वैभवी देशमुख – अश्रूंमधून उभं राहिलेलं यश

वैभवी देशमुख – अश्रूंमधून उभं राहिलेलं यश

बारावीला ८५%  तर निटमध्ये मिळवली पात्रता

◆ श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642


महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव – मस्साजोग...! इथूनच जन्माला आली एक मुलगी – वैभवी देशमुख......! आई-वडिलांचं आर्जव, गावकऱ्यांचा जीव की प्राण असलेले सरपंच संतोष देशमुख यांची लाडकी लेक. पण नियतीनं क्रूर खेळ मांडला...एक दिवस अचानकच एक हृदयद्रावक घटना घडली – संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. महाराष्ट्र हादरला. संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त झाली. पण या काळोख्या घटनेच्या सावलीतही एक तेजस्वी दिवा शांतपणे पेटलेला होता – वैभवी. आईचं अश्रूंनी ओथंबलेलं पदर, समाजाचं सांत्वन, पोलिस चौकशी, कोर्ट-कचेऱ्या…हे सगळं चालू असतानाही वैभवीच्या हातात कायम एक पुस्तक होतं. दोन तासांचा अभ्यास तिनं एका मिनिटासाठीही थांबवला नाही. वडिलांच्या चेहऱ्याचं शेवटचं स्मरण हृदयात साठवून तिनं आपली ध्येयशक्ती दुपटीनं वाढवली. वडिलांना न्याय मिळावा म्हणून ती प्रत्येक आंदोलनात, मोर्चात पुढे होती. आणि घरी आल्यावर पुन्हा शांतपणे अभ्यासाच्या पुस्तकात डोकं खुपवायची. कितीही अश्रू आले तरी त्या डोळ्यांत एकच चमक होती – “मी डॉक्टर होणार...! आज त्या जिद्दीचं फळ तिला मिळालं आहे. बारावी विज्ञान शाखेत ८५.३३% गुण आणि NEET परीक्षेत यशस्वी कामगिरी ही फक्त वैभवीची यशोगाथा नाही,ही आहे एका मुलीची श्रद्धांजली तिच्या वडिलांना, ही आहे मुलीच्या शिक्षणावर ठेवलेल्या विश्वासाची जिंकलेली लढाई, ही आहे मुलगी वाचली तर घर नव्हे, संपूर्ण गाव उजळू शकतं याचा ठोस पुरावा. ती डॉक्टर होणार आणि हे यश हे तिच्या दिवंगत वडिलांसाठी – त्यांच्या आठवणींसाठी समर्पित आहे. मोर्चे, आंदोलनं, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून आक्रोश करतानाही तिने पुस्तकांची साथ कधीच सोडली नाही. ती आहे नुसती विद्यार्थिनी नाही – ती आहे एक योध्दा...! संत तुकाराम महाराज म्हणतात-

"ओले मूळ भेदी खडकाचे अंग l 
अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी ll
नव्हे ऐसे काही नाही अवघड l 
नाही कैवाड तोचि वरी ll"

◆अभिनंदनापेक्षा न्याय हवा आहे :


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीचं कौतुक केलं, तिच्या कष्टांना सलाम केला, मदतीची आश्वासनंही दिली...! पण... एक मुलगी मनात एकच प्रश्न घेऊन जगते आहे – “माझ्या वडिलांचे खुनी अजून जिवंत का आहेत?” शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, डॉक्टरही होईल ती, पण तिच्या यशाला खरी मान्यता तेव्हाच मिळेल जेव्हा तिच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशी दिली जाईल. फुलं, टाळ्या, आश्वासनं... या क्षणिक गोष्टी आहेत, पण न्याय – तोच खरा आधार असतो एका पोरकी झालेल्या लेकीसाठी. वैभवी हसते, पण डोळ्यांत एक हक्काचा प्रश्न सतत रेंगाळतो – "ज्यांनी माझ्या आयुष्याचा आधार हिरावून घेतला, त्यांना शिक्षा कधी?"

◆गुन्हेगारांना फासावर लटकवणे – हाच तिच्या यशाचा खरा सन्मान ठरेल" :

फाशी ही केवळ शिक्षा नाही, ती समाजाला दिलेली एक इशारा असेल, की वैभव्या सारख्या मुलींच्या वडिलांना मारणाऱ्यांचा शेवट इतकाच ठरतो.

◆आज वडील असते तर...!:


वैभवीचं अंतर्मन मी यश मिळवलं, मी डॉक्टर होणार...लोक टाळ्या वाजवतायत, अभिनंदन करतायत...माझ्यावर लेख लिहिताहेत पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही शांत नाही झालेला आर्त आवाज आहे...! आज तिचे बाबा जीवंत असते, तर मला पहिल्यांदा मिठी त्यांनीच मारली असती, NEET च्या निकालानंतर माझ्या डोळ्यांतलं पाणी त्यांनीच टिपलं असतं. ते असते, तर मला अभ्यासासाठी शांत वातावरण मिळालं असतं, मोर्चे, कोर्ट, बातम्या, राजकारण या सगळ्यांपासून मी दूर राहिले असते…! कदाचित 551 नव्हे, त्याहूनही जास्त गुण मिळवले असते! पण आता माझं यश अपूर्ण वाटतं… मी हसते, पण आतून ओलसरते…कारण वडीलांच्या पायाजवळ माझं प्रमाणपत्र ठेवायचं स्वप्न, आज त्यांचं छायाचित्र बघून पूर्ण करत आहे…माझं मन रोज विचारतं – "बाबा, तुम्ही असता तर…?" शब्द नाही सापडत उत्तरासाठी. ती एक मुलगी नव्हे – ती स्वप्नांवर चालणारी सावली आहे, जिच्या मागे तिच्या पित्याची आठवण अजूनही चालत आहे...! वैभवी देशमुख – तुझ्या जिद्दीला सलाम तू लाखोंना शिकवलं की संकट कितीही मोठं असलं तरी ध्येय मोठं असलं की यश नक्की मिळतं.

'निश्चयाचे बळ l तुका म्हणे तेचि फळ ll'

◆ श्रीकृष्ण उबाळे, बीड
◆मो.9405344642

#JusticeForSantoshDeshmukh
#VaibhaviDeshmukh
#FasachiMaang
#NEETSuccess
#MaharashtraJustice
#SaluteToCourage #NEET551 #GovtMedicalCollege #VaibhaviDeshmukh #Massajog #SantoshDeshmukh #InspirationalStory #SaluteToDetermination #वैभवीदेशमुख #Massajog #SantoshDeshmukh #NEETSuccess #Inspiration #Yashogatha #SalamVaibhavi

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'