मारुती चितमपल्ली – निसर्गाची भाषा बोलणारे अरण्य'ऋषी'
मारुती चितमपल्ली – निसर्गाची भाषा बोलणारे अरण्य'ऋषी'
◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
आज, १८ जून २०२५ रोजी, महाराष्ट्राने आणि मराठी भाषेने आपला एक अजरामर साहित्यिक, निसर्गप्रेमी आणि भाषावैज्ञानिक हरवला आहे. मारुती चितमपल्ली हे नाव म्हणजे जंगलाची कुजबुज, पक्ष्यांची गूजगोष्टी, आणि मराठी भाषेचं लखलखीत सौंदर्य. त्यांचे साहित्य हे निसर्गाच्या हृदयाची भाषा आहे.
◆जन्म व बालपण :
मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूरला झाला. बालपणी झाडं, पक्षी, प्राणी हे त्यांचे मित्र झाले, आणि निसर्ग हेच त्यांचं पहिलं विद्यालय ठरलं.
◆त्यांचं शिक्षण :
शालेय शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांनी कृषी विज्ञान या शाखेत पदवी घेतली. पण त्यांची खरी आवड होती – वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. त्यांचे अभ्यासक्षेत्र होते ‘निसर्ग आणि त्याचे अनेक पैलू.’ शिक्षण पूर्ण करून त्यांनी आयुष्यभर निसर्गाच्या भाषेचा शोध घेतला.
◆नोकरी व सेवा कारकीर्द :
शिक्षण पूर्ण करून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली. त्यांची नोकरी म्हणजे केवळ प्रशासन नव्हे, तर एक तीर्थयात्रा होती – वन्यजीवांच्या रक्षणासाठी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी. त्यांनी ताडोबा, नवेगाव, पेंच, मेलघाट अशा अनेक अभयारण्यांमध्ये कार्य केलं. झाडांशी बोलत, प्राण्यांची भाषा समजत, आदिवासींच्या संस्कृतीशी एकरूप होत त्यांनी वनविभागात एक पायाभूत कार्य उभं केलं.
◆वन्यजीव व वनस्पती अभ्यासासाठी जीवन समर्पित – जगभर ख्याती :
मारुती चितमपल्ली यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात वन्यजीव व वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासक म्हणून नाव कमावलं. त्यांची निरीक्षणशक्ती आणि संवेदनशीलता यामुळे त्यांचे नोंदी, टिपणं, आणि लेख यांना शास्त्रीय महत्त्व प्राप्त झालं. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिसंवादात भारताचं प्रतिनिधित्व केलं.
ते म्हणत – "निसर्ग हा गुरू आहे, माणूस त्याचा शिष्य असावा."
◆लेखण आणि पुस्तके :
आपल्या अनुभवांना त्यांनी शब्दरूप दिलं. त्यांची भाषा होती – सहज, चित्रदर्शी आणि भावस्पर्शी.
निसर्गाचे गूढ ते शब्दांत उतरवू शकतील असा लेखक मराठी साहित्यात दुर्मिळ. त्यांनी लिहिलेली काही महत्त्वाची पुस्तकं:
आनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी), (२००२)
चकवाचांदण : एक वनोपनिषद, (आत्मचरित्र)
रातवा, (१९९३), (१९९३-९४चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार)
नवेगाव बांधचे दिवस
आपल्या भारताचे साप
केशराचा पाऊस
घरट्यापलीकडे, (१९९५)
चित्रग्रीव - एका कबुतराची कथा
चैत्रपालवी, (२००४)
जंगलाची दुनिया (२००६)
निळावंती, (२००२)
निसर्गवाचन
पक्षिकोश, (२००२)
पक्षी जाय दिगंतरा, (१९८३)
मृगपक्षिशास्त्र, (१९९३)
शब्दांचं धन, (१९९३)
सुवर्णगरुड, (२०००)
रानवाटा, (१९९१), (१९९१-९२चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार), (भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)
जंगलाचं देणं, (१९८५) (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९८९), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-१९९१)श
त्यांनी सुमारे ५० हून अधिक पुस्तकं लिहिली, जी आजही अभ्यासक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींना मार्गदर्शन करतात.
◆पद्म पुरस्कार :
२०२५ साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ या सन्मानाने त्यांना गौरवलं. ही केवळ त्यांच्या लेखनाची नव्हे, तर निसर्गविज्ञान आणि पर्यावरण संवर्धनातील कार्याची राष्ट्रीय पातळीवरील पावती होती.
◆मराठी भाषेला लाखापेक्षा जास्त नवे शब्द दिले :
चितमपल्ली हे मराठी भाषेचे शब्दशिल्पकार होते.
जंगलातील विविध वनस्पती, पक्षी, प्राणी यांना त्यांनी मराठीत नावे दिली. त्यांच्या प्रयत्नांतून सुमारे १ लाखाहून अधिक नवे शब्द मराठीत रूढ झाले – हे एक अद्वितीय कार्य आहे. पक्ष्यांच्या आवाजांचं लिपीकरण करणारे, प्राण्यांच्या हालचाली शब्दबद्ध करणारे ते पहिले साहित्यिक होते.
◆मृत्यू – आज, १८ जून २०२५ :
आज, सोलापूर त्यांच्या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य निसर्गाला अर्पण करून आपली भूमिका पूर्ण केली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य, निसर्गविज्ञान, आणि पर्यावरण चळवळीचं एक युग संपलं आहे. मारुती चितमपल्ली हे नाव म्हणजे शब्दांची झाडं, विचारांचे पक्षी, आणि संवेदनांचे अरण्य. ते गेले, पण त्यांच्या लेखणीतील पानांवर अजूनही वारा फिरतो, पानांचं कुजबुजतं संगीत ऐकू येतं, आणि मन म्हणतं –
“चितमपल्लींचा निसर्ग अजून जिवंत आहे – आपल्या हृदयात, आपल्या भाषेत.”
लेखण व संकलन:
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642
Comments
Post a Comment