गायक, मृदुंगाचार्य, टाळकरी सगळे जमले. त्या विचित्र माणसानं सगळ्यांना खाली बसवलं. स्वतः मात्र उभा राहिला. आणि कीर्तन सुरू झालं. “गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला…! असं काय बगता लाकहो मह्याकडं ह्याच देहाले गाडगे बुवा म्हन्तेत लोक.” आवाजात करारिपणा होता, त्यागाची धग होती, समर्पण होतं, लोककल्याणाची तळमळ होती. शब्द साधे होते, पण थेट काळजाला भिडणारे होते. अस्सल गावरान विदर्भातील वऱ्हाडी भाषा त्यांच्या मुखात होती. आजोबा सांगायचे, “तेव्हा लोक एकमेकांकडे पाहत होते. आपल्याच तोंडात मारून घेतल्यासारखं वाटत होतं. अरे बापरे..! हे तर स्वतः गाडगेबाबा..! आणि आपण त्यांना ओळखलंच नाही...! आपण केलेली घाण बाबांनी झाडून काढली.” बाबांचं कीर्तन सुरु झालं. लोक डोलू लागले. आनंदाने गोपाला गोपाला म्हणू लागले. कीर्तनात बाबांनी रोगराईवर बोललं, स्वच्छतेवर बोललं, आणि सर्वात जास्त भर दिला मुलांच्या शिक्षणावर. “मुलं शिकली पाहिजेत. अज्ञान हीच खरी घाण आहे,” असे शब्द आजोबांच्या कानात आजही घुमायचे. पुढ त्यांनी देवाच्या नावाने, नवसाच्या नावाखाली होणारी मुक्या प्राण्यांची कत्तल यावर सांगितलं. नवसाने पोरं होतं नाहीत हे सांगितलं. माणसाच्या अंगात अज्ञान नावाचा राकीस असतो. तेव दूर करायचा असल तर आपल्या पोरायले शिकवा. तीन-चार तास कीर्तन चाललं. मधी मधी गोपाला भजन व्हायचं. लोकांनी असं कीर्तन कधीच ऐकलं नव्हतं. समोर बसलेले स्त्री-पुरुष अक्षरशः डोलत होते. कोणी पाया पडायला गेलं, तर बाबांनी हात उचलून थांबवलं. “माझ्या पाया पडू नका, कामाला पडा,” एवढंच ते म्हणाले. कीर्तन संपलं. अंधार दाटलेला होता. टेंभ्यांचा उजेड थरथरू लागला. आणि त्या अंधाराचाच फायदा घेऊन, कोणालाही न सांगता, गाडगेबाबा निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गाव जागं झालं. बाबांचा मागमूस नव्हता. पण गाव स्वच्छ होतं. मनं स्वच्छ झाली होती. आजोबा शेवटी म्हणायचे, “तेव्हा मोबाईल नव्हते, फोटो नव्हते. गाडगेबाबांचं नाव ऐकलं होतं, पण पाहिलं नव्हतं. त्या दिवशी मात्र आम्ही त्यांना पाहिलं… आणि त्यांनी आम्हालाच आरसा दाखवला.” आमच्या चऱ्हाटा ता. बीड गावासाठी तो दिवस फक्त कीर्तनाचा नव्हता तो दिवस जागृतीचा होता. माझे आजोबा जवळजवळ सत्तावीस वर्षे विविध अखंड हरिनाम साप्ताहात, धार्मिक कार्यक्रमात विणेकरी होते. ते सांगायचे "जीवनात मी हजारो कीर्तनं ऐकले पण गाडगेबाबांसारखं दुसरं कीर्तन ऐकलं नाही आणि तसला बोलतो तसा वागलेला संत, महात्मा मी पाहिला नाही. जीवनात खऱ्या संतांची भेट झाली खरंच माझं जीवन धन्य झालं." 

          आता जुनी पिढी गेली. आजोबांनी सांगितलेली आठवण मी लिहून ठेवली होती. ती आपणासमोर जशास तशी मांडण्याचा प्रयत्न केला. अशा संतांच्या मार्गदर्शनामुळेच लोकांनी आपल्या मुलामुलींना शिकवलं. आज आमच्या गावात शिक्षक, प्राध्यापक, पोलीस अधिकारी तसेच विविध खात्यातील कर्मचारी, शिकलेले लोक मोठ्या प्रमाणात आहेत. जगद्गुरू तुकोबाचे वचन आहे, 
"काय सांगों आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥
काय द्यावें त्यांसी व्हावें उतराईं । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥
सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती ॥
तुका म्हणे वत्स धेनुवेचा चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥"

◾श्रीकृष्ण महाराज उबाळे 
◾मो. 9405344642

#गाडगेबाबा #संतगाडगेबाबा #स्वच्छतेचेप्रणेते #संतपरंपरा #सामाजिकप्रबोधन #स्वच्छगावसुंदरगाव #शिक्षणाचामहत्त्व #अज्ञानाविरुद्धलढा #खऱ्यासंताचीओळख #किर्तनपरंपरा #हरिनामसप्ताह #गावकथन #लोकसंत #समाजसुधारक #भारतीयसंत #प्रेरणादायीविचार #संतविचार #सामाजिकजागृती #महाराष्ट्राचाअभिमान #ग्रामसंस्कृती

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'