संत तुकाराम महाराज जन्म विशेष

◾अभंग तुकाराम-अखंड तुकाराम ◾

             वसंत पंचमीच्या पवित्र दिवशी, तारखेनुसार २ फेब्रुवारी १६०८ रोजी महाराष्ट्राच्या भूमीत एका विलक्षण आत्म्याचा जन्म झाला, तो म्हणजे संत तुकाराम महाराज. त्यांच्या जन्मतारखेबाबत मतभेद असले तरी त्यांच्या विचारांबाबत, त्यांच्या संतत्वाबाबत आणि त्यांच्या समाजपरिवर्तनाबाबत कुठलाही मतभेद नाही, कारण तुकाराम महाराज हे केवळ एका काळापुरते मर्यादित न राहता सर्व काळासाठी मार्गदर्शक ठरलेले महापुरुष आहेत. बोल्होबा व कणकई यांच्या पोटी जन्मलेले तुकाराम महाराज लहान वयातच आयुष्याच्या कठोरतेला सामोरे गेले. वडिलांचा मृत्यू, आईचा मृत्यू, मोठ्या भावाचे घरातून निघून जाणे, भावाच्या पत्नीचा मृत्यू आणि स्वतःच्या मुलाचा व पहिल्या पत्नीचा मृत्यू अशा भीषण दुःखांचा मारा त्यांच्या आयुष्यावर झाला, परंतु या दुःखांनी त्यांना मोडले नाही, उलट त्यांचे मन अधिक अंतर्मुख, अधिक संवेदनशील आणि अधिक भक्तीमय बनले. लहान वयातच त्यांच्या खांद्यावर संसाराचा मोठा भार पडला, व्यापाराची जबाबदारी, कर्जाचे ओझे आणि कुटुंबाची काळजी या सगळ्यांत अडकून असतानाही त्यांचे मन मात्र विठ्ठलाच्या चरणी स्थिर होते. म्हणूनच त्यांनी भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर यांसारख्या पवित्र स्थळी जाऊन चिंतन, मनन आणि ध्यान केले आणि भामचंद्र डोंगरावर त्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला, तो साक्षात्कार मूर्तीचा नव्हे तर सत्याचा, आत्म्याचा आणि निराकार परमेश्वराचा होता. विठ्ठल त्यांना अंतःकरणात भेटला आणि त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. पंधरा दिवसांच्या कठोर तपानंतर त्यांचे बंधू कान्होबा यांनी त्यांना शोधून काढून घरी आणले आणि घरी आल्यानंतर तुकाराम महाराजांनी सर्व लोकांचे कर्ज माफ करून एक ऐतिहासिक कार्य केले, म्हणूनच त्यांना जगातील पहिले कर्जमाफी करणारे संत म्हटले जाते. त्यांच्या या कृतीत दया, करुणा आणि समाजाविषयीची अपार बांधिलकी दिसून येते. त्यांची पत्नी जिजाबाई, ज्यांना ते प्रेमाने अवली म्हणत, संसाराच्या कडव्या वास्तवामुळे अनेकदा कठोर होत असली तरी तुकाराम महाराजांनी संसारात राहूनही भक्तीचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या सोबत १४ टाळकरी होते आणि त्यांनी पंढरपूरची वारी, विठ्ठल भक्ती, कीर्तन, भजन, नामस्मरण आणि शुद्ध आचरण यांचा प्रसार केला. त्यांनी विठ्ठलाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करणारे ते पहिले संत ठरले. संत नामदेव महाराज स्वप्नात येऊन त्यांना अभंग लिहिण्याची आज्ञा देतात आणि त्यानंतर तुकाराम महाराजांनी आपले जीवनानुभव, भक्ती, वेदना आणि सत्य यांचे शब्दरूप अभंगांमध्ये व्यक्त केले.
              त्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि ढोंगावर निर्भीडपणे प्रहार केला, त्यामुळे अंबाजी भट, सालोमालो भट आणि रामेश्वर भट यांसारख्या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचा छळ केला आणि रामेश्वर भटांनी त्यांच्यावर धार्मिक खटला भरून त्यांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवून  टाकण्याची शिक्षा दिली. या अपमानाने आणि वेदनेने तुकाराम महाराज अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी उपोषण केले, परंतु ईश्वर न्यायी असल्यामुळे अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यावर तरली आणि सत्याचा विजय झाला, त्यामुळे सामान्य समाज तुकाराम महाराजांच्या पाठीशी उभा राहिला. आजही शेकडो वर्षांनंतर संत तुकाराम महाराजांचे अभंग लोकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या निर्वाणाबाबत वेगवेगळी मते असली तरी एक गोष्ट निर्विवाद आहे की संत तुकाराम महाराज आपल्या अभंगांमधून, आपल्या विचारांमधून आणि आपल्या भक्तीमधून आजही जिवंत आहेत आणि आजच्या काळातील माणसालाही सत्य, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा मार्ग दाखवत आहेत, म्हणूनच संत तुकाराम महाराज हे केवळ संत नाहीत तर ते अखंड मानवतेचे आणि सत्याचे तेजस्वी दीपस्तंभ आहेत. 

"जगद्गुरु तुका अवतार नामयाचा l संप्रदाय सकळांचा  तेथूनिया ll"

संत तुकाराम महाराज जन्माच्या शुभेच्छा....!

जय जगद्गुरू 

◾श्रीकृष्ण महाराज उबाळे 
◾मो. 9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'