बलिदानाचा अर्थ
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्यावर एक *मालिका वात्रटिका* सादर करतोय. आपणास आवडल्यास नक्की शेअर करा.....!!
*बलिदानाचा अर्थ*
रोज नव्या बुवा बापूचा
चमत्कार इथे घडतोय
साऱ्या व्यवस्थेचा मेंदू
यामुळेच तर सडतोय
कधी येईल विवेकाला जाग ?
हा प्रश्न मनाला छळतोय
डॉक्टर तुमच्या बलिदानाचा
अर्थ कुणाला कळतोय ?
ज्यांनी धर्म शिकवायचा
त्यांची आज शरम वाटते
ज्यांच्यामुळे शांती यावी
त्यांची मनात भीती दाटते
त्यागाचा मुकुटमणी व्हावा
तो नको तिथे लोळतोय
डॉक्टर तुमच्या बलिदानाचा
अर्थ कुणाला कळतोय ?
सत्य असत्य पाहण्याची
कुठे भक्तांना शुद्ध असते?
आमच्याच बांधवांशी
आमचे खुले युद्ध असते
सारा देश अभक्तांनी
इथून तिथून जळतोय
डॉक्टर तुमच्या बलिदानाचा
अर्थ कुणाला कळतोय ?
तुकारामांच्या भाषेत बुडणारे
डोळ्यांनी पाहवत नाही
उगाच शांत बसावे
हे मनाला राहवत नाही
तुमच्या मार्गाने जाणाऱ्यांना
इथला अधर्म गिळतोय
डॉक्टर तुमच्या बलिदानाचा
अर्थ कुणाला कळतोय ?
लोकांना विचाराने येणार नाही
निदान दुष्कृत्यांने जाग येईल
आपण किती भाबडे आहोत
याचाही कधी राग येईल
नाहीतर कुत्रं पीठ खातंय
आंधळा आपला दळतोय
डॉक्टर तुमच्या बलिदानाचा
अर्थ कुणाला कळतोय ?
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका.....!!!
Comments
Post a Comment