राजवीर कोकाटचे जेईई ऍडव्हान्सड परीक्षेत यश देशात 32वा

◆●ड्रायव्हरचा मुलगा ठरला बीडचा अभिमान; जेईई ऍडव्हान्सड परीक्षेत देशात ३२वा क्रमांक●◆

अपंगत्वावर मात करत राजवीर कोकाटची आयआयटीत भरारी

◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
बीड – कष्ट करणाऱ्या आई-वडिलांच्या संघर्षातून उभं राहिलेलं एक स्वप्न... आणि त्या स्वप्नाला यशाच्या आकाशात भरारी देणारा राजवीर भरत कोकाट हा बीड जिल्ह्यातील एक विद्यार्थी. मूळ गाव गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथून आलेल्या राजवीरने जेईई ऍडव्हान्सड परीक्षेत अपंगांच्या खुल्या प्रवर्गातून संपूर्ण भारतात ९३वा तर अपंगांच्या इतर मागास प्रवर्गातून देशातून ३२वा क्रमांक पटकावत बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उज्वल केलं आहे. राजवीरचा प्रवास हा खरोखर प्रेरणादायी आहे. एका हाताने अपंगत्व असूनही त्याने कधीही हार मानली नाही. अभ्यासात सातत्य राखत तो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्याचे प्राथमिक शिक्षण ठाकर आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत झाले. त्यानंतर दहावीचे शिक्षण बीडमधील यशवंत विद्यालय येथे पूर्ण करत ७८ टक्के गुण मिळवले. बारावीचे शिक्षण त्याने साक्षाळपिंपरी कनिष्ठ महाविद्यालय येथे घेत ७९ टक्के गुणांची कमाई केली.
बीडमध्येच राहून त्याने जेईईची तयारी केली. मेन्समध्ये ९० परसेंटाइल मिळवल्यानंतर त्याने आपले लक्ष ऍडव्हान्सड परीक्षेकडे केंद्रित केले आणि अखेर यशाची शिखरं गाठली. या प्रवासात प्रा. राम सर, जोशी सर, आणि नप्ते सर यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले. राजवीर म्हणतो "मी १ ली ते ७ वीपर्यंत मराठी माध्यमात, आपल्या गावी जिल्हा परिषद शाळेतच शिकलो. आज मी जेईई ऍडव्हान्सडमध्ये देशात ३२वा आलो, ते फक्त शाळा कुठली आहे यावर नाही, तर आपण अभ्यास किती मन लावून करतो यावर ठरतं. माध्यम कोणतं आहे, यापेक्षा मेहनत, सातत्य, आणि समजून घेऊन अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं असतं. गावाकडची शाळा, मराठी माध्यम, अपंगत्व – या गोष्टी अडथळे वाटू शकतात, पण त्या यशाला थांबवू शकत नाहीत. जिद्द असेल, तर यश नक्की मिळतं.

राजवीर सध्या आयआयटी मुंबई किंवा दिल्ली येथील कम्प्युटर सायन्स (AI) शाखेत प्रवेश घेण्याच्या तयारीत आहे. सुंदर पिचाई यांना तो आपले आदर्श मानतो. “आई-बाबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवावं” हे त्याचं बालपणीचं स्वप्न होतं – आज ते स्वप्न सत्यात उतरल्याचं समाधान त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसतं.

त्याची आई अर्चना कोकाट या १२ वीपर्यंत शिकलेल्या असून बीड शहरातील मुलींच्या वसतिगृहात मेस चालवतात. वडील भरत कोकाट हे पदवीधर असून खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. शिक्षणाची ओढ आणि मुलांचं भविष्य उज्वल व्हावं या हेतूने कोकाट कुटुंब बीडमध्ये रहायला आले. मिळेल ते काम करून मुलांच्या गरजा भागवल्या. राजवीरच्या यश हा केवळ एका मुलाचा विजय नाही, तर तो ग्रामीण भागातील इच्छाशक्ती, अपार मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा विजय आहे.

चित्रकलेतही निपुण:

"राजवीर केवळ अभ्यासातच नव्हे, तर चित्रकलेतही पारंगत आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराज, महादेव, निसर्गदृश्ये आणि विविध क्रिकेटपटूंची सुंदर चित्रे रेखाटली आहेत."


 प्रतिक्रिया:

"माझं स्वप्न होतं – आई-बाबांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुलावं. लहानपणापासून आर्थिक अडचणी, अपंगत्व, गावाकडची शाळा – सगळं होतं, पण मी कधी हार मानली नाही. मी अपंग आहे, पण माझी जिद्द आणि मेहनत कायम पूर्ण ताकदीनं वापरली. जेईई ऍडव्हान्समध्ये देशात ३२वा क्रमांक मिळवणं ही माझ्यासाठी नव्हेच, तर माझ्या आईबाबांसाठी मिळवलेली भेट आहे. आता माझं पुढचं स्वप्न आहे – आयआयटीत जाऊन कम्प्युटर सायन्स आणि AI मध्ये अभ्यास करायचा आणि एक दिवस सुंदर पिचाईसारखं काहीतरी मोठं करायचं."

-राजवीर कोकाट

"पोरानं लहानपणापासूनच थोडं वेगळं काही करायचं म्हणतंय हे जाणवत होतं. अपंगत्व त्याने कमजोरी न मानता ताकत मानून अभ्यास केला. त्याने कधी मागं वळून पाहिलं नाही. आम्ही मेसमध्ये  कष्ट केले, तर त्यातून त्यानं पुस्तकं मागवली. आज जेव्हा सांगतो की आयआयटीला जायचंय, तेव्हा मन भरून येतं. आयआयटी काय असतं हे समजत नाही पण पोरानं खास केलंय हे समजतं. गरीबीत पोरगं शिकलं, तेच खऱ्या अर्थानं आमचं सोनं झालं!"

- अर्चना कोकाट, आई
"ड्रायव्हिंग करताना रोज मनात एकच विचार यायचा – पोरगं मोठं होऊ दे. गाड्या चालवताना थकतो, पण राजवीरच्या अभ्यासाची बातमी ऐकली की सगळा थकवा पळून जातो. आमचं पोरगं देशात ३२व्या क्रमांकानं पास झालं... ह्याहून मोठा दिवस नाही आमच्या आयुष्यात...!"

-भरत कोकाट, वडील

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'