रिक्षातून स्वप्नांच्या रुग्णालयात- सुमीत बरदाडेची प्रेरक यशोगाथा-नीट परीक्षेत ५११ गुण

रिक्षातून स्वप्नांच्या रुग्णालयात- सुमीत बरदाडेची  प्रेरक यशोगाथा

बीड तालुक्यातील जाधववाडी गावातील बनणार पहिला 'डॉक्टर'

◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642


बीड:  स्वप्नं मोठी पाहायची, कारण तीच आपल्याला आयुष्याच्या पुढच्या थांब्यावर पोहोचवतात..कधी कधी, मोठ्या शहरात नाही, तर एखाद्या छोट्याशा गावात एक मोठं स्वप्न उगवतं...जसं नाव जाधववाडी. बीड तालुक्यातील च-हाटा ग्रामपंचायतीमधील हे छोटंसं, पण जिद्दी स्वप्न असलेलं गाव. आणि इथलंच एक तेजस्वी स्वप्न म्हणजे — सुमीत संजय बरदाडे. सुमीतचे वडील संजय बरदाडे यांचे शिक्षण बारावीपर्यंत. आई अर्चना ताईंचं शिक्षण दहावीपर्यंत. घरात शेती थोडीशीच. जगायचं कसं? तर वडील दिवसभर आपल्या आप्पे रिक्षावर लोकांना ने-आण करत राहतात. स्वप्न कोणतं होतं? घरातला मुलगा एक दिवस डॉक्टर व्हावा...शेवटच्या गावातल्या रुग्णालाही हाक मारणारा, दिलासा देणारा डॉक्टर. कदाचित रिक्षाच्या आवाजातच सुमीतने जिद्द ऐकली...आणि वडिलांच्या घामातच स्वतःचं भवितव्य पाहिलं. शाळा गावी, अभ्यास मनापासून केला. सुमीतचं शिक्षण सुरू झालं जि.प. प्राथमिक शाळा, जाधववाडी इथून. पाचवीपर्यंत त्याने गावातच शिक्षण घेतलं. सहावीसाठी गेला च-हाटा येथील महात्मा फुले विद्यालयात. सातवी ते दहावी झाली श्री शिवाजी विद्यालय, बीड मधून. १० वीला ९५.४०% गुण मिळवले. ग्रामीण भाग, मराठी माध्यम, साधी शाळा…पण अभ्यास? प्रामाणिक आणि एकाग्र. दहावीत असं जबरदस्त यश मिळवलं.  सुमीतने बारावी केली पाटोदा हायस्कूल, बेलखंडी, पाटोदा येथून.११वी–१२वी मध्ये ८५% गुण मिळाले. इथेही त्याने आपली गुणवत्ता टिकवली. एका ग्रामीण मुलाचा संघर्ष, हळूहळू यशात बदलत गेला. वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा NEET या  परीक्षेत — ५११ गुण मिळवून  "ग्रामीण भागात शिकून डॉक्टर होता येतं का?" हा प्रश्न विचारणाऱ्यांना आज तो एक उत्तर बनला आहे. NEET परीक्षेत ५११ गुण मिळवत All India Rank: 40,125 अशी आहे. तर EWS (आर्थिक दुर्बल घटकातून): 4888 रँक मिळवली आहे. महाराष्ट्रातील इ.एस.बी.सी. (मराठा आरक्षण) याची रँक आणखी वर जाईल. ही रँक फक्त संख्या नाही, ही घरातून रिक्षात बसून कॉलेजकडे निघालेल्या स्वप्नांची चाल आहे.

◆सुमीतच्या या यशातून एक स्पष्ट संदेश मिळतो:

मराठी माध्यमात शिकूनही यश सहज शक्य आहे.
NEET सारख्या मोठ्या परीक्षेसाठी आपले पालक श्रीमंत वैगेरे गरजेचे नाहीत, तर इच्छाशक्ती हवी.
मुलांनी पुस्तकं वाचायची नाही, ती समजून घ्यायची असतात.
मोठं व्हायचं स्वप्न प्रत्येकालाच बाळगण्याचा अधिकार आहे.
◆सुमीतचं स्वप्न खूप साधं पण अत्यंत मोठं आहे:

"शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घ्यायचं आणि आपल्या सारख्या गावातल्या रुग्णांची सेवा करायची." सध्याच्या यशात स्वतःच समाधान असलं, तरी सुमीतचं अंतिम ध्येय आहे- ग्रामीण रुग्णांसाठी एक आधारवड होणं. आज सुमीत ज्या पायरीवर उभा आहे, ती पायरी संपूर्ण जाधववाडी गावासाठी प्रेरणा आहे. एक रिक्षाचालकाचा मुलगा डॉक्टर होणार..!सुमीत बरदाडेसारखी मुलं ही मराठवाड्याच्या मातीतली खरी प्रेरणा आहेत. सरकारी शाळा, ग्रामीण कॉलेज, साधं शिक्षण… पण मोठा आत्मविश्वास. ही गोष्ट फक्त सुमीतची नाही, ही हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांची शक्य होणारी स्वप्नकथा आहे.

◆प्रतिक्रिया:

"मी एक रिक्षाचालक... रस्त्यावर धावणारा माणूस. पण माझ्या मुलाचं स्वप्न मोठं होतं — डॉक्टर होण्याचं. मी दिवसभर रिक्षा चालवली, अनेकदा जेवण नसायचं, तरी सुमीतचा अभ्यास थांबवला नाही. त्याला हवं ते पुस्तक आणून दिलं, स्वतः घाम गाळला, पण त्याला शिक्षणाची उणीव भासू दिली नाही. आज जेव्हा तो डॉक्टर होतोय, तेव्हा वाटतं… माझ्या रिक्षेला दिशा मिळाली. आज मी गरीब नाही, मी ‘सुमीतचा बाप’ आहे… आणि हाच माझा सर्वात मोठा मान...!"

-संजय बरदाडे, वडील

"मी फक्त एकच ठरवलं होतं – परिस्थितीवर नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवायचा. आई-बाबांनी माझ्यासाठी जे कष्ट घेतले, त्याची किंमत मी यशाने फेडायची, हीच माझी जिद्द होती. मी दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलो, पण कधीही कमीपणा वाटू दिला नाही. मी खूप मोठ्या शहरात राहिलो नाही तर मेहनत केली. डॉक्टर होणं हे माझं एकट्याच स्वप्न नव्हतं, ते माझ्या घराचं स्वप्न होतं… आणि आता ते प्रत्यक्षात उतरतंय. सर्वांना माझं एकच म्हणणं आहे की मुलांवर खूप लहानपणापासून दडपण, ताण देऊ नका. पाया पक्का केल्यानंतर अकरावी, बारावीला मन लावून अभ्यास केला तरी सहज यश मिळवू शकतो."

-सुमीत बरदाडे, नीट, यशस्वी विद्यार्थी

◆श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642

#रिक्षातूनडॉक्टरपर्यंत
#सुमीतबरदाडे
#ग्रामीणयशोगाथा
#मराठीविद्यार्थ्याचीशक्ती
#NEETयशोगाथा
#मराठीमाध्यमाचाआत्मविश्वास
#जाधववाडीचागौरव
#डॉक्टरसुमीत
#प्रेरणादायीविद्यार्थी
#सततझगडणारेस्वप्न
#रिक्षाचालकाचागौरव
#शिकूनमोठंहोता
#ग्रामीणभारताचाविजय
#साधेपणातमोल
#स्वप्नांच्यापाठीमागेजिद्द
#सर्वसामान्यांचासुपरहीरो
#मराठवाडयाचापराक्रम
#पालकांचासन्मान

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'