फक्त करिअर नाही, माणूस घडवा...मुलांना जगुद्या......!!
"फक्त करिअर नाही, माणूस घडवा...मुलांना जगुद्या......!!"
◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642
आजच्या शिक्षणाच्या स्पर्धेत आपण एक महत्त्वाचा मुद्दा विसरतोय — आपलं मूल माणूस आहे, मशीन नाही! आज IIT, NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षांनी कित्येक मुलांचे भवितव्य सरळ न करताच, वाकडं केलं आहे. परीक्षा फक्त ज्ञानाची कसोटी नसून, ती अनेकदा मुलांच्या मानसिक आरोग्याचीही परीक्षा ठरते. पालक, शिक्षक आणि समाज यांचं एकच स्वप्न — "माझं मूल इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावं." पण का? मुलांची खरी क्षमता, त्यांची आवड, त्यांचं वेगळेपण का स्वीकारत नाही आपण? फक्त दोनच क्षेत्रं भवितव्य घडवतात का? साधना भोसले. डॉक्टर होण्यासाठी धडपडत होती. पण तिला हे क्षेत्र झेपलं नाही. तिच्यावर लादलेलं स्वप्न तिच्या वडिलांनी लाकडाच्या दंड्याने मोडून टाकलं — तिला मारूनच टाकलं. का? कारण तिला 'डॉक्टर' होणं जमलं नाही. पण ती जर डॉक्टर झाली नसती, तरी ती 'काहीतरी' झाली असती — एक चांगली शिक्षक, लेखिका, कलाकार, शास्त्रज्ञ किंवा समाजसेविका किंवा चांगली गृहिणी झाली असतीच ना...! तिच्या अस्तित्वालाच आपण नाकारलं. लातूरमध्ये मागील वर्षी १० ते १५ मुलांनी आत्महत्या केल्या. बीडमधील शिंगणे नावाच्या नीट टॉपरनेही आत्महत्या केली होती. टॉपर असूनसुद्धा... कारण यशाच्या शिडीवर चढताना मानसिक आरोग्य रसातळाला गेलं होतं. शिक्षक वर्ग क्लासेस चालवतो, पालक त्यामागे धावतात, आणि मूल? ते फक्त एक यंत्र बनतं — निकाल देणारा मशीन. क्लासेसमधील रॅटरेसमध्ये मुलांच्या बालपणाचा आणि माणूसपणाचा गळा घोटला जातो. कोणताही विचार न करता प्रत्येकाला स्पर्धेच्या रणांगणात ढकललं जातं. पालकांनो, आपलं मूल तुमचं स्वप्न पूर्ण करायला जन्माला आलं नाही. ते त्यांच्या स्वतःच्या क्षमतेनुसार, त्यांना योग्य वाटणाऱ्या वाटेवर चालेल — त्यांना चालू द्या. त्यांच्यावर आपल्या अपूर्ण आकांक्षांचं ओझं लादू नका. कारण क्षमतेपेक्षा जास्त ओझं झालं की, पाठीचा कणा तुटतो. तरुण वयात मुलं मोडून पडतात — कायमची. फक्त इंजिनिअर किंवा डॉक्टर म्हणजेच यशस्वी भवितव्य नाही. क्लासेस, टॉपर, रँक, कटऑफ — ही भिकार मानसिकता बदलली पाहिजे. मुलांना जगू द्या, त्यांच्या क्षमतेनुसार घडू द्या. शेवटी एकच सांगावंसं वाटतं — करिअर नसलं तरी चालेल, पण मूल जिवंत राहिलं पाहिजे.
शब्दांकन:
◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642
#माणूसघडवा_करिअरनंतर
#मुलांनास्वतंत्रजगूद्या
#स्पर्धेचंओझं
#पालकांनीबदलायला हवं
#IIT_NEET_चा_ताण
#शिक्षण_की_मनःस्वास्थ्य
#करिअरपेक्षा_जीवमहत्वाचा
#फक्तडॉक्टरइंजिनिअरनको
#आवडीनुसारकरिअर
#शिक्षणनव्हेसंवेदनशून्यता
#MentalHealthMatters
#YouthSuicideAwareness
#StudentsUnderPressure
#StopAcademicPressure
#LetThemLiveAndGrow
#मुलांचं_मन_वाचूया
#स्वप्ननको_संवेदना_पाहिजे
#लातूर_बीड_कथा
#शब्दांकन_श्रीकृष्णउबाळे
Comments
Post a Comment