मन जिंकलं तर जग जिंकता येत

         ❤️अनुभव आले अंगा❤️
◾मन जिंकलं तर जग जिंकता येत◾

         कोरोनाचं लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झालं होतं. अनेक महिने घरात बंदिस्त असलेलं मन मोकळ्या श्वासासाठी आसुसलेलं होतं. शरीर बाहेर पडायला तयार होतं. अशा वेळी बीडमधील आमच्या देवराई ग्रुपमध्ये एक निर्णय झाला- 'यावेळी वासोटा किल्ला सर करायचा...!' वासोटा… सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात वसलेला अती दुर्गम वनदुर्ग. केवळ ट्रेकिंग नव्हे, तर इतिहासाशी थेट संवाद साधणारा अनुभव. निघायच्या आदल्या दिवशीच आम्ही मुक्कामी पोहोचलो. पहाटे लवकर उठून तयारी केली आणि शिवाजी सागर जलाशयातून बोटीत बसलो. कोयना धरणाच्या अथांग पाण्यावरून जाताना सभोवतालचं वातावरण विलक्षण गंभीर वाटत होतं. डोंगररांगा, पाण्यावर पडलेली सकाळची कोवळी ऊन आणि शांततेत मिसळलेला इतिहास.....मन नकळत शिवकाळात हरवून गेलं. वनविभागाच्या चेक पॉईंटवर पोहोचलो. प्लास्टिक बाटल्या, सामान यांची काटेकोर तपासणी झाली. कारण हे जंगल म्हणजे निसर्गाचं पवित्र मंदिर आहे. तिथून पुढे सुरू झाला खरा कसोटीचा प्रवास. जंगलातून वासोट्याकडे. एवढं घनदाट जंगल की सूर्यप्रकाशालाही आत येताना अडथळा येतो. दिवसा अंधार, शांतता आणि वळणावळणाचा अरुंद रस्ता. आमच्या टीममधील काहीजण पुढे निघून गेले. अर्ध्याहून अधिक अंतर चालून झाल्यावर मला जाणवलं की शरीराची सगळी ऊर्जा संपत चालली आहे. पाय जड झाले, श्वास वाढला. शेवटी मी वाटेच्या कडेला बसलो. “तुम्ही पुढे जा… मी इथेच थांबतो,” असं मित्रांना सांगितलं. मी थकलेल्या, सुकलेल्या चेहऱ्याने बसून होतो. वाटेने अनेक पर्यटक जात होते. बहुतेक तरुण मंडळी. तेवढ्यात माझ्या शेजारी एक आजी येऊन बसल्या. मी चौकशी केली. त्या बारामतीहून आलेल्या, वय पंच्याहत्तर वर्षे. पण चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि डोळ्यांत जिद्द होती. त्यांचं आडनाव शिंदे होतं. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि त्या पुन्हा उभ्या राहिल्या. मी विचारलं, “आजी, एवढा अवघड चढ… थकवा नाही येत का ? इतक्या वयात वासोटा चढताय ?”  आजी हसत म्हणाल्या, “तुम्हाला कोणी सांगितलं की मी म्हातारी आहे म्हणून ? वय वाढलेलं, वृद्ध झालेलं आहे पण मन नाही. मनानं मी अजून तरुण आहे.” हे शब्द ऐकून मी आतून हादरलो. मी शरीराने तरुण असूनही मनाने थकलो होतो. त्याच क्षणी माझ्या मनात वासोट्याचा इतिहास जागा झाला. १२व्या शतकात शिलाहार राजा भोज (दुसरा) याने उभारलेला हा किल्ला. १६५५ ते १६६० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या विजयानंतर हा किल्ला स्वराज्यात आणला. त्याच्या अत्यंत दुर्गम स्थानामुळे महाराजांनी याला “व्याघ्रगड” असे नाव दिले वाघासारखा पराक्रमी. कारण लोक सांगतात आजही त्या भागात वाघ दिसतात. शिवकाळात हा किल्ला सुरक्षित तुरुंग म्हणून वापरला जात असे. इंग्रज कैद्यांनाही येथे ठेवण्यात आलं होतं. इतकं अभेद्य ठिकाण की शत्रू सहज पोहोचू शकत नसे. आणि याच किल्ल्यावर १७०६ साली ताई तेलिणींचा पराक्रम घडला. शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्यावर संकटं घोंगावत असताना, पुरुषप्रधान युद्धभूमीत एका स्त्रीने वासोट्यासारखा दुर्ग ताब्यात घेतला. शत्रूशी सामना केला, किल्ला सांभाळला आणि इतिहासात आपलं नाव अजरामर केलं. ताई तेलिण म्हणजे केवळ एक स्त्री नव्हे, तर धैर्य, जिद्द आणि आत्मविश्वासाचं प्रतीक. मी आजीकडे पाहिलं… आणि मला वाटलं ही आजी म्हणजेच आधुनिक काळातील ताई तेलिण आहे. वयाने मोठी, पण मनाने अजूनही लढणारी. मी गंमतीने म्हणालो, “बारामतीची माणसं भलतीच करामती असतात. जेष्ठ नेते आदरणीय शरद पवारसुद्धा एवढ्या वयात थकत नाहीत.” आजी शांतपणे म्हणाल्या, “कुठल्या भागावरून काही नसतं. माणसाने न थकता कामं करीत रहायचं माणसाचा मार्ग आपोआप निघतो. थोडा थकवा आला तर विश्रांती घ्यायची… पण चालणं थांबवायचं नाही. मनातून हरलो, तरच माणूस हरतो. आपल्या आत खूप ताकद असते." हे शब्द माझ्या काळजावर कोरले गेले. मी उठलो… आणि चालू लागलो.
            जसं ताई तेलिणीने कठीण काळात हार मानली नाही, अजिही थकल्या नाहीत तसंच मीही मनाने उभा राहिलो. अवघ्या वीस-पंचवीस मिनिटांत मी पुन्हा मित्रांपर्यंत पोहोचलो. पुढे आम्ही वासोटा किल्ला सर केला. तोफांचे अवशेष, तटबंदी, उद्ध्वस्त इमारती सारं पाहिलं. १८१८ मध्ये इंग्रजांनी केलेल्या माऱ्याच्या खुणा आजही इतिहास सांगत होत्या. त्या किल्ल्यावर उभं राहून एकच जाणवलं वासोटा हा केवळ दगडांचा किल्ला नाही. तो मनाच्या लढाईचा दुर्ग आहे. त्या दिवशी मला दोन महान गोष्टी शिकायला मिळाल्या. एक, इतिहासातील ताई तेलिणींचा पराक्रम, आणि दुसरी, वाटेत भेटलेल्या एका पंच्याहत्तर वर्षांच्या आजीची जिद्द. वासोटा चढल्यावर एकच धडा मनात कोरला गेला तो म्हणजे मनानं हरायचं नाही. मनानं म्हातार व्हायचं नाही. थोडा थकवा आला तरी चालत राहायचं. कारण मन जिंकलं… तर वासोट्यासारखा दुर्गच नाही तर जगही सर करता येऊ शकतं. जगद्गुरू तुकोबांनी सांगिलेलं आहे,
 "मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥"
 सर्व गोष्टी मिळवण्याचे प्रमुख साधन म्हणजे प्रसन्न, समाधानी मन होय .

◾श्रीकृष्ण महाराज उबाळे
◾मो. ९४०५३४४६४२

#वासोटा #वासोटाकिल्ला #व्याघ्रगड #मनजिंकणाऱ्यांचादुर्ग #सह्याद्री #कोयना #कोयनाअभयारण्य #ट्रेकिंगप्रेम #दुर्गभ्रमंती #दुर्गयात्रा #शिवराय #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वराज्य #मराठाऐतिहास #ताईतेलिण #इतिहासाचीपाऊले #प्रेरणा #जिद्द #मनाचाबळ #मनजिंकलंतरजगजिंकलं #जीवनप्रवास #अनुभवकथन #मराठीलेखन

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'