जिद्दीचा विक्रम: डॉ. संजय जानवळे यांनी गाठले जागतिक यश
जिद्दीचा विक्रम: डॉ. संजय जानवळे यांनी गाठले जागतिक यश
‘कॉम्रेड मॅरेथॉन’ या अतिशय कठीण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ९० कि.मी. पल्ला गाठून ठरले 'रण'वीर
◆श्रीकृष्ण उबाळे,बीड
◆मो.9405344642
बीड:- बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी आपल्या ध्येयवेड्या प्रवासाने संपूर्ण मराठवाड्याचे नाव जागतिक व्यासपीठावर झळकावले आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ या अतिशय कठीण व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ९० किलोमीटरचा खडतर पल्ला अवघ्या ११ तास ३७ मिनिटांमध्ये पूर्ण करत इतिहास रचला. जगभरातील ७० देशांतील तब्बल २३,००० धावपटूंमध्ये चमकदार कामगिरी करत त्यांनी पीटरमारीत्जबर्ग ते डर्बन असा चढउताराने भरलेला रस्ता पार केला. या स्पर्धेत बीडच्या डॉ.विश्वास गवते, हरिभाऊ ठोंबरे यांनीही सहभाग घेतला होता. ही स्पर्धा केवळ शरीराची नव्हे, तर मनाचीही परीक्षा घेणारी होती. या थरारक क्षणांचे वर्णन करताना डॉक्टर म्हणाले, "धावताना प्रत्येक पावलाला एक नवा आव्हान वाटत होता, पण मनात फक्त एकच गोष्ट होती – हार मानायची नाही."
◆डॉक्टरांचा अनोखा प्रवास:
डॉ. जानवळे हे केवळ एक कुशल बालवैद्य नाहीत, तर एक कडवट मेहनती व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वही आहेत. वैद्यकीय व्यवसायाच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत दररोज सकाळी नियमित धावण्याचा सराव करून त्यांनी आपल्या धावण्याच्या छंदाला आकार दिला. त्यांच्या मेहनतीमुळेच ते आज कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणारे मराठवाड्यातील एकमेव धावपटू ठरले. बीडच्या गुड मॉर्निंग ग्रुप आणि जिल्हा क्रीडा संकुलाच्या वतीने १२ जून रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अनुभव ऐकताना टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कामगिरीला सलाम केला.
◆वय हा केवळ आकडा – ५०व्या वर्षी दिला नवा पैलू :
डॉ. जानवळे यांनी सिद्ध केले की वय, सामाजिक प्रतिमा, व्यवसाय या साऱ्या गोष्टी ध्येयाच्या आड येत नाहीत. अनेकजण त्यांच्या धावण्याकडे कौतुकाने, तर काहींनी उपहासाने पाहिले. पण ध्येयवेड्या माणसांचेच इतिहास घडतात, हे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले. डॉ. जानवळे हे आज बीडच्या जिद्दीची ओळख बनले आहेत. त्यांनी ज्या प्रकारे जागतिक स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवले, ते नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा देणारे आहे. त्यांनी दाखवून दिले की, स्वप्नं पाहायची फक्त झोपेत नाही – ती पूर्ण करण्यासाठी धावायचंही लागतं.
◆शेवटी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर एवढेच म्हणावे लागेल-
"ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥
नव्हे ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरि ॥ध्रु.॥
दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥२॥
तुका म्हणे कैंचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकीं ॥३॥
एखाद्या झाडाचे ओले मूळ ज्याप्रमाणे खडकाचे अंग भेदते. त्या प्रमाणे जर आपण चंगल्या प्रकारे अभ्यास म्हणजे सराव, प्रयत्न केला तर त्याच्या जीवावर कोणतेही कार्य सिद्धीस नेता येते. जगात काहीही अवघड नाही फक्त जो पर्यंत आपण त्या विषयी सुरुवात करत नाही तो पर्यंत गोष्ट अवघड वाटते. आहो सध्या दोऱ्याच्या घर्षणाने मोठ्या दगडाला चिरता येते. जर आपण थोडे थोडे, हळू हळू विष खाल्ले तरी ते पचनी पडते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, "गर्भाशयामध्ये बाळाला बसण्यासाठी एकाएकी जागा असते का ? बाळ नऊ महिने प्रयत्नपूर्वक छोट्या गर्भाशयात स्वतःसाठी यावश्यक एवढी जागा हळूहळू तयार करतेच." प्रयत्न, सराव आणि अभ्यास यातून कठीणातील कठीण गोष्ट साध्य होते एवढेच आपण डॉक्टरकडे पाहून म्हणू शकतो.
डॉक्टर साहेबांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा....!!
◆श्रीकृष्ण उबाळे,बीड
◆मो.9405344642
Comments
Post a Comment